लातूर जिल्यातील भुतमुगळी येथील एक पुरातन मंदिर
मराठवाड्यातील लातूर जिल्हा काही वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र होते. भारताचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर हे दोघेही लातूरचेच. मात्र या दोघांपेक्षा माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या नावानेच लातूरची जास्त ओळख झली. शैक्षणिक क्षेत्रातदेखिल लातूर पॅटर्न नावाने प्रसिद्द असलेला एक यशमंत्र आज केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात पोहोचला आहे. मात्र या पलिकडे जाऊन या शहराची एक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळखदेखिल आहे. सातवाहन, राष्ट्र्कुट, चालुक्य, यादव अशा विविध राजसत्तांच्या अधिपत्याखाली लातूर एक प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून कार्यरत होते. राष्ट्रकुट राजांच्या काळात लातूर हे राजधानीचे शहर होते असेदेखिल पुरावे आहेत. लातूरच्या या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाबद्दल आता फारशी चर्चा होत नाही.
रत्नापूर महात्म्य आणि लातूरचा इतिहास
लातूर शहराचा सर्वात जुना उल्लेख सापडतो तो पुराणामध्ये. स्कंद पुराणाचा भाग असलेल्या रत्नापूर महात्म्य या क्षेत्र महात्म्यात लातूर नगराचा आ्णि परीसराचा ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पौराणिक वारसा नमूद केलेला आहे. यात लातूरचे पौराणिक श्री सिद्धेश्वर मंदीर आणि इतर स्थळांचा महिमा वर्णिलेला आहे. लातूरमधील श्रीमान त्रिंबकअप्पा गिरवलकर आणि श्रीमती रत्नाबाई गिरवलकर यांनी हा वारसा जपून ठेवला आणि श्री सुधाकर जोशी या इतिहास संशोधकास सुपूर्द केला. श्री जोशी यांनी अथक परिश्रम करून या महात्म्याचे मराठी अनुवाद २००८ साली प्रकाशित केले. लातूरच्या ग्रामनामाचा शोध घेणारा एक श्लोक या महात्म्याच्या सहाव्या अध्यायात आहे.
कृते सत्यपुरं नाम त्रेतायां मधुपुरं स्मृतम्।
रत्नापुरं तु द्वापारे लातनुरं कलियुगे विदुः ॥
या श्लोकानुसार लातूर क्षेत्राला कृतयुगात सत्यपुर. त्रेतायुगात मधुपुर, द्वापरयुगात रत्नापूर आणि कलियुगात लातनुर म्हणून ओळखले जाते. पुढे आठव्या अध्यायाच्या एका श्लोकात त्रेतायुगात या नगराचे धीरपूर असेही एक नाव वर्णिलेले आहे. कलियुगातील लातनुर नावाचाच अपभ्रंश होऊन सध्याचे लातूर हे नाव प्रचलित झाले आहे.
या नगराबद्दल माहिती देणारा एक श्लोक याच अध्यायात आहे.
अनेक लिंगसहितं कासारेंद्र प्रकीर्तितम् ।
क्रोशमात्रं तु विस्तीर्णं अष्टतीर्थं समन्वितम् ॥
या श्लोकानुसार लातूर नगर त्याकाळी एक कोस विस्तारात वसलेले होते. पुर्वी कोस हे परीमाण अंतर मोजण्याकरीता वापरले जाई. एक कोस म्हणजे अंदाजे दोन मैल अथवा तीन किलोमीटरचा परीसर. या लातूर नगरात अनेक लिंगे, आठ तिर्थे आणि एक मोठे तळे होते असाही उल्लेख या श्लोकात मिळतो. ही लिंगे आणि आठ तिर्थे कोणती याचाही उल्लेख या महात्म्यात आढळतो.
सिद्धक्षेत्रस्य नामानि तीर्थानां चरितानि च ॥
अशा उल्लेखावरून हे नगर चक्राकार वसलेले होते असा संदर्भ मिळतो.
महात्म्याचा चौथा अध्याय या क्षेत्राचे अतिशय विस्तृतपणे वर्णन करतो.
शृणु साधो महाभाग लिंगतीर्थाभिधं क्रमात् ।
सिद्धेश्वराभिंधं लिंगं प्रथमं परिकीर्तितम् ॥
द्वितीयं चात्मलिंगंच सोमेश्वरं तितीयकम् ।
रत्नेश्वरं चतुर्थंच घृष्णेश्वर च पंचमम् ॥
घुलेश्वरं षष्ठतमं भीमाशंकर सप्तमम् ।
अमलेश्वरमष्टमं च भूतेश्वरं प्रकीर्तितम् ॥
भैरवेश्वरं दशमं हाटकेश्वर रूद्रकम् ।
रामेश्वरं रामलिंगं द्वादशं परिकीर्तितम् ॥
या श्लोकांनुसार लातूर नगरातील बारा प्रमुख लिंगांची नावे सांगण्यात आली आहे. ही बारा प्रमुख लिंगे सिद्धेश्वर,आत्मलिंग, सोमेश्वर, रत्नेश्वर, घृष्णेश्वर, घुलेश्वर, भीमाशंकर, आमलेश्वर, भूतेश्वर, भैरवेश्वर, हाटकेश्वर रूद्र, रामेश्वर रामलिंग अशी आहेत. या श्लोकांसोबतच पुढील काही श्लोकांमध्ये मुरूडेश्वर, भंडारेश्वर, पिनाकेश्वर, नैऋत्येश्वर, प्रचेतेश्वर, मातरिश्वेश्वर, कौवेश्वर, सुर्येश्वर, चंद्रनाथ, शुक्रार्क, ब्रम्हेश्वर, कैलासेश्वर, नारायणेश्वर, ज्योतिर्लिंगेश्वर, गणेश्वर, अप्सरेश्वर, गांधर्वेश्वर, मुरगेश्वर, यक्षेश्वर, चारणेश्वर, किन्नरैश्वर, दुर्गेश्वर, पालकेश्वर, पुष्करेश्वर, नारदेश्वर, वैद्यनाथ महेश्वर, वियज्योतिरीश, पृथ्वीश्वर, नंदीश्वर, हंसेश्वर, सागरेश्वर, वृष्णीश्वर, फाल्गुनेश्वर, धर्मेश्वर, पातालेश्वर, ज्ञानेश्वर, तत्वेश्वर, भुगोलेश्वर, वारणेश्वर, योगीश्वर, पुराणेश्वर अशी एकूण ४१ शिवमंदीरांची नावे दिलेली आहेत. त्यासोबतच “को वक्तुं सिद्धक्षेत्रे च लिंगसंख्यां विचक्षणः । ” अशीही एक ओळ येते ज्याचा अर्थ कोणताही पंडीत सिद्धक्षेत्रातील लिंगांची गणती करू शकणार नाही इतकी लिंगक्षेत्रे (शिवमंदिरे) या ठिकाणी आहेत असा होतो. या उल्लेखावरून लातूर नगरात व क्षेत्रात शिवपूजक (शैव) लोकांचे वर्चस्व होते असे दिसून येते.
लिंगक्षेत्रांसोबतच इतर महत्वपूर्ण मंदीरांचाही उल्लेख याच अध्यायात आढळतो.
केशवो नृहरिश्चैव पद्मजा गिरिजा सती ।
हरः श्रीधररूपश्च अनन्तः पन्नगेश्वरः ॥
जलशायी विश्वरूपी लक्ष्म्याचैव जगत्पतिः ।
दंडपाणिः कार्तिकेय श्चाष्टभैरवसंयुतः ॥
गजाननो मातृकाश्च अंजनीसुत संयुताः ॥
या श्लोकांनुसार क्षेत्रात केशव, नरसिंह, लक्ष्मी, पार्वती, महादेव, श्रीधर, अनंतशेषनाग, लक्ष्मीसहित जलशायी विष्णू, दण्डपाणि कार्तिकेय, आठ भैरव, गणपती, मातृका, हनुमान अशा विविध देवतांची मंदीरे होती. काही श्लोकांमध्ये परीसरातील प्रमुख तिर्थांची माहिती आढळते.
अथतिर्थानि वक्ष्यामि शृणु त्वं विधिनंदन ।
प्रथमं सिद्धतीर्थं च नृसिंहाख्यं ततः परम् ॥
भोगतीर्थमिति ख्यातं चतुर्थं नागतीर्थकम् ।
स्वामितीर्थ पंचमं तु पद्मतीर्थं ततः परम् ॥
रामतिर्थं सप्तमं तु पुष्करं चाष्टमं स्मृतम् ।
अष्टानामेव तीर्थानां प्रभुत्वे पापनाशिनी ॥
या श्लोकांनुसार परीसरात आठ प्रमुख तिर्थ होते. त्यांची नावे सिद्धतिर्थ, नृसिंहतिर्थ, भोगतिर्थ, नागतिर्थ, स्वामितिर्थ, पद्मतिर्थ, रामतिर्थ, पुष्करतिर्थ अशी आहेत.
लातूरचे विविध शिलालेखांतील उल्लेख
कोणत्याही राजसत्तेचा इतिहास अभ्यासण्याकरीता सर्वाधिक मदत होते ती त्या राजसत्तेच्या काळातील शिलालेख, ताम्रपट व इतर लिखीत साहित्याची. आपल्या सुदैवाने चालुक्य, राष्ट्रकुट, बहमनी, यादव इत्यादी राजसत्तांमधिल राजांनी व सरदारांनी बरेचसे पुरावे मागे सोडले आहेत. व यामधिल काही पुरावे आज उपलब्ध आहेत.
लातूर शहरातील सिद्धेश्वर मंदिरातील शिलालेख
लातूर हे ग्रामनाम इ. सनाच्या ६ व्या शतकापासून १४ व्या शतकापर्यंत काही शिलालेख, ताम्रपट व ग्रंथात उल्लेखलेले आहे. यामध्ये लत्तलूर, लत्तलौर, लत्तनूर आणि लातनूर अशा विविध नावांनी लातूरचा उल्लेख येतो. लातूरचा संदर्भ पहिल्यांदा इ स ८६६ च्या शिरूर शिलालेखात, इ स ८६६ च्या निलगुंद शिलालेखात व इ स १०४० च्या मंटुर शिलालेखात येतो. या सर्व शिलालेखांत लत्तलूर असा उल्लेख आढळतो. इ स ८१३ च्या शिरूर शिलालेखात राजा अमोघवर्ष याचे बल नमुद करण्यासाठी त्याच्या सैन्याची तुलना गरूडाशी केलेली आहे व अंग, बंग, मगध, माळवा व वेंगी प्रदेशाचे राजे अमोघवर्षाला मानित असत असे वर्णन आहे. य़ा शिलालेखात अमोघवर्षाची पदवी “लत्तलूराधीश्वर” अशी वर्तवलेली आहे. यावरून लत्तलूर (लातूर) हे त्याकाळी एक महत्वपूर्ण शहर आणि अमोघवर्षाच्या राजधानीचे शहर होते असे दिसून येते. निलगुंदच्या शिलालेखात अमोघवर्ष राजाच्या राज्याचा विस्तार दर्षविलेला आहे व यात लत्तलूरचा प्रामुख्याने येणारा उल्लेख या शहराचे महत्व दर्शवतो. इ स १००८ च्या सिताबर्डी (नागपूर) येथील कल्याणचा पश्चिमी चालुक्यनृपती त्रिभुवनमल्लदेच विक्रमादित्य (६वा) याच्या शिलालेखात धाडीभडक अथवा धाडीमंडक या नावाच्या मोठ्या राष्ट्रकूट वंशातील राजाला व त्याचा अधिकारी वासुदेव याला ‘लत्तलौरविनिर्ग्गत’ हे विषेषन लावलेले आहे. पुढे इ स १०४९ सालातील लातूरच्या पापविनाश मंदीर येथील शिलालेखात भुलोकमल्ल (सोमेश्वर) याची वंशावळ दिल्यानंतर लत्तलौर येथील पापविनाश देवाची स्तुती केलेली आहे.
लातूर जिल्ह्यातील कासारशिरसी येथे श्री दिनकरराव पवार यांच्याकडे दोन ताम्रपट उपलब्ध आहेत. यातील पहिल्या ताम्रपटात मंजरी (मांजरा) नदीचा उल्लेख आहे. सोबतच देवन (देव) नदीचाही संदर्भ आहे. या दोन नद्यांच्या संगम स्थळी अणंदि (आळंदी ता देवणी), सावरवल्लिग्राम (सावली/सावळी), चंदबुरी(चांदोरी ता. निलंगा), बेलकोंडा (बेडकुंदे), कुसुंवडीरुग्राम (कुसनूर ता निलंगा) या गावांचे संदर्भ प्राप्त होतात. दुसऱ्या ताम्रपटात चलुक्य पर्वत शेजारी चल्कीनाका (औढा नदी) असा उल्लेख आहे. या ताम्रपटात जमलग्राम (मोलखंडी), बुल्लवादलि (बेट जवळगा), मुगुली (भूतमुगळी) या गावांचा उल्लेख आढळतो. इस १०९९ सालच्या गणेशवाडी (हिप्पळगाव ता निलंगा) येथील शिलालेखात कल्याणपूर (कल्याणी जि. बिदर), पिप्पलग्राम (हिप्पळगाव ता. निलंगा), शुष्कग्राम (सुगाव ता निलंगा), मेघंकर (मेहकर जि. बिदर), पिप्परिखेट (पिंपरखेड ता. देवणी), नंदितट (नांदेड), शिवपूर (शिवपूर ता. निलंगा), मुरंबिका (मुरूम ता. उमरगा) या गावांचा उल्लेख आहे. इ स १२०८ च्या कार्तिकेय (चौथा) या यादव राजाच्या काळातील भोज ताम्रपटात लक्ष्मीदेव या राजाच्या पराक्रमाचे वर्णन केले आहे. या योद्ध्याने माळवा, चौला आणि गुर्जर राजांना सळो की पळो करून सोडले होते असे वर्णन आहे. या ताम्रपटात देखिल लत्तनूर असा उल्लेख आढळतो.
१२५८ सालचा कान्हेगाव (ता उदगीर) येथील शिलालेखही महत्वपूर्ण आहे. या शिलालेखात कान्हरदेव राजाच्या राजवटीचे वर्णन आहे. कान्हरदेवाचा मांडलिक राठौड वंशीय सोमवंशी कुळातील गोपालदेवाने स्वकीयांच्या आणि सर्वांच्या कल्याणासाठी केलेल्या लक्ष होमांच्या पुर्ततेसाठी काही गावे दान दिल्याचेही यात वर्णन आहे. या गावांमध्ये लत्तनौर (पातूर), तुर्रे (तुरूरी), सखवल (साकोळ), उजलं (उजळंब), कखरणे (काखनाळ), उदगिरी (उदगीर), कोणेय (ग्राम) (कान्हेगाव) अशा गावांचा संदर्भ येतो.
लातूरमधिल सिद्धेश्वर मंदीरातील शिलालेखात ३६ निर्वतने जमीन दान दिल्याचा उल्लेख येतो. हा शिलालेख खूप अस्पषट झालेला आहे. अंदाजे १२ व्या अथवा १३ व्या शतकातील हा शिलालेख असावा असा अंदाज आहे. मात्र या शिलालेखात उल्लेखलेली ग्रामनामे वाचता येत नाही आहेत. १४ व्या शतकातील कल्पसमूह या हस्तलिखितात उभयगंगा (गोदावरी) व बंजरा (मांजरा) तीर परिसरातील अनेक रसविषयक संदर्भ असून या परिसरातील ग्रामनामांचे, देवदेवतांचे आणि नदी पर्वतांचे संदर्भ आहेत. सैद महम्मद रसविषयक स्थळांचा शोध घेत असताना त्याने भेट दिलेल्या गावांचा यात उल्लेख आहे. या मध्ये वैद्यनाथाचे परेली (परळी वैद्यनाथ), नांदुरा (घाटनांदुर ता. अंबेजोगाई), परळी ते घाटनांदुर मार्गात दुर्गा देवी (डोंगर तुकाई देवी), जोगाईचा आंबा (अंबेजोगाई), लातनुर (लातूर), खरोसे (खरोसा ता. निलंगा), देऊले गाव (देवळेगाव) आदी गावांचा उल्लेख आहे.
याशिवाय इस ११२३ च्या तेरदळ शिलाकेखात, ११८८ च्या सौंदत्ती शिलालेखांत देखिल लातूरचा उल्लेख आढळतो. इसविसनाच्या सातव्या शतकापासून चौदाव्या शतकापर्यंतचे कोरीवलेखांचे, ताम्रपटांचे व हस्तलिखितांचे खात्रीलायक आधार अभ्यासले असता लातूर शहराच्या प्राचिनतेविषयी खात्री पटते.
लातूर व परिसरावरील विविध राजसत्तांचे राज्य
मराठवाड्याचा प्रदेश हा अतिशय पुरातन आहे. या भागातील गोदावरी व मांजरा नदीच्या काठावर ठिकठिकाणी झालेल्या उत्खननांमध्ये काही ठिकाणी पुरातन मानवी आणि प्राण्यांचे अवशेष सापडले आहेत. यावरून साधारणत: दिड ते तीन लाख वर्षांपासून या भागात मानवी वस्ती होती हे दिसून येते.
सातवाहन काळातील लातूर
इ स पूर्व दुस~या शतकापासून इतिहासात ब~याचदा जनपदांचा उल्लेख येतो. त्यामध्ये भोगवर्धन (भोकरदन), प्रतिष्ठान (पैठण), जिर्णनगर (जुन्नर) अशा नगरांचा उल्लेख येतो. यासोबतच “तगर” या प्राचिन व्यापारी केंद्राचादेखिल उल्लेख या काळातील ब~याच साहित्यांत येतो. टॉलेमी याच्या पुस्तकात “पैठाण नगराच्या उत्तर पूर्व दिशेला “तगर” नगर असल्याचे लिहीलेले आहे. “पेरिप्लस ऑप्फ़ एरिथ्रीयन सी” या पुस्तकातील वर्णनाप्रमाणे तगर हे ’दचिना द देसा’ मधिल दोन प्रमुख व्यापारी केंद्रांपैकी एक असल्याचा उल्लेख आहे. शिलाहारांच्या लेखात ’तंगर’ हे त्यांचे मूलस्थान असल्याचा उल्लेख आहे. इ स पूर्व ३ ~या शतकात ग्रीक व रोमन यांचा तगर शहराशी संबंध आला. इजिप्तचा राजा टॉलेमी फिलाडेल्फस याने इ स पूर्व २६८ मध्ये डायोनिसिस याला दक्षिण भारतात पाठविले होते तेव्हा त्यांना या शहराबाबत माहिती मिळाली होती. पुढे ॲरिओन याने तगर नगरीचा उल्लेख करताना सांगितले आहे की ग्रीक जेव्हा दक्षिण भारतात पोहोचले तेव्हा तगर हे महत्वाचे व्यापारी केंद्र बनले होते आणि ’आरिओक’ या नावाने ओळखले जात होते. अशा प्रकारे तेर नगरीविषयीचे उल्लेख पाहता हे स्पष्ट होते की या काळात तेर व परीसरात मोठ्या प्रमाणावर मानवी वस्ती होती. लातूरचा उल्लेख या काळातील साहित्यात कोठेही सापडत नसला तरी रत्नापूर महात्म्यांमधिल उल्लेख पाहता कदाचित लातूर शहर हे देखिल त्याकाळात अस्तित्वात असावे. औसा तालुक्यातील नागरसोगे भागात डॉ देविसिंग चौहान यांना सातवाहन काळातील काही नाणी आणि मणी सापडले आहेत. तसेच औसा शहरातील एका सराफाकडे सातवाहन राजांची नाणी उपलब्ध आहेत. ही नाणी इ स १३० ते १५९ या काळातील आहेत. हे पुरावे पाहता लातूर जिल्हा हा सातवाहन राजांच्या अधिपत्याखाली होता असे सांगता येईल.
बदामी चालुक्य काळातील लातूर
इ स पाचव्या शतकात कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या मोठ्या भूभागावर बादामीच्या चालुक्यांचे राज्य होते. त्याकाळी हे शहर वातापी नावाने ओळखले जात असे. वतापी नावाचा बलवान राक्षस तेथे वास करीत होता व त्याच्याच नावाने शहरास वातापी म्हटले जात असे असा उल्लेख आढळतो. रत्नापूर महात्म्यामध्येदेखिल लातूर शहर निर्मीतीची कथा सांगते वेळी खर्पर नावाचा राक्षस अतापी राक्षसाचा पुत्र आहे असे संदर्भ आलेले आहे. मात्र अतापी आणि वतापी हे दोन्ही एकच आहेत अथवा वेगवेगळे हे लक्षात येत नाही. याच वंशातील विनयादित्य (इ स ६८० – ६९६) व विक्रमादित्य (इ स ६९६ – ७३३) यांच्या काळातील काही ताम्रपटांमध्ये लातूर भागांतील काही गावांचा उल्लेख येतो. कासारशिरशी (ता निलंगा) येथे श्री दिनकरराव पवार यांच्याकडे दोन ताम्रपट उपलब्ध आहेत. यातील पहिल्या ताम्रपटात मंजरी (मांजरा) नदीचा उल्लेख आहे. सोबतच देवन (देव) नदीचाही संदर्भ आहे. या दोन नद्यांच्या संगम स्थळी अणंदि (आळंदी ता देवणी), सावरवल्लिग्राम (सावली/सावळी), चंदबुरी(चांदोरी ता. निलंगा), बेलकोंडा (बेडकुंदे), कुसुंवडीरुग्राम (कुसनूर ता निलंगा) या गावांचे संदर्भ प्राप्त होतात. दुसऱ्या ताम्रपटात चलुक्य पर्वत शेजारी चल्कीनाका (औढा नदी) असा उल्लेख आहे. या ताम्रपटात जमलग्राम (मोलखंडी), बुल्लवादलि (बेट जवळगा), मुगुली (भूतमुगळी) या गावांचा उल्लेख आढळतो. हे पुरावे पाहता लातूरचा प्रदेश या काळात बादामी चालुक्यांच्या अधिपत्याखाली होता हे खात्रीने सांगता येईल.
राष्ट्रकूट काळातील लातूर
खरोसा येथील राष्ट्रकुट कालीन लेण्या
इ स आठव्या शतकात मराठवाडा राष्ट्रकुटांच्या अधिपत्याखाली गेला. इ स ७५३ ते इ स ९७५ असा राष्ट्रकूट घराण्याचा राज्यकाळ होता. या काळात राष्ट्रकूट नावाची अनेक प्रादेशिक घराणी निरनिराळ्या भागांत होती. त्यांचा परस्परात काही संबंध होता अथवा नाही हे स्पष्ट करणारे पुरावे अद्यापतरी उपलब्ध नाहीत. राष्ट्रकूटांच्या काळातील राजकिय आणि धार्मिक इतिहास ब~याच शिलालेखांतून आणि ताम्रपटांतून उपलब्ध आहे. दंतिदुर्ग या राजाने इ स ७५३ साली या राज्याची स्थापना केली. याच घराण्यातील राजा अमोघवर्ष याच्याबद्द्लच्या उल्लेखांमध्ये “लट्टलूरपुराधिश्वर” ही उपाधी विविध शिलालेख आणि ताम्रपत्रांमध्ये आढळून येते. इ स ८१३ च्या शिरूर शिलालेखात राजा अमोघवर्ष याचे बल नमुद करण्यासाठी त्याच्या सैन्याची तुलना गरूडाशी केलेली आहे व अंग, बंग, मगध, माळवा व वेंगी प्रदेशाचे राजे अमोघवर्षाला मानित असत असे वर्णन आहे. य़ा शिलालेखात अमोघवर्षाची पदवी “लत्तलूराधीश्वर” अशी वर्तवलेली आहे. यावरून लत्तलूर (लातूर) हे त्याकाळी एक महत्वपूर्ण शहर आणि अमोघवर्षाच्या राजधानीचे शहर होते असे दिसून येते. निलगुंदच्या शिलालेखात अमोघवर्ष राजाच्या राज्याचा विस्तार दर्षविलेला आहे व यात लत्तलूरचा प्रामुख्याने येणारा उल्लेख या शहराचे महत्व दर्शवतो. लातूर जिल्ह्यातील खरोसा या ठिकाणी राष्ट्रकूट काळातील लेण्या आहेत. सोबतच हत्तीबेट, हासेगाववाडी आणि कमळगाव याठिकाणी देखील दुर्लक्षित लेण्या आहेत.
कल्याणी चालुक्य काळातील लातूर
धर्मापुरी येथील चालुक्यकालिन मंदिर
राष्ट्रकुटांनंतर कल्याणी चालुक्य राजे सत्तेवर आले. तैलपा (द्वितीय) या चालुक्य राजाने या राज्याची स्थापना केली. त्यांची राजधानी मान्यखेत (मानखेड ता. सेडम जि. गुलबर्गा) या ठिकाणी होती व नंतर पहिल्या सोमेश्वर राजाच्या काळात (इ स १०४२ – १०६८) कल्याणी (बसवकल्याण, जि बिदर) या ठिकाणी हलविली गेली. इ स ९५७ ते इ स १२०० असा २५० वर्षांचा प्रदिर्घ काळ कल्याणी चालुक्यांनी या परीसरावर राज्य केले. इ स ११२० साली बिल्हाण याने लिहीलेल्या “विक्रमंकदेव चरित” या पुस्तकात लातूर परिसराचे बरेच उल्लेख सापडतात. सोबतच चालुक्य काळाती ब~याच शिलालेखांमध्ये लातूरचा उल्लेख लत्तलौर व लट्टालूर असा आढळतो. इ स १००८ च्या सिताबर्डी (नागपूर) येथील कल्याणचा पश्चिमी चालुक्यनृपती त्रिभुवनमल्लदेच विक्रमादित्य (६वा) याच्या शिलालेखात धाडीभडक अथवा धाडीमंडक या नावाच्या मोठ्या राष्ट्रकूट वंशातील राजाला व त्याचा अधिकारी वासुदेव याला ‘लत्तलौरविनिर्ग्गत’ हे विषेषन लावलेले आहे. पुढे इ स १०४९ सालातील लातूरच्या पापविनाश मंदीर येथील शिलालेखात भुलोकमल्ल (सोमेश्वर) याची वंशावळ दिल्यानंतर लत्तलौर येथील पापविनाश देवाची स्तुती केलेली आहे. इस १०९९ सालच्या गणेशवाडी (हिप्पळगाव ता निलंगा) येथील शिलालेखात कल्याणपूर (कल्याणी जि. बिदर), पिप्पलग्राम (हिप्पळगाव ता. निलंगा), शुष्कग्राम (सुगाव ता निलंगा), मेघंकर (मेहकर जि. बिदर), पिप्परिखेट (पिंपरखेड ता. देवणी), नंदितट (नांदेड), शिवपूर (शिवपूर ता. निलंगा), मुरंबिका (मुरूम ता. उमरगा) या गावांचा उल्लेख आहे. इ स १२०८ च्या कार्तिकेय (चौथा) या यादव राजाच्या काळातील भोज ताम्रपटात लक्ष्मीदेव या राजाच्या पराक्रमाचे वर्णन केले आहे. या योद्ध्याने माळवा, चौला आणि गुर्जर राजांना सळो की पळो करून सोडले होते असे वर्णन आहे. या ताम्रपटात देखिल लत्तनूर असा उल्लेख आढळतो. १२५८ सालचा कान्हेगाव (ता उदगीर) येथील शिलालेखही महत्वपूर्ण आहे. या शिलालेखात कान्हरदेव राजाच्या राजवटीचे वर्णन आहे. कान्हरदेवाचा मांडलिक राठौड वंशीय सोमवंशी कुळातील गोपालदेवाने स्वकीयांच्या आणि सर्वांच्या कल्याणासाठी केलेल्या लक्ष होमांच्या पुर्ततेसाठी काही गावे दान दिल्याचेही यात वर्णन आहे. या गावांमध्ये लत्तनौर (पातूर), तुर्रे (तुरूरी), सखवल (साकोळ), उजलं (उजळंब), कखरणे (काखनाळ), उदगिरी (उदगीर), कोणेय (ग्राम) (कान्हेगाव) अशा गावांचा संदर्भ येतो. या सर्व शिलालेखांचा व ताम्रपटांचा अभ्यास करता लातूरचे कल्याणी चालुक्य काळातील महत्व अधोरेखित होते.
यादव काळातील लातूर
यादव हे चालुक्यांचे उत्तर सिमेवरचे मांडलिक होते. महाराष्ट्रावर राज्य करणारा एक इतिहास प्रसिद्ध राजवंश म्हणून देवगिरीच्या यादवांची ओळख आहे. यादवराजांनी कला आणि साहित्यनिर्मीतीला प्रोत्साहन दिले. प्रसिद्ध “हेमाडपंथी” मंदिरशैली याच काळात निर्माण झाली. यादव घराणे हे इसविसनाच्या ९ व्या शतकापासून अस्तित्वात असले तरी या घराण्यास स्वतंत्र दर्जा १२ व्या शतकाच्या मध्यात भिल्लम (५वा) याच्या काळात मिळाला. १३व्या शतकाच्या पहिल्या भागात सिंहन राजाच्या काळात हे साम्राज्य अगदी भरभराटीस होते. या साम्राज्याचे कन्नड, संस्कृत व मराठी भाषांमधिल ५०० पेक्षा अधिक शिलालेख प्राप्त झालेले आहेत. या शिलालेखांमध्ये लातूरचा व परिसरातील इतर गावांचा काही वेळा ओझरता उल्लेख येतो. १४ व्या शतकातील कल्पसमूह या हस्तलिखितात उभयगंगा (गोदावरी) व बंजरा (मांजरा) तीर परिसरातील अनेक रसविषयक संदर्भ असून या परिसरातील ग्रामनामांचे, देवदेवतांचे आणि नदी पर्वतांचे संदर्भ आहेत. सैद महम्मद रसविषयक स्थळांचा शोध घेत असताना त्याने भेट दिलेल्या गावांचा यात उल्लेख आहे. या मध्ये वैद्यनाथाचे परेली (परळी वैद्यनाथ), नांदुरा (घाटनांदुर ता. अंबेजोगाई), परळी ते घाटनांदुर मार्गात दुर्गा देवी (डोंगर तुकाई देवी), जोगाईचा आंबा (अंबेजोगाई), लातनुर (लातूर), खरोसे (खरोसा ता. निलंगा), देऊले गाव (देवळेगाव) आदी गावांचा उल्लेख आहे.
यानंतर इस १३१८ ते १९४८ असे ६३० वर्षे विविध मुस्लिम राज्यसत्तांनी या भागावर राज्य केलेले आहे. सप्टेंबर १९४८ मध्ये भारत सरकारने निजाम आणि रझाकारांसोबत केलेल्या युद्धानंतर (ज्याला ऑपरेशन पोलो अथवा पोलिस ऍक्शन असे म्हटले जाते) हा भाग स्वतंत्र भारताचा भाग बनला.
लातूर परीसरातील मंदिरांचा ठेवा
राष्ट्रकुट, चालुक्य आणि यादव या तीनही साजसत्तांच्या अधिपत्यामध्ये लातूर परीसर अतिशय महत्वपूर्ण होता. त्यामुळे येथे त्यांनी काही सुंदर मंदिरांची निर्मिती केली नसेल तर नवलच म्हणावे लागेल. आज लातूर शहरात अशी पुरातन मंदिरे कोठेही दिसत नाहीत. राष्ट्रकुट राजांनी काही सुंदर जैन आणि हिंदू मंदिरे बांधलेली आहेत. पट्टडक्कल येथील परमेश्वर मंदिर, सावडी येथील ब्रम्हनाथ मंदिर, हुळी येथील अंधकेश्वर मंदिर, कुकनुर येथील नवग्रह मंदिर अशी कित्येक मंदिरे आजही पाहता येतात. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलाश मंदिर देखील त्यांच्याच काळातील. मग इतकी सुंदर मंदिरे बनविणारे राष्ट्रकूट राजे स्वतःच्या गावात सुद्धा मंदिरे बनविणारच.
जवळपासच्या भागात धर्मापुरी, पानगाव, निलंगा आणि उमरगा या ठिकाणी सुंदर चालुक्यकालिन मंदिरे आहेत. मात्र त्यांच्या काळातील मंदिरे सुद्धा आज लातूरमध्ये दिसून येत नाहीत. याचे कारण आहे सातत्याने झालेली परकीय आक्रमने. लातूर शहर हे नेहमीच प्रमुख व्यापारी केंद्र राहिलेले आहे. लातूरच्या पापविनाश / भुतेश्वर मंदिरात असलेले शिलालेख या व्यापाराबद्दल स्पष्टपणे संदर्भ देतो. मात्र यादवांच्या नंदत सातत्याने मुस्लिम राजांनी येथे राज्य केलेले असल्याने येथील मंदिरांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली असावी.
लातूर शहरात असलेले वैष्णव केशवराज मंदिर आज काही प्रमाणात (केवळ गर्भगृह आणि अंतराळ) आपले जुने स्वरूप टिकवून आहे. या मंदिरातदेखिल गर्भगृहाचा बाहेरील भाग नंतर जिर्णोद्धारीत केलेला आहे. या ठिकाणी गर्भगृहातील केशवराज मुर्ती , आणि देवकोष्टात असलेल्या आणखी काही मुर्त्या या अतिशय उत्तम कलाकुसर असलेल्या आहेत. या व्यतिरीक्त शहरातील सिद्धेश्वर मंदिर येथे एक अतिशय सुंदर उमा महेश्वराची मुर्ती आहे. शिव, पार्वती, गणेश आणि कार्तिकेय या सर्वांचे एकत्र असलेले हे शिल्प होयसळा प्रभावाची जाणिव करून देणारे आहे. भिमाशंकर आणि रामलिंगेश्वर मंदिराच्या परीसरात काही पुरातन मुर्त्या आणि विरगळ दिसून येतात.
मंदिराच्या शेजारी कुंड अथवा बारव बांधण्याची पद्धत चालुक्य काळात लोकप्रिय झाली. जलव्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण म्हणून याकडे पाहिले जाते. रत्नापूर महात्म्य या ग्रंथात अशी ८ तिर्थे लातूरमध्ये असल्याचा उल्लेख आहे. आज रत्नेश्वर मंदिर शेजारी असलेले कुंड, पापविनाश पुष्करणी आणि बालाजी मंदिरशेजारी असलेले बारव तग धरून आहे. रामलिंगेश्वर मंदिरासमोर असेच एक कुंड होते असे गावातील वयस्क मंडळी सांगतात. पुढील काळात रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी हे कुंड बुजविण्यात आले आहे. या सर्व कुंडांमध्ये देवकोष्टांमध्ये काही सुंदर शिल्पे दिसून येतात. गावातील पुरातन जैन मंदिराच्या गाभा~यात काही सुंदर जैनमुर्ती दिसून येतात. गावातील मंदिरे जरी आक्रमणामध्ये तोडली गेली असतील आणि पुढील काळात नविन स्वरूपात बांधली गेली असतील, तेरी हे कुंड आणि शिल्प गावाच्या पुरातन इतिहासाची साक्ष नक्कीच देतात.