शिव भक्तीमध्ये ज्योतिर्लिंगांचे एक विशेष स्थान आहे. ज्योती आणि लिंग या दोन शब्दांपासून ज्योतिर्लिंग हा शब्द बनलेला आहे. ज्योति याचा अर्थ अग्नी किंवा दिवा असा नसून महादेवांच्या आत्मास्वरूप ज्योतीबद्दल हा शब्द वापरलेला आहे. प्रत्येक ज्योतिर्लिंगामध्ये प्रत्यक्ष महादेवाची ज्योती अर्थात आत्मा समाविष्ट आहे असे म्हटले जाते.
शिवपुराणामध्ये एकूण ६४ ज्योतिर्लिंगांचा उल्लेख आहे. यांपैकी १२ ज्योतिर्लिंग हे अधिक महत्वपूर्ण आणि पवित्र मानले गेलेले आहेत. या १२ ज्योतिर्लिंगांची माहिती खालीलप्रमाणे आहे.
या १२ ज्योतिर्लिंगांपैकी ५ ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रात आहेत. आजच्या लेखात आपण त्यांच्याबद्दल माहिती घेऊयात.
१. त्र्यंबकेश्वर, त्र्यंबक, जि नाशिक
नाशिकपासून २८ किमी अंतरावर ब्रम्हगिरी डोंगराच्या पायथ्याशी त्र्यंबकेश्वराचे भव्य आणि सुंदर असे मंदिर आहे. या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य असे आहे की येथे एकूण तीन शिवलिंग आहेत, जे ब्रम्हा, विष्णू आणि शिव या तिघांचे प्रतिक मानले जाते. त्र्यंबकेश्वर शब्दाचा अर्थ “त्रि+अंबिका+इश्वर” अर्थात तीन शक्तींचा स्वामी असा होतो. जवळपास शक्तींचे अथवा देवीची पुरातन मंदिरे नाही आहेत. मह ब्रम्हा, विष्णू आणि शिव यांची शक्तीस्वरूपे अर्थात ब्रह्माणी, वैश्णवी आणि महेश्वरी असा अर्थ सुद्धा मानता येईल. इतर अर्थाने विचार केल्यास तीन वेदांचा स्वामी असा देखिल अर्थ होऊ शकतो. ब्रम्हगिरी आणि अंजनेरी परीसरातील पुरातन मंदिरे आणि स्मारके पाहिल्यास हा परीसर ऐतिहासिकदृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण होता हे लक्षात येते. अंजनेरी येथील एक मंदिरात सापडलेल्या शिलालेखानुसार या ठिकाणी इस ७ व्या शतकात मंदिरांसाठी जागा दान दिल्याचा उल्लेख येतो. नाशिक प्रदेशाचा इतिहास मौर्य साम्राज्यापर्यंत मागे जातो. नाशिकजवळील पांडव लेण्या पाहता हा संबंध लक्षात येतो. त्यामागे जाता अगदी रामायणात देखिल हा प्रदेश महत्वपूर्ण होता. रामायणात पंचवटी या प्रदेशात राम, लक्ष्मण आणि सिता यांनी वनवासादरम्यान निवास गेला होता असा उल्लेख आहे. त्र्यंबकेश्वर जवळच अंजनेरी या ठिकाणी हनुमानांचा जन्म झाला असल्याची मान्यता आहे. अंजनेरी डोंगराच्या पोटात असलेल्या पुरातन जैन लेणी देखिल या परिसराच्या सुवर्ण इतिहासाची साक्ष देतात,
नानासाहेब पेशवे यांनी इ.स. १७५५-१७८६ या कालावधीत मराठा स्थापत्यशैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधले होते. यापुर्वीचे मूळ मंदिर १० व्या शतकातील असल्याचे सांगण्यात येते, जे मोगल बादशहा औरंगजेबाने तोडले होते. दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. ती शिवालये अशी : गोदावरी नदीच्या उगमाशी त्र्यंबकेश्वर, वाकी नदीच्या उगमाशेजारचे त्रिंगलवाडीतले शिवालय, धारणा नदीच्या उगमाशेजारचे -तऱ्हेळे येथे, बाम नदीच्या उगमाशेजारचे – बेलगावला, कडवा नदीच्या उगमाशेजारचे – टाकेदला, प्रवरा नदीच्या उगमाशेजारी – रतनवाडीतील अमृतेश्वर, मुळाउगमस्थानी असलेल्या – हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर, पुष्पावतीजवळ – खिरेश्वरातील नागेश्वर, कुकडीजवळ्च्या – पूरमधील कुकडेश्वर, मीना नदीच्या उगमाशेजारच्या – पारुंडेतील ब्रह्मनाथ, घोड नदीच्या उगमस्थानी – वचपे गावातील सिद्धेश्वर आणि भीमा नदीजवळचे -भवरगिरी. ही सर्व मंदिरे शिल्प सौंदर्याने आणि कोरीव कलेने सजलेली आहेत. त्यांतील एक हे शिवालय आहे.
मंदिराच्या चहूबाजूस दगडी तटबंदी आहे. कळसावर पाच सुवर्णकलश असून ध्वजा पंचधातूंची आहे. कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचुरकरांनी अर्पण केली आहे. मंदिराच्या बाजूस असलेल्या कुशावर्त तीर्थाचा जीर्णोद्धार होळकरांचे फडणीस असलेल्या पारनेरकरांनी केला. हे कुशावर्त तिर्थ गोदावरी नदिचे उगमस्थान आहे. कुशावर्त तिर्थासोबतच अमृतवर्षिणी, बिल्वतिर्थ, विश्वनतिर्थ आणि मुकुंदतिर्थ अशी आणखी तिर्थे आहेत, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या चारही बाजूंना कोट बांधलेला असून त्याच्या पूर्व बाजूस मुख्य दरवाजा आहे. या दरवाजाला लागूनच गावातला प्रमुख रस्ता आहे. तर दक्षिण बाजूलाही आणखी एक छोटा दरवाजा आहे. पाण्याच्या अतिवापरामुळे येथील शिवलिंगांची झीज झालेली आहे. यामुळे आजच्या काळात एक सोन्याचा मुखवटा लिंगांवर ठेवून त्या मुखवट्याची पुजा केली जाते.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे दर १२ वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो. इस १६९५ साली मुघल नोंदीमध्ये या कुंभमेळ्याचा उल्लेख आहे. इस १७८९ मध्ये शैव सन्यासी आणि वैष्णव बैरागी यांच्यामध्ये कुंभस्नानाच्या प्राथमिकतेवरून जोरदार युद्ध झाले, ज्यामध्ये १२००० पेक्षा अधिक साधूंचा मृत्यू झाला. यानंतर पेशव्यांनी केलेल्या तडजोडीतून वैष्णव बैराग्यांना नाशिकमधिल रामकुंड येथे स्नानासाठी जागा देण्यात आली, आणि नाशिक आणि त्र्यंबकेश्वर असे दोन ठिकाणी कुंभमेळा भरण्यास सुरूवात झाली. यापुर्वी त्र्यंबकेश्वर या एकाच ठिकाणी कुंभमेळा होत असे. भारत सरकारने या मंदिराला दिनांक ३० एप्रिल, इ.स. १९४१ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
२. वैद्यनाथ मंदिर, परळी, जि बीड
बीड जिल्ह्यातील परळी येथे एक छोट्या टेकडीवर वैद्यनाथाचे मंदिर आहे. “वैद्यांचा स्वामी” असा वैद्यनाथाचा अर्थ होतो. यानुसार महादेवांचा आयुर्वेद आणि औषधी यांच्यासोबतचा संबंध जोडला गेलेला आहे.
मराठवाडा प्रदेशात अनेक घराण्यांनी सुंदर मंदिरे बांधलेली आहेत. इस सातव्या शतकात भारतभ्रमण केलेल्या चिनमधिल बौद्ध भिक्षु आणि विद्वान झुआन जिंग (नंतर याला मोक्षदेव या नावानेदेखिल संबोधले गेले आहे) याच्या प्रवासवर्णनात या प्रदेशाचा आणि गावाचा उल्लेख आहे. उज्जैन येथील श्री पर्वणीकर शास्त्री यांच्या संग्रहात “कल्पसमूह” या नावाने एक हस्तलिखित उपलब्ध झाले आहे. यामध्ये गोमती अथवा उभयगंगा (गोदावरी ) नदीच्या परीसरातील अनेक आयुर्वेदिक औषधी आणि सोबतच ग्रामनामे, मंदिरे, नद्या आणि पर्वतांचे संदर्भ सापडतात. सैद महम्मद हा संशोधक रसविषयक स्थाळांचा शोध घेत परली (परळी) येथे आला होता असा उल्लेख या हस्तलिखितात आहे. ज्यायोगे उज्जैनमधून आयुर्वेदिक औषधींच्या शोधात संषोधक परळीपर्यंत आले होते, त्याअर्थी हा प्रदेश आयुर्वेदाच्या दृष्टीने महत्वपूर्ण होता हे लक्षात येते. हा संशोधक पुढे जोगाईचा अंबा (अंबेजोगाई), नांदूरा (घाटनांदूर), लातनुर (लातूर) आणि खरोसे (खरोसा) येथे देखिल गेला होता. “वेद्यनाथाचे परेलीहून दक्षिणेकडे नांदुरा जाण्या दुर्गा देवी असे” असा उल्लेख या हस्तलिखितात येतो. त्यावरून येथील वैद्यनाथ मंदिराचा उल्लेख १३ व्या शतकापर्यंत मागे जातो.
आज येथे मंदिर इंदूरची राणी अहिल्यादेवी होळकर यांनी नव्याने बांधलेले मंदिर अस्तित्वात आहे. पुर्वीचे मंदिर प्रदेशातील इतर मंदिरांप्रमाणेच औरंगजेबाने उद्ध्वस्थ केले असल्याची नोंद इतिहासात सापडते. आज हे मंदिर एका प्रशस्त आवारात आहे. गर्भगृह, अंतराळ आणि विस्तृत मंडप असे मंदिराचे स्वरूप आहे. मंडपाचा तळमजला दगडी बांधकामात आहे, तर वरील मजले हे लाकडी बांधकामात दिसून येतात. असेच लाकडी बांधकाम आणि नक्षिकाम पंढरपूर येथील विठ्ठल मंदिराच्या विस्तारित भागात दिसून येते. तसेच खूप पेशवेकालिन गणपती मंदिरांमध्ये देखिल दिसून येते. मंदिराचे शिखर हे १८ व्या शतकातील महेश्वर आणि इंदूर भागातील मंदिरशैलीशी साधर्म्य असणारे आहे. त्यात राजे मल्हारराव होळकरांचा अश्वारूढ पुतळा आहे. मूख्य मंदिराच्या बाहेरील बाजून काही खोल्या आणि इतर लहान लहान मंदिरे दिसून येतात. शिखराचे महेश्वर शैलीशी असणारे साधर्म्य आणि यात्रेकरूंना निवासासाठी असणा~या खोल्या हे अहिल्यादेवींच्या प्रभावाची जाणीव करून देतात.
मुख्य मदिराचा पूर्वेकडील दरवाजा महाद्वार म्हणून ओळखला जातो. यावरील दगडी कोरीव काम, शिल्प आणि या दरवाजाचे भक्कम बांधकाम हे लक्ष वेधून घेणारे आहे. चैत्री पोर्णिमा व आश्विन पोर्णिमा या दिवशी सूर्याची पहिली पाच किरणे याच प्रवेश द्वारातून श्री प्रभू वैजनाथाच्या पिंडीवर पडतात असा उल्लेख धार्मिक ग्रंथात सापडतो.अलीकडे होत असलेल्या भौगोलिक बादलामुळे कांही वेळा अशी किरणे पडलेली दिसत नाहीत या महाद्वारावर त्रिकाल चौघड्याची हजेरी असते. ,मंदिर व्यवस्थापनेसाठी पेशव्यांनी स्थांनिकांना अनेक बिघे जमीन ईनाम दिली होती असा ऐतिहासिक उल्लेख कागद पत्रात आढळतो.
मंदिर आज एका छोट्या टेकडीवर उभे आहे. काही इतिहासकारांचे असे मत आहे की सदरील टेकडी म्हणजे मूळ मंदिराचे अवशेष आणि त्यावर कालांतराने माती आणि धूळ साचून झालेली टेकडी (mound) असावे. याठिकाणी भविष्यात संशोधन अथवा बांधकामाच्या दृष्टीने उत्खनन झाल्यास या गोष्टीचा उलगडा होऊ शकेल. आजघडीला असा कोणताही पुरावा नाही. मात्र ज्याप्रमाणे उज्जैन येथील मंदिराच्या विस्तारासाठी बांधकाम करताना १० व्या शतकातील मुळ मंदिराचे अवशेष सापडले, त्याचप्रमाणे येथे काही अवशेष सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जवळील अंबेजोगाई या गावास देखिल किमान १५ शतकांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. अंबेजोगाईमधिल जोगाई अथवा योगेश्वरी माता ही कित्येक कोकणस्थ ब्राह्मण परीवारांची कुलदैवत आहे. स्थानिक आख्यायिकेनुसार जोगाई मातेचा विवाह परळी येथील वैद्यनाथांसोबत ठरला होता. मात्र विवाह सुर्योदयापुर्वी व्हावा अशी अट मातेने दिली होती. जेव्हा वैद्यनाथ वरात घेऊन येत होते, तेव्हा पहाट होण्यापूर्वीच नारद ऋषींनी ब्रम्हदेवाच्या आज्ञेवरून कोंबड्याच्या आवाजात बांग दिली. सकाळ झाली आहे असे समजून वैद्यनाथ आणि वराती माघारी गेले. आणि त्यांच्यासोबत असलेले हत्ती तेथेच थांबले आणि दगडामध्ये रूपांतरित झाले. अंबेजोगाई येथे असलेल्या हत्तिखाना लेण्यांसाठी ही गोष्ट सांगितली जाते.
मंदिराच्या आसपासच्या परिसरात हरिहर तीर्थ , नारायण कुंड, मार्कंडेय तीर्थ, अमृतकुपी, चक्रतीर्थ काकड तळे, सारस्वत कूप, ब्रम्हगंगा, वेनुमती असे अनेक बारव / कुंड आहेत. आज श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून मंदिराचे देखभाल केली जाते. ज्येष्ठ भाजप नेते स्व. गोपिनाथ मुंडे यांच्यामुळे परळी गावाला राजकियदृष्ट्या महत्व प्राप्त झालेले आहे. त्याचप्रमाणे स्व प्रमोद महाजन हे शेजारच्या अंबेजोगाई गावचे होते.
३. नागनाथ मंदिर, औंढा नागनाथ, जि हिंगोली
नागनाथ अर्थात नागांचा स्वामी. हिंगोली जिल्ह्यात औंढा या गावात हे नागनाथाचे मंदिर वसलेले आहे. लोकमान्यतेनुसार हे मंदिर यादवकालिन मानले जात असले, तरी मंदिराची रचना, कलाकृती, स्तंभांची बांधणी हे सर्व पाहता हे मंदिर चालुक्यकालिन आहे हे स्पष्टपणे लक्षात येते. मराठवाड्यातील सर्वात मोठे मंदिर म्हणून या मंदिराचा उल्लेख करता येईल. गावामध्ये अनेक मंदिरांचे अवशेष विखुरलेले दिसून येतात. कित्येक मुर्त्या या झाडाच्या आडोश्याने ठेवलेल्या आहेत. मात्र नागनाथाचे हे मंदिर तुलनात्मक दृष्ट्या सुस्थितीत आहे. इस १९१७-१७ मध्ये गुलाम यझदानी यांनी सर्वप्रथम या मंदिराची नोंद केली. या मंदिराचे सर्वेक्षण देखील त्यांनीच केले आहे. तेव्हापासून हे मंदिर राज्य सरकारचे संरक्षित स्मारक आहे.
गर्भगृह, अंतराळ, मुखमंडप, दोन अर्धमंडप, विस्तारीत मंडप असे भाग या मंदिरामध्ये आहेत. मंदिर प्रांगणास विस्तृत आशी सीमाभिंत आहे. या सीमाभिंतीला चार दिशांना प्रवेशद्वारे आहेत, पैकी उत्तरेकडील प्रवेशद्वार ते प्रमुख प्रवेशद्वार आहे. या प्रांगणाच्या मध्यभागी नागेश्वर मंदिर ची वास्तू आहे. प्रांगणाच्या आग्नेय दिशेला एक सुंदर अशी पुष्करणी आहे. या पुष्करणीमध्ये काही वर्षापूर्वी विष्णुची केशवराज रूपातील खूप सुंदर मूर्ती सापडली आहे. ही मूर्ती सध्या मंदिराच्या गर्भगृहाशेजारी ठेवलेली आहे. मंदिरातील शिवलिंग हे गर्भगृहाच्या मध्यभागी नसून, गर्भगृहमध्येच एका छोट्याश्या भुयारवजा जागेमध्ये आहे. कदाचित परकीय आक्रमणाच्यावेळी या ठिकाणी भुयारामध्ये मूर्ती व शिवलिंग लपविले असावे असे वाटते. पुढील काळात भुयारामध्ये शिवलिंगाची पूजा कायम राहिली. हे भूमिगत गर्भगृह सुरक्षित ठेवण्यासाठी अतिशय सुंदर अशी योजना केलेली आहे. चौरस आकारातील दगडांचा यासाठी खूप सुंदर पद्धतीने वापर करण्यात आला आहे. भुमिगत गर्भगृह वरून झाल्यानंतर बाहेरून येणा~या वक्तिला गर्भगृह दिसून येतो मात्र त्यामध्ये मूर्ती दिसत नाही. परकीय आक्रमणाच्या वेळेला देवांची मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी या योजनेचा वापर करण्यात आला असावा आणि यामुळेच मंदिरातील मूळ शिवलिंग सुरक्षित राहिले. मुगल बादशाह औरंगजेबाने या परिसरातील बरीच मंदिरे उध्वस्त केली आहेत. औंढा गावातील देखील बरीच मंदिरे कदाचित त्याने उद्ध्वस्त केलेली असावित. मात्र नागनाथाचे मंदिर तुलनेने कमी प्रमाणात तोडण्यात आले आहे. पुढील काळात अहिल्या बाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असे सांगण्यात येते. कदाचित मंदिराचा तुटलेल्या भाग त्यांनीं दुरुस्त केला असावा.
मंदिराचा बाह्यभाग अतिशय उत्कृष्ट शिल्पाविष्कारांनी सजलेला आहे. या शिल्पकामाची तुलना होयसळा काळातील मंदिरांसोबत होऊ शकते. या मंदिरातील शिल्पकलेवर होयसळा साम्राज्याचा प्रभाव अतिशय प्रखरपणे जाणवतो. या ठिकाणी हिंदू देवतांची शिल्पे स्थानक म्हणजे उभे असलेल्या रुपामध्ये दिसून येतात, तर काही ठिकाणी आसनस्थ म्हणजे बसलेल्या अवस्थेतील मूर्तीदेखील आहेत. याठिकाणच्या शिल्पाविष्कार मध्ये देवी देवतांसोबतच ऋषीमुनी, बौद्ध भिक्खू आणि सामान्य जनमानसाला देखील शिल्पित केलेले आहे.
औंढा नागनाथाचे हे मंदिर भक्ती संप्रदायाशी अतिशय जवळून जोडले गेलेले आहे. ज्ञानेश्वरांच्या सुचनेवरून संत नामदेव हे गुरूच्या शोधात या मंदिराला आले होते, आणि येथे त्यांची भेट विसोबा खेचर यांच्यासोबत झाली. पुढील काळात संत नमदेवांनी येथे बरेच वर्षे रहिवास केलेला आहे. शिख धर्मगुरू गुरूनानक हे देखिल संत नामदेवांसोबत या मंदिरास येऊन गेलेले आहेत.
४. भिमाशंकर मंदिर, भिमाशंकर, जि पुणे
भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आहे. या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते.
भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे. १९८४ साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली. जंगलात रानडुक्कर, सांबर, भेकर, रानमांजर, रानससा, उदमांजर, बिबट्या असे विविध प्रकारचे प्राणी आणि अनेक पक्षी आढळतात. अतिशय घनदाट जंगल व तीर्थक्षेत्रामुळे हे ठिकाण पुणे जिल्ह्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे.
संत नामदेवांच्या लिखाणामध्ये त्यांनी ज्ञानेश्वरांसोबत या मंदिरास भेट दिलेली असल्याचा उल्लेख सापडतो. त्यापुर्वी १३ व्या शतकात देखिल या मंदिराचा उल्लेख सापडतो. येथील मुळ मंदिर १० व्या अथवा ११ व्या शतकातील असावे असे वाटते. मात्र आज मूळ मंदिराचे अवशेष फारसे दिसून येत नाहीत. सध्याचे मंदिर हे १८ व्या शतकात पेशवेकाळात बांधले गेले आहे. मंदिराचे शिखर नाना फडवणिसांनी बांधले होते. या मंदिराच्या देखरेखीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी खरोसी हे गाव मंदिरास दान दिले होते. या गावातून जमा होणा~या करावर मंदिरातील विधी आणि इतर खर्च पार पडत असे. या मंदिरास चिमाजी अप्पा पेशव्यांनी एक सुंदर घंटा भेट केली आहे, जी त्यांनी वसईच्या १७३९ च्या युद्धानंतर तेथील चर्चमधुन आणली होती. अशीच घंटा त्यांनी पाली येथील बल्लाळेश्वर आणि नाशिक येथील काळाराम मंदिरास भेट दिली होती.
मंदिर नागर शैलीमध्ये अतिशय सोप्या योजनेत बनविलेले आहे. गर्भगृहाच्या मध्यभागी शिवलिंग आहे आणि त्यासमोर अंतराळ आहे. समोरील सभामंडप १८व्या शतकात नाना फडविणासींने बांधवून घेतलेले आहे. इतर ज्यतिर्लिंगाप्रमाणे येथे देखिल मोक्ष्कुंड नावाने ओळखले जाणारे एक कुंड आहे. सोबतच ज्ञानकुंड नावाने आणखी एक कुंड आहे. मंदिरापासून जवळच कुशारन्य नावाने एक तिर्थ आहे, जेथून भिमा नदीचा उगम होतो. मंदिर परिसरात कमलजा माता, शाकिनी आणि डाकिनी (शिवगणांपैकी) आणि शनिदेवाचे मंदिर आहे.
भिमाशंकर मंदिरापासून जवळच शिवरायांचे जन्मस्थातन शिवनेरी आणि अष्टविनायकापैकी एक असलेले लेण्याद्रीचे गिरिजात्मज मंदिर देखील आहे. भिमाशंकर, लेण्याद्रीचा गिरीजात्मज आणि शिवनेरी गडावरील शिवाईदेवी असे मिळून शिव, पार्वती आणि गणेश असा परीवार या भागात विराजमान असल्याचे सांगण्यात येते.
५. घृष्णेश्वर मंदिर, वेरूळ, जि छ्त्रपती संभाजीनगर
युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळामध्ये समाविष्ट असणा~या वेरूळ (Ellora) लेण्यांपासून अगदी जवळच असलेले घृष्णेश्वराचे मंदिर हे परीसरातील अतिशय महत्वपूर्ण असे धार्मिक स्थळ आहे. छत्रपती शिवरायांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांचे हे आराध्यदैवत होते. घृष्णा या शब्दाचा अर्थ “अत्याधिक उष्ण” असा होतो. येथे उष्णता हे तापमानाचे एकक नाही तर प्रेमामध्ये असणा~या मायेचे एकक आहे. त्यामुळे घृष्णेश्वर शब्दाचा अर्थ “अत्याधिक माया करणारा इश्वर” असा होतो.
वेरूळचा परीसराचा इतिहास तसा बराच पुरातन असावा. मात्र त्याचे अभिलेखिय पुरावे ५ व्या शतकापासून पुढील काळाचे सापडतात. वेरूळ पासून अंदाजे ८० किमी अंतरावर असलेले पैठण (पुर्वीचे प्रतिष्ठान) हे सातवाहन काळात एक अतिशय महत्वपूर्ण व्यापारी केंद्र होते. त्याकाळी पैठण ते उज्जैन व्यापारी मालाची वाहतूक होत असे. यामध्ये देवगिरी (दौलताबाद) हे ठिकाण एक महत्वाचे केंद्र होते.
वेरूळच्या लेण्यांमध्ये उपलब्ध असणारे कित्येक शिलालेख ५व्या शतकानंतरच्या इतिहासाची साक्ष देतात. येल्लापूर म्हणजे आजचे वेरूळ हे राष्ट्रकुटांच्या तीन राजधान्यांपैकी एक होते. राष्ट्रकुटांच्याच काळात येथे वेरूळच्या लेण्यांची निर्मिती झाली आहे. इस ६ व्या शतकानंतर देवगिरी हे एक महत्वाचे सैन्यठाणे म्हणून समोर आले. पुढे यादव राजांनी याच देवगिरीला स्वत:ची राजधानी बनविली. १४ व्या शतकाच्या सुरूवातीला दिल्लीच्या सुल्तानांनी सर्वप्रथम या प्रदेशावर आक्रमण केले, आणि पुढील ४ शतके येथे सतत संघर्ष होत राहिला. घृष्णेश्वराचे मुळ मंदिर या आक्रमणांच्या आधिच्या काळातील आहे. राष्ट्रकुटांच्या काळात कदाचित हे एक छोटेसे मंदिर असावे. पुढे चालुक्य काळात या ठिकाणी मोठे मंदिर बांधण्यात आले. आजच्या मंदिराची मूळ रचना याच चालुक्यकाळातील आहे.
चालुक्यकाळातील मंदिरांप्रमाणेच गर्भगृह, अंतराळ आणि मंडप अशी या मंदिराची रचना आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी मंडपास तीन बाजूंनी प्रवेशद्वार आहे. मंदिराची मूळ रचना जरी चालुक्याकालिन पद्धतीची असली, तरी वरील शिखरावर १८ व्या शतकातील महेश्वर आणि मराठा शैलीचा प्रभाव लगेच जाणवतो. दिल्लीच्या सुल्तानचे हल्ले आणि नंतरच्या काळातील मराठे आणि मोघल यांच्यातील संअर्ष या पार्श्वभूमीमुळे मंदिरावर वारंवार हल्ले झालेले आहेत. त्यामुळे मंदिर वारंवार तोडण्यात आणि जिर्णोद्धारीत करण्यात आले. यामुळे मंदिर परीसरात आणि आजूबाजूच्या भागात बरीच भग्न शिल्पे दिसून येतात. या जिर्णोद्धारांमध्ये १६व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी, तर पुढे १८ व्या शतकात राणी अहिल्याबाई होळकर यांनी केलेल्या जिर्णोद्धाराची विशेष नोंद सापडते. मंदिर वास्तूच्या चारही बाजूला संरक्षक भिंत उभी केलेली आहे, जी कदाचित नंतरच्या काळात जिर्णोद्धारादरम्यान बनविली गेली असावी. मंदिर परीसरातच एक कुंड आहे. जवळपासच्या भागात अमृतकुंड या नावाने आणखी एक मोठे कुंड आहे, जे अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेले आहे.
घृष्णेश्वर मंदिराचे एक वैशिष्ट्य आहे ते येथे असलेले नागनाथ हे ग्रंथालय. या ग्रंथालयात पुरातन ग्रंथ आणि हस्तलिखितांचा एक मोठा संग्रह आहे. या संग्रहामुळे सांस्कृतिक संषोधनामध्ये मोठी मदत मिळते.
[…] नष्ट केली गेली असावीत. वेरूळ येथे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराजवळ एक हरीहर मंदिर आहे. मात्र येथील […]