लोकदेवता हा शब्द तसा खूप सरळ आणि सोपा आहे. लोक + देवता. म्हणजे लोकांची देवता. मात्र त्याचा अर्थ खरेच इतका सोपा आहे का? इंगजीमधिल Folk Deity या शब्दाचा अर्थ “प्रस्थापित आणि प्रमुख देवतेपेक्षा वेगळी देवता असा आहे. बरेच धर्म एकेश्वरवादी असल्याने असा फ़रक अगदी सहजपणे करता येऊ शकतो. मात्र हिंदू धर्म हा अनेकेश्वरवादी आहे. हिंदू धर्मात प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या इच्छेनुसार आणि श्रद्धेनुसार वेगवेगळ्या देवतेची पुजा करू शकतात. त्यामुळे लोकदेवता शब्दाचा लौकिक अर्थ हिंदू धर्मात लागू होत नाही.
साधारणतः देवता या तीन प्रकारच्या असू शकतात. कुलदेवता, ग्रामदेवता आणि इष्टदेवता. कुलदेवता हे एखाद्या व्यक्तीच्या परीवाराशी संबंधित असतात. प्रत्येक परीवाराचे एक विशिष्ट कुलदैवत पुर्वापार चालत आलेले असते, आणि त्या परीवारात जन्म घेणा~या व्यक्तीचे तेच कुलदैवत असते. मात्र कालांतराने परीवाच्या कुलदैवतामध्ये बदल होऊ शकतो. छत्रपती शिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांचे कुलदैवत वेरूळ येथील घृष्णेश्वर होते. मात्र पुढील पिढ्यांमध्ये तुळजापूर येथील तुळजाभवानी त्यांचे कुलदैवत झाले. पुढे सातारा भोसले आणि कोल्हापूर भोसले असे दोन राजवंश निर्माण झाल्यानंतर कोल्हापूर भोसले परीवाराचे कुलदैवत कोल्हापूर येथील महालक्ष्मी बनले.
ग्रामदैवत हे गाव अथवा शहराशी संबंधित असते. ऐतिहासिक पुराव्य़ांमध्ये हे दिसून येते की प्रत्येक गावाची स्थापना करीत असताना किंवा स्थापना झाल्यानंतर त्या गावामध्ये एखादे पुरातन मंदिर निर्माण करण्यात येते. हे पुरातन मंदिर त्या गावचे ग्रामदैवत मानले जाते. “गावाची संरक्षक देवता” या अर्थाने देखिल ग्रामदैवत मानता येऊ शकेल. मुंबईमध्ये मुंबादेवी हे ग्रामदैवत मानले जाते, तर पुण्याचे कसबा गणपती हे ग्रामदैवत मानले जाते. नाशिकमध्ये कालिका माता, कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी, सोलापूरमध्ये सिद्धेश्वर, छ संभाजीनगर मध्ये संस्थान गणपती, लातूरमध्ये रत्नेश्वर अशे ग्रामदैवत आहेत. असेच प्रत्येक लहान मोठ्या गावात स्वतःचे असे एक ग्रामदैवत असते. एखाद्या गावाच्या ग्रामदैवतामध्ये बदल झालेले कधी दिसून आलेले नाही.
इष्टदैवत हे प्रत्येकाच्या वैयक्तिक श्रद्धेवर आधारीत आहे. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची एखाद्या विशिष्ट देवतेवर जास्त भक्ती असू शकते. ही देवता त्या व्यक्तिचे कुलदैवत अथवा ग्रामदैवत असू शकते. किंवा काही वेळा यापेक्षा वेगळेदेखिल असू शकते. शिवरायांचे कुलदैवत तुळजापूरची तुळजाभवानी आहे, मात्र रायगडावर राहत असताना त्यांची भक्ती जगदिश्वरावर होती. त्यामुळे जगदिश्वर हे त्यांचे इष्टदैवत मानले जाते.
लोकदैवत या विषयावर भाष्य करताना या लेखामध्ये मी “एखाद्या विशेष भौगोलिक क्षेत्रात पुजले जाणारे अथवा काही ठराविक समाजाकडून पुजले जाणारे दैवत” या अर्थाने लिहीत आहे. विष्णू, शिव, शक्ती, हनुमान, सुर्य अशा वैदिक अथवा पौराणिक देवतांव्यतिरीक्त इतर देवतांचा संदर्भ या ठिकाणी वापरत आहे.
१. खंडोबा
मार्तंड, उसगाव (गोवा) येथे सापडलेली १४ व्या शतकातील मुर्ती. सध्या पणजी येथील पुरातत्व संग्रहालयात
खंडोबा हे महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील एक प्रसिद्ध लोकदैवत आहे. मल्लारी (मल्हारी) मार्तंड, मार्तंडभैरव, म्हाळसाकांत, मैलार इ. नावांनीही खंडोबा प्रसिद्ध आहे. दैवत सु.अकराव्या शतकापासून विशेष लोकप्रिय झाले. खंडोबा अनेकांचे कुलदैवतही आहे. मणी आणि मल्ल ह्या दैत्यांच्या नाशासाठी शंकराने मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीस (चंपाषष्ठी), मार्तंडभैरवाचा अवतार धारण केला. अशी कथा मल्लारि-माहात्म्यम् ह्या संस्कृत ग्रंथात आहे. प्रस्तुत ग्रंथ १२६० ते १५४० च्या दरम्यान, कुणातरी महाराष्ट्रीय कवीने रचला असावा. या ग्रंथामुळेच खंडोबाला महाराष्ट्र – कर्नाटकांत विशेष प्रतिष्ठा प्राप्त झाली. अश्वारूढ, उभ्या व बैठ्या अशा त्रिविध स्वरूपात खंडोबाच्या मूर्ती आढळतात. चतुर्भुज कपाळाला भंडार, हातांत डमरू, त्रिशूळ, खड्ग व पानपात्र, वाहन घोडा आणि म्हाळसा व बाणाई ह्या भार्या, असे त्याचे वर्णन आढळते. मुले होण्यासाठी खंडोबास नवस करणे आणि मुलगा झाल्यास ‘वाघ्या’ व मुलगी झाल्यास ‘मुरळी’ म्हणून खंडोबाच्या सेवेस अर्पण करणे अशी पद्धत पुर्वी होती. महाराष्ट्रात जेजुरी (जि. पुणे), पाली (जि. सातारा) इ. क्षेत्रे, तर कर्नाटकात मंगसूळी (जि. बेळगाव), मैलारलिंग (जि. धारवाड), मैलार (जि. बेल्लारी), सातार (जि संभाजीनगर) इ. क्षेत्रे खंडोबा मंदिरासाठी विशेष प्रसिद्ध आहेत.
२. ज्योतिबा
पन्हाळा येथील ज्योतिबाची मुर्ती
ज्योतिबा हे दक्षिण महाराष्ट्रातील एक प्रख्यात दैवत आहे. कोल्हापूरपासून १४ किमी अंतरावर पन्हाळा तालुक्यात पायथ्यापासून सु. ३०५ मी. उंचीचा जोतिबाचा डोंगर असून त्यावर जोतिबाचे ठाणे आहे. या डोंगराला ‘रत्नागिरी’ असेही नाव आहे. प्राचीन काळापासून हा डोंगर एक पवित्र क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. वाडी-रत्नागिरी ह्या खेड्यात काही प्राचिन मंदिरांचा समूह असून त्यांतील केदारलिंग,केदारेश्वर,रामलिंग आणि चर्पटांबा किंवा चोपडाई ह्या देवतांची मंदिरे विशेष महत्त्वपू्र्ण आहेत. यांतील केदारलिंगाचे किंवा जोतिबाचे मंदिर प्रमुख असून मध्यभागी आहे. जोतिबा हा मूळचा ज्योतिर्लिंग केदारनाथ मानला जातो. कोल्हापूरच्या अंबाबाईला किंवा महालक्ष्मीला कोल्हासुर,रत्नासुर इ. दैत्यांच्या संहारकार्यात मदत करण्यासाठी प्रत्यक्ष केदारनाथच हिमालयातून जोतिबा डोंगरावर येऊन राहिला आणि त्याने दैत्यसंहार करून तेथे आपल्या केदारलिंगाची स्थापना केली, अशी आख्यायिका आहे. ज्योतिबा हे पौगंडद ऋषीचा मुलगा म्हटला जातो. परंपरेनुसार रत्नासुर नावाच्या दैत्याचा त्यांनी या ठिकाणी वध केल्यामुळे हे स्थान रत्नागिरी म्हणून ओळखले जाते. चैत्री पौर्णिमेला येथे खूप मोठी यात्रा भरते. यात्रेची सुरुवात चैत्र शु. अष्टमीपासूनच होते. उत्तर भारतातून (ग्वाल्हेर परिसर) तसेच सर्व महाराष्ट्रातून दिड दोन लाखांवर लोक यात्रेसाठी जमतात. जोतिबा हे जागृत आणि शक्तिशाली दैवत मानले जाते. जोतिबा हा नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. पुत्रप्राप्ती, रोगनिवारण, धनप्राप्ती संकटनिवारण इ. हेतूंनी जोतिबाला भक्त नवस बोलतात व फलप्राप्तीनंतर मोठ्या श्रद्धेने ते फेडतात. ग्वाल्हेर येथील शिंदे घराण्याचे ज्योतिबा हे कुलदैवत आहे.
३. म्हसोबा
मुळशीजवळील खारवडे येथील म्हसोबाची मुर्ती
म्हसोबा है महाराष्ट्रातील एक लोकदैवत आहे. ग्रामदेवता वा लोकदेवता म्हणूनही म्हसोबाचा उल्लेख केला जातो. शेंदूर लावलेला गोल किंवा उभट असा दगडाचा तांदळा, या स्वरूपात तो गावोगावी आढळतो. गावाच्या शिवेवर, शेताच्या बांधावर वा गावातील एखाद्या प्रमुख ठिकाणी त्याचे ठाणे असते. रोगराईचे संकट, वार्षिक यात्रा इ. प्रसंगी त्याला बकरी, कोंबडी, नारळ इ. अर्पण करतात. म्हसोबाचा इतिहास अथवा पौराणिक महत्व याबद्दल फारसे कोठे लिखाण नाही आहे. ‘महिषासुर’ या सामासिक शब्दातील ‘महिष’ या शब्दाला संत, देवता इत्यादींच्या नावांना जोडला जाणारा पितृवाचक ‘बा’ हा प्रत्यय जोडून ‘महिषोबा’ असा शब्द बनला असावा आणि त्याचा अपभ्रंश होऊन ‘म्हसोबा’ हे रूप तयार झाले असावे. म्हसोबा हा भुतांचा अधिपती आहे, त्याचे सामर्थ्य वेताळाइतके असते इ. प्रकारच्या श्रद्धा आढळतात. विदर्भ भागात तेलाचा घाणा सुरू करण्यापूर्वी म्हसोबाची स्थापना करतात. तसे केल्यामुळे अधिक तेल मिळते, अशी श्रद्धा आढळते. इतर घाणेवाल्यांना म्हसोबा भाड्याने देण्याच्या प्रथेचाही उल्लेख आढळतो. म्हसोबाच्या यात्रा अनेक ठिकाणी भरत असून ठाणे जिल्ह्यातील म्हसे (ता. मुरबाड) गावी पौष पौर्णिमेला भरणारी यात्रा ही त्याची एक प्रमुख यात्रा आहे.
४. वेताळ
वेताळ हे देवताविश्वातील एक शिवगण आहे. भूतनाथ हे त्याचे एक पर्यायी नाव. आग्यावेताळ, ज्वालावेताळ आणि प्रलयवेताळ ह्या नावांनीही तो ओळखला जातो. महाभारत, पुराणे इ. प्राचीन साहित्यातून वेताळाची जी वर्णने आढळतात, त्यांनुसार तो क्रूर डोळ्यांचा आणि महाकाय आहे. तो रक्तमांस खातो, सदैव युद्धोद्यत आणि शस्त्रधारी असतो. शिवपुराण शतरुद्रसंहितेत म्हटले आहे, की वेताळ हा मुळात शंकरपार्वतीचा द्वारपाल होता. एकदा दारापाशी आलेल्या पार्वतीला त्याने दाराबाहेर येण्यास अटकाव केला, म्हणून ‘तू पृथ्वीवर मनुष्यजन्म घेशील’ असा शाप तिने त्याला दिला. तेव्हा वेताळरुपाने तो पृथ्वीवर आला. कोकण आणि गोवा भागात अनेक गावांत एक ग्रामदेवता म्हणून वेताळाची पूजाअर्चा केली जाते. वेताळाच्या मूर्ती काष्ठाच्या वा पाषाणाच्या असतात. काही ठिकाणी तो तांदळ्याच्या स्वरुपातही आढळतो. हातात दंडा आणि खांद्यावर घोंगडी घेऊन वेताळ मध्यरात्री गावातून हिंडतो, असा खेडोपाडी समज आहे. ह्या भ्रमंतीमुळे त्याचा वहाणा झिजतात म्हणून वेताळाला दरमहा नव्या वहाणा अर्पण करण्याची प्रथाही काही ठिकाणी दिसते.
५. भैरव
काळभैरव, नेत्रावली (गोवा) येथे सापडलेली मुर्ती. सध्या पणजी येथील पुरातत्व संग्रहालयात
भैरव हे शिवाचे उग्र व भीषण असे एक रूप. भैरव हा शब्द भीरु (भित्रा) या संस्कृत शब्दापासून बनल्यासारखे दिसते ; परंतु भीरु म्हणजे भित्रा आणि भैरव म्हणजे भीषण असा त्या दोन शब्दांच्या अर्थांत पूर्णपणे विरोध दिसतो. त्यामूळेच भैरों, बहिरोबा वा भैरोबा या ग्रामदेवतेचे शिवाशी संबंध मानले गेले, तेव्हाच त्या देवतेच्या देशी नावाचे भैरव असे संस्कृतीकरण झाले असण्याची शक्यता आहे. पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखालाही भैरव म्हणतात तसेच भैरव हा शिवाचा एक प्रमुख गण असल्याचेही मानले आते.
गळ्यात नरमुंडमाला, हातात नरमुंड, अंगावर हत्तीचे कातडे, सापाचे दागिने, चार, आठ, बारा वा अधिक हातांतून तलवार, बाण, त्रिशूळ, दोरी इ. आयुधे, ५ चेहरे इ. रूपांतील भैरव नावाप्रमाणेच उग्र भासतो. दांडगाई करणाऱ्या माणसाला ‘टोळभैरव’ म्हणतात, याचे कारणही भैरवाची उग्रताच होय. महाराष्ट्रातील त्याच्या मूर्ती नग्न, तर ओरिसातील मूर्ती विश्वपद्मावर उभ्या असतात. तेथील काही मूर्ती तीन डोळे व मिशा असलेल्या, तर काही मूर्ती तिसरा डोळा आणि मिशा यांचा अभाव असलेल्या असतात. राजस्थानातील प्रत्येक गावात शमी वृक्षाखाली त्याची मूर्ती वा तांदळा असतो. पंजाबात त्याला मृत्यूला भिवविणारा देव मानले जाते. भैरव कुत्र्याबरोबर असतो वा त्याच्यावर स्वार होऊन राहतो, म्हणून त्याला श्वानाश्व / श्वाश्व (कुत्रा हा ज्याचा घोडा म्हणजे वाहन आहे, तो) म्हणतात. तो शैवमंदिरांचा द्वारपाल व शक्तिपीठांचा संरक्षक आहे, भैरवाला वगळून शक्तीची पूजा केली, तर ती निष्फळ मानली जाते. शत्रूंचा नाश करण्यासाठी त्याला आवाहन केले जाते.
शेतकरी पेरणीच्या व कापणीच्या प्रसंगी त्याची पूजा करतात. त्याच्यामुळे भूतबाधा, सर्पदंश वगैरेंचा प्रभाव नष्ट होतो, असे मानतात. त्याचे वास्तव्य स्मशानात असल्यामुळे राजस्थानातील भोपे त्याची स्मशानात प्रार्थना करून मग भिक्षेला जातात. तेथे कुमारिकांना त्याच्या देवळात जाऊ देत नाहीत. त्याच्या कृपेने मूल झाल्यास राजस्थानी लोक त्याचे नाव भैरुदान, भैरुबख्श इ. ठेवतात. तो रागावला तर मुलांच्या माना मुरगाळतो, अशी तेथे समजूत आहे. कालभैरवाला काशीचा कोतवाल म्हटले जाते. काशीत जाताना प्रथम त्याचे दर्शन घ्यावयाचे व परतताना त्याच्या नावाचा काळा गंडा बांधावयाचा, अशी प्रथा आहे. उज्जैनजवळील भैरवगढ या कोटात त्याचे भव्य मंदिर आहे. नेपाळमधील नेवार लोक वीरभद्राचे रूप असलेल्या पाचलीभैरवाची पूजा करतात. सूर्य व शिव यांचे संयुक्त स्वरूप असलेल्या मार्तंडभैरवाची त्रिमुखी मूर्ती आढळली आहे. शिवाचे बटुकभैरव नावाचे एक तामसरूपही आढळते. दक्षिण भारतातील शैव मंदिरांची रक्षकदेवता असलेल्या क्षेत्रपालाला महाभैरव म्हणतात. राजस्थानात भूतपिशाचांना ताब्यात ठेवणारे काला व गोरा असे दोन भैरव पुजले जातात.
६. जरीआई – मरीआई
‘जरी’ म्हणजे तापाची साथ. ‘मरी’ म्हणजे पटकी,देवी यांसारख्या रोगांची साथ. या प्राणघातक साथींच्या रोगांचे निवारण करणारी एक देवी कल्पून ती ‘जरी-मरी’ वा ‘जरीआई-मरीआई’ ह्या नावाने महाराष्ट्रात तसेच दक्षिण भारतात पूजिली जाते. मरीआईचेच ‘मरीअम्म’, ‘मारी’, ‘मरीमाय’, ‘मरीभवानी’ अशी नामांतरे प्रदेशपरत्वे आढळतात. जरी-मरीचे स्थान गावात एका कोपऱ्याला किंवा गावाबाहेर एखाद्या झाडाखाली असते.कोठे तिच्यावर केवळ आच्छादन असते, तर कोठे नैसर्गिक स्थितीतच स्थानापन्न झालेली दिसते. दक्षिण भारतातील पोलेरम्मा नावाची ग्रामदेवताही मरीआईचेच रूप असून तिच्याबाबत रेड्याशी तिची झुंज झाल्याची कथा रूढ आहे. रोगराईपासून ती गावाचे संरक्षण करते, अशी समजूत आहे. पश्चिम महाराष्ट्रात मरीलाच मरीआई, विदर्भात मरीमाय व उत्तर भारतात मरीमाई, मरी वा मरीभवानी म्हणतात. उत्तर भारतातही ती पटकीसारख्या प्राणघातक साथींच्या रोगांचे निवारण करणारी देवता मानली जाते.
महाराष्ट्रात तसेच दक्षिण भारतातील मरीआईच्या पूजाद्रव्यात कडुनिंबाच्या पाल्याला विशेष महत्त्व आहे. पोतराज हा मरीआईचा उपासक वा भगत असून त्याच्या मार्फत मरीआईला प्रसन्न करून घेता येते, अशी सर्वत्र समजूत आहे. गावात आलेल्या साथीच्या शमनार्थ मरीआईचा गाडा गावसिमेपर्यंत नेण्यासाठी पोतराजच लागतो. मंगळवारी वा शुक्रवारी हा गाडा गावसिमेपर्यंत नेण्याचा विधी असायचा.त्यामुळे गावातून साथ सिमेपार जाते अशी लोकश्रद्धा होती. हा गाडा सिमेपार नेण्याच्या कार्यक्रमाला वा विधीला ‘जरी-मरीची जत्रा’ म्हणतात.
७. यल्लम्मा
सौंदत्ती जवळील यल्लम्मा देवीचे मंदिर
यल्लम्मा ही महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि गोवा भागातील एक मातृदेवता आहे. कर्नाटकातील सौंदत्ती (जि. बेळगाव) हे तिचे मुख्य स्थान आहे. ती कर्नाटक, महाराष्ट्र व आंध्र या प्रांतांतील असंख्य लोकांची उपास्य देवता व अनेक कुटुंबांची कुलदेवता आहे. ‘यल्लम्मा’ या कानडी शब्दाचे ‘सर्वांची माता’ आणि ‘सप्तमातृका’ हे दोन्ही अर्थ तिचे सर्जनशील मातृस्वरूप दर्शवितात.
यल्लम्मा व रेणुका यांचे ऐक्य मानले जाते. गंधर्वांची जलक्रिडा पाहताना विचलित झालेल्या रेणुकेचा जमदग्नीच्या आज्ञेवरून परशुरामाने वध केला आणि तिला पुन्हा जिवंत करताना मातंगीचे मस्तक तिच्या धडाला व तिचे मस्तक मातंगीच्या धडाला जोडले गेले,अशी पुराणकथा आहे. जिवंत झालेल्या दोघींपैकी एक यल्लम्मा व दुसरी मरिअम्मा बनली. काळाच्या ओघात स्थानिक मातृदेवतेचे पुराणातील रेणुकेशी ऐक्य झाले, हे या कथेवरून सूचित होते. तिला पार्वतीचा अवतार मानण्यात आले असून लज्जागौरी, एकवीरा, जोगुळांबा, भूदेवी, मातंगी, यमाई व सांतेरी ही तिचीच रूपे होत, असे अभ्यासकांना वाटते. कार्ला येथील एकवीरा, मोहटा (जि अहमदनगर) येथील मोहटादेवी, माहूर (जि नांदेड) आणि रेणापूर (जि लातूर) येथील रेणुका, बदामीजवळील बनशंकरी हे देखिल यल्लम्माची रूपे मानली गेली अहेत.
सौंदत्ती येथील देवीचे मंदिर तेराव्या शतकातील आहे. आंध्रमधील आलमपूर या शक्तिपीठाचे मूळचे नाव एल्लाम्मापूरच असले पाहिजे, असे रा. चिं. ढेरे मानतात. देवी कडक परंतु भावभोळी असल्याचे मानले जाते. तिची मूर्ती चतुर्भुज व बसलेल्या स्थितीतील असते. तिच्या डोक्यावर मुकुट व हाती डमरू, त्रिशूळ, पाश व ब्रह्मकपाल ही आयुधे असतात. सौंदत्ती येथे प्रचंड यात्रा भरते. देवीला चांदीचा पाळणा वाहणे, बगाड घेणे, लिंब नेसणे इ. प्रकारे नवस फेडले जातात. चंद्रगुत्ती (जि. शिमोगा) येथे रेणुकाम्बेची नग्न होऊन पूजा केली जाते. सौंदत्ती येथेही ब्रिटिश अमदानीत तसे घडत असल्याचा उल्लेख मिळतो.
८. येडेश्वरी
येरमाळा येथील येडेश्वरी देवी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखली जाणाऱ्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील देवी. प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवासाला निघाले, तेव्हा त्यांना प्रलोभन दाखविण्यासाठी देवी पार्वतीने सीतेचे रूप घेऊन त्यांना भुलवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रामाने पार्वतीला ‘वेडी आहेस’ असे म्हटले. तेव्हापासून देवी त्याच ठिकाणी राहिली व येडाई उर्फ येडेश्वरी झाली अशी आख्यायिका या देवी संदर्भात सांगितली जाते. देवीची वर्षातून दोन वेळा यात्रा भरते. चैत्र पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. श्रावणी पौर्णिमेलाही येडेश्वरीची श्रावणी यात्रा भरते. असंख्य भाविकांच्या उपस्थितीत येडेश्वरी यात्रेचा चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम पार पाडतो. एरवी बारा महिने काळीभोर असलेल्या या जमिनीत देवीची पालखी येताच चुनखडी प्रकट होते, अशी पूर्वीपासून मान्यता आहे. त्यानंतर वेचलेल्या चुन्याच्या खड्याच्या राशी केल्या जातात. पालखी मंदिरात परतल्यानंतर ही चुनखडी भाजून मंदिर चुन्याने रंगवले जाते. या काळात दररोज रब्बी हंगामातील नवीन धान्यापासून तयार केलेल्या वड्या, भाकरी, पोळ्या, आंबील आदींचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. नवरात्रातही देवीचा उत्सव दसरा सणापासून पौर्णिमेपर्यंत मोठ्या आनंदात साजरा केला जातो.
[…] या नावांनीदेखिल ओळखले गेलेले आहे. महाराष्ट्रातील लोकदेवतांपैकी एक असलेले खंडोबा हे दैवत देखिल […]
[…] महाराष्ट्रातील लोकदेवतांमध्ये विविध देवींची पूजा केली जाते. जरीआई आणि मरीआई ही लोकदेवता प्रत्येक गावामध्ये सापडते. ‘जरी’ म्हणजे तापाची साथ. ‘मरी’ म्हणजे पटकी,देवी यांसारख्या रोगांची साथ. या प्राणघातक साथींच्या रोगांचे निवारण करणारी एक देवी कल्पून ती ‘जरी-मरी’ वा ‘जरीआई-मरीआई’ ह्या नावाने महाराष्ट्रात तसेच दक्षिण भारतात पूजिली जाते. जरी-मरीचे स्थान गावात एका कोपऱ्याला किंवा गावाबाहेर एखाद्या झाडाखाली असते.कोठे तिच्यावर केवळ आच्छादन असते, तर कोठे नैसर्गिक स्थितीतच स्थानापन्न झालेली दिसते. यल्लम्मा ही महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि गोवा भागातील एक मातृदेवता आहे. यल्लम्मा व रेणुका यांचे ऐक्य मानले जाते. गंधर्वांची जलक्रीडा पाहताना विचलित झालेल्या रेणुकेचा जमदग्नीच्या आज्ञेवरून परशुरामाने वध केला आणि तिला पुन्हा जिवंत करताना मातंगीचे मस्तक तिच्या धडाला व तिचे मस्तक मातंगीच्या धडाला जोडले गेले,अशी पुराणकथा आहे.जिवंत झालेल्या दोघींपैकी एक यल्लम्मा व दुसरी मरिअम्मा बनली. तिला पार्वतीचा अवतार मानण्यात आले असून लज्जागौरी, एकवीरा, जोगुळांबा, भूदेवी, मातंगी, यमाई व सांतेरी ही तिचीच रूपे आहेत, असे अभ्यासकांना वाटते. कार्ला येथील एकवीरा, मोहटा (जि अहमदनगर) येथील मोहटादेवी, माहूर (जि नांदेड) आणि रेणापूर (जि लातूर) येथील रेणुका, बदामीजवळील बनशंकरी हे देखिल यल्लम्माची रूपे मानली गेली अहेत. येडेश्वरी ही श्रीतुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखली जाणाऱ्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील देवी. प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवासाला निघाले, तेव्हा त्यांना प्रलोभन दाखविण्यासाठी देवी पार्वतीने सीतेचे रूप घेऊन त्यांना भुलवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रामाने पार्वतीला ‘वेडी आहेस’ असे म्हटले. तेव्हापासून देवी त्याच ठिकाणी राहिली व येडाई उर्फ येडेश्वरी झाली अशी आख्यायिका या देवी संदर्भात सांगितली जाते. कोकण भागात मुंग्यांच्या मोठमोठ्या वारूळांची सांतेरी या नावाने पूजा केली जाते. सांतेरी ही देवता लज्जागौरीप्रमाणेच प्रजनन क्षमतेसोबत जोडली गेलेली आहे. […]