कोल्हापूरची अंबाबाई : लक्ष्मी की शक्ती ?

पंचगंगा नदीच्या काठावर वसलेल्या कोल्हापूर शहराला दरवर्षी लाखो भक्त भेट देतात. या शहराला इस १ ल्या शतकापर्यंत जुना इतिहास आहे. ८ व्या शतकामध्ये दक्षिण महाराष्ट्र आणि उत्तर कर्नाटक भागावर राज्य करणार्‍या शिलाहार घराण्याची ही राजधानी होती.उत्तम कलाकुसरीने युक्त मंदिरांमुळे कोल्हापूरला दक्षिण काशी या नावानेदेखिल ओळखले जाते. हे शहर विशेष प्रसिद्ध आहे ते अंबाबाईच्या मंदिरामुळे. शिलाहार घराण्याची कुलदेवता असलेली अंबाबाई पुढील काळात कोल्हापूर भोसले वंशाची देखिल कुलदेवता बनली, आणि महालक्ष्मी या नावाने ओळखली जाऊ लागली.

महालक्ष्मी मंदिराबद्दल एक आख्यायिका प्रसिद्ध आहे. संपुर्ण ब्रम्हांडात भ्रमण करणारे भृगू ऋषी एकदा ब्रम्हलोकात पोहोचले. तेथे ब्रम्हांनी त्यांच्याकडे लक्ष न दिल्याने त्यांनी ब्रम्हांना शाप दिला, ज्यामुळे आजही ब्रम्हांची पूजा होत नाही. तेथून ते कैलाश पर्वतावर महादेवांकडे गेले. मात्र तेथेदेखिल लक्ष न दिले गेल्याने त्यांनी महादेवांना शाप दिला की त्यांची पुजा केवळ लिंगरूपातच केली जाईल. हे भृगू ऋषी पुढे वैकुंठात विष्णूकडे पोहोचले. विष्णू शेषशय्येवर झोपले होते आणि लक्ष्मी त्यांच्या शेजारी बसलेली होती. झोप लागलेली असल्याने भृगूंकडे विष्णुंचे लक्ष गेले नाही. रागात येऊन भृगूंनी विष्णूच्या छातीवर लाथ मारली. यामुळे विष्णूंची झोप तुटली. समोर भृगूंना पाहताच विष्णूंनी त्यांना प्रणाम केला आणि माफी मागून त्यांचे आदरातिथ्य केले. मात्र या सर्व प्रकरणात लक्ष्मी नाराज झाली होती. कारण विष्णूंच्या छातीमध्ये (ह्रदयात) लक्ष्मींची जागा होती. आणि याचठिकाणी भृगूंनी लाथ मारली होती. विष्णूने मात्र यावर काहीही प्रतिक्रिया न देता उलट भृगूंचे आदरातिथ्य केले होते. नाराज होऊन लक्ष्मीने वैकुंठ सोडले, आणि ती पृथ्वीवर येऊन रहायला लागली. कोल्हापूर या ठिकाणी लक्ष्मीने राहण्यास सुरूवात केली. लक्ष्मीच्या शोधात विष्णू देखिल पृथ्वीवर आले व दक्षिण भारतातील पहाडांमध्ये ते लक्ष्मीला शोधू लागले. याच ठिकाणी पद्मावती नावाच्या राजकन्येसोबत त्यांची भेट झाली, आणि पद्मावतीसोबत विवाह करून ते तिरूमला या ठिकाणी स्थायिक झाले. या कथेद्वारे दक्षिण भारतातील एका वैष्णव मंदिराचा संबंध खूप उत्तम प्रकारे पश्चिम भारतातील एका शाक्त मंदिरासोबत जोडला गेला आहे. आजच्या काळत ही कथा खूप लोकप्रिय असली तरीही पुराणांमध्ये या कथेचा काहीही उल्लेख आढळत नाही.

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या गर्भगृहात अंबाबाई भक्तांना दर्शन देण्याकरीता उभी आहे. अंबाबाईच्या चार हातांपैकी एका हातात गदा, एका हातात ढाल, एका हातात महाळुंगाचे फळ आणि एका हातात पानपात्र आहे. देवीच्या पायाजवळ सिंह (देवीचे वाहन) कोरलेले आहे. डोक्यावरील मुकुटावार एक नागासारखी आकृती कोरलेली आहे. अंबाबाईचे हे मंदिर इस ६३४ साली बदामी चालुक्य काळात बनलेले आहे. पुढील काळात या मंदिरामध्ये बरेच बदल झाले. परकीय आक्रमणांमध्ये वारंव मंदिराची मोडतोड करण्यात आली, आणि पुन्हा पुन्हा मंदिर जिर्णोद्धारीत करण्यात आले.

मागील काही वर्षांमध्ये अंबाबाईची ही मुर्ती लक्ष्मीचे रूप आहे की शक्तीचे याबद्दल चर्चा सुरू आहे. वास्तविक हा विवादाचा मुद्दा असू शकत नाही. लक्ष्मी असो अथवा शक्ती, अंबाबाईचे महत्व आणि पावित्र्य हे अबाधितच असणार आहे. मात्र केवळ तांत्रिकदृष्ट्या चर्चा करण्याकरिता मी येथे काही मुद्दे मांडू इच्छितो.

१. कोल्हापूरच्या या मंदिराचा समावेश शक्तीपिठांमध्ये केला जातो. संपूर्ण भारत तसेच नेपाळ आणि बांग्लादेशचा काही भाग यांमध्ये मिळून एकूण ५१ शक्तीपिठे सांगितली जातात. हे सर्व शक्तीपिठ हे आदि शक्तीच्या विविध रूपांना समर्पित आहेत. शक्तीपिठांच्या निर्मितीबद्दल एक कथा विविध पुराणांमध्ये समाविष्ट आहे. शक्तीने जेव्हा सती रूपामध्ये अवतार घेऊन महादेवांसोबत विवाह केला होता, त्यावेळची ही कथा आहे. सतीचे वडील दक्ष यांनी एक यज्ञ आयोजित केलेला होता, जेथे महादेवांना सोडून इतर सर्व जावयांना दक्षाने आमंत्रित केले होते. दक्षाचे सर्व जावई हे विविध देवतागण होते. सतीला वाटले की महादेवांना आमंत्रित करणे दक्ष चुकून विसरले असावे. त्यामुळे सती न बोलावणे येताही तेथे उपस्थित झाली. यावेळी दक्ष राजाने महादेवांच्या राहणीमान आणि वेशभुषेवरून सतीला हिनवले. पतीचा अपमान सहन न झाल्याने रागाच्या भरात तिने यज्ञकुंडात उडी मारून आत्मदाह करून घेतला. सतीच्या अशा प्रकारे निघून जाण्यामुळे महादेवांना खूप रग आला. विरभद्र रूपात त्यांनी दक्ष राजाचा यज्ञ उद्ध्वस्त केला आणि दक्ष राजास मारून टाकले. मात्र त्यांचा राग येथेच शांत झाला नाही. राग आणि शोकाच्या भरात त्यांनी सतीचे अर्धवट जळालेले मृतदेह आपल्या खांद्यावर घेतले आणि संहार तांडव हे नृत्य आरंभ केले. संहार तांडवामुळे संपूर्ण ब्रम्हांड नष्ट होईल अशी भिती सर्व देवतांना वाटू लागली. महादेवांना शोकस्थितीतून बाहेर काढण्यासाठी विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या शरिराचे तुकडे केले. सतीच्या शरीराचे हे तुकडे पृथ्वीवर ज्या ज्या ठिकणी पडले, तेथे एक शक्तीपिठ निर्माण झाले. महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर सोबतच तुळजापूर (जि धाराशिव) आणि माहू्र (जि नांदेड) अशी आणखी दोन शक्तीपिठे आहेत. तर वणी (जि नाशिक) येथील सप्तशृंगी देवीला अर्धे शक्तीपिठ मानण्यात येते. कोल्हापूर येथे सतीचा डोळा पडला होता असे मानले जाते. यामुळे आपोआपच या जागेचा संबंध सती (शक्तीचे एक रूप) यांच्यासोबत जोडला गेलेला आहे.

२. प्रत्येक देवीदेवतेसोबत एक प्राणी जोडला गेलेला आहे. हा प्राणी त्या देवतेचे वाहन किंवा सहकारी म्हणून मानला जातो. विष्णूसोबत असलेला गरूड, महादेवांसोबत असलेला नंदी (बैल), गणपतीसोबतचा मूषक (उंदीर) हे याचे काही उदाहरणे आहेत. याचप्रमाणे लक्ष्मीसोबत हत्ती आणि शक्तीसोबत वाघ किंवा सिंह हे प्राणी दिसून येतात. कोल्हापूरच्या अंबाबाईच्या गर्भगृहाच्या अगदी जवळच वाहनमंडपामध्ये एक सिंह आहे. अंबाबाईच्या मुर्तीमध्ये देखिल एक सिंह कोरलेला आहे. त्यामुळे या मुर्तीचा शक्तीसोबत असणारा संबंध अधोरिखित होतो.

३. प्रत्येक वर्षी नवरात्री किंवा दसरा महोत्सवाच्या वेळी या मंदिरात बोकडाचा बळी देण्याची परंपरा आहे. अंबाबाईची देवी गरम आणि तीव्र स्वभावाची मानली जाते. त्यामुळे देवीला शांत आणि प्रसन्न करण्यासाठी अशाप्रकारे बळी दिला जातो. आज जरी ही प्रथा अस्तित्वात नसली, तरी पुर्वी असा बळी दिला जात असे याचे बरेच प्रमाण सापडतात. अशा प्रकारे प्राण्यांचा बळी देण्याची पद्धत शक्तीशी संबंधित शाक्त परंपरेत; विशेषतः आदिवासी भागांमध्ये; दिसून येते. शिव अथवा शक्तीच्या विविध रूपांच्या मंदिरमध्ये ही पद्धत आहे. मात्र विष्णू किंवा लक्ष्मीशी संलग्न कोणत्याही मंदिरात अशी पद्धत नाही.

४. अंबाबाईच्या हातांमध्ये मोठी ढाल, गदा, पानपात्र आणि महाळूंगाचे फळ आहे. या सर्व वस्तू लक्ष्मीशी संबंधित नाही आहेत. लक्ष्मी ही संपत्ती, संतती, समृद्धी आणि सौंदर्य यांची देवता आहे. त्यामुळे लक्ष्मीशी संबंधित वस्तूंमध्ये कमळाचे फूल, पाण्याचे भांडे, सोन्याने भरलेले पात्र अशा वस्तूंचा समावेश होतो. स्कंद पुराणातील लक्ष्मी सहस्त्रनाम सारख्या काही साहित्यामध्ये लक्ष्मीला योद्धा स्वरूपात देखिल उल्लेखलेले आहे. या रूपात लक्षमीच्या हातात काही शस्त्रे असू शकतात. मात्र मुर्तीकलेमध्ये लक्ष्मीला अशा प्रकारे शस्त्र धारण केलेल्या रूपात कोठेही पाहण्यात नाही.

५. अंबाबाईच्या मंदिराच्या गर्भगृहाच्या वरील मजल्यावर एक महादेवाचे मंदिर असल्याचे म्हणले जाते. या ठिकाणी सामान्य नागरिकांना जाण्याची परवानगी नाही. मात्र मंदिराच्या अधिकृत वेबसाईटवर याबद्दलची माहिती उपलब्ध आहे. या मंदिरामध्ये एक गणेशमुर्ती असल्याचे देखिल नमूद करण्यात आले आहे. देवीच्या गर्भगृहाच्या वरील मजल्यात अशा प्रकारे महादेव आणि गणेशाची मुर्ती असणे हे या मंदिराच्या शक्तीसोबत असलेल्या संबंधाबाबत महत्वपूर्ण भाष्य आहे.

६. अंबा हे नाव कदाचित अंबिका या शब्दाचे अपभ्रंशित रूप असू शकते. महाभारतात अंबा, अंबिका आणि अंबलिका नावाच्या तीन बहिणींची कथा आहे. अंबिका हे शक्तीचे एक नाव आहे. मार्कंडेय पुराणाचा एक भाग असलेले देवी महात्म्य किंवा देवी भागवत पुराण अशा ग्रंथांमध्ये अंबिकेला सर्व देवींचे मूळ रूप अथवा पूर्वज मानले गेलेले आहे. अंबिकेलाच भद्रकाली, चंडी, महाकाली, मातृका, मिनाक्षी, कामाक्षी, नवदुर्गा या काही नावांनी संबोधले गेले आहे. ही सर्व नावे शक्तीशी संबंधित आहेत.

वरील सर्व बाबींचा विचार करता अंबाबाई हे शक्तीचे स्वरूप असण्याची शक्यता वाटते. मात्र येथे एक प्रश्न हा निर्माण होतो की जर अंबाबाई शक्तीशी संबंधित असेल, तर त्यांचे नाव महालक्ष्मी कसे पडले असावे?

छत्रपती शिवरायांच्या वंशजांमध्ये भेद पडून कोल्हापूर आणि सातारा असे दोन साम्राज्य निर्माण होणे ही मराठी साम्राज्याच्या इति्साहातील एक महत्वपूर्ण घटना आहे. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर आणि छत्रपती शाहू महाराज अहमदनगर येथील किल्ल्यातील कैदेतून सुटून आल्यानंतर शाहू महाराज हे सातारा गादीचे राजे बनले, आणि राजाराम महाराजांची विधवा पत्नी ताराबाई यांनी कोल्हापूर येथे राज्य स्थापन केले. यापूर्वी तुळजापूर येथील तुळजाभवानी ही भोसले घराण्याची कुलदेवता होती. विभाजनानंतर तुळजापूर हे गाव सातारा येथील भोसले घराण्याच्या हिश्यात गेले. त्यामुळे कोल्हापूर गादीने कोल्हापूरची ग्रामदेवता असलेल्या अंबाबाई देवीला आपली कुलदेवता म्हणून स्विकार केले.

विजापूरची आदिलशाही आणि मोघल यांच्याकडून सतत होत असलेल्या हल्ल्यांमुळे त्यावेळेला अंबाबाईची मुर्ती लपवून ठेवण्यात आलेली होती. ही मुर्ती शहरातील कपिल तिर्थ भागातील एका घरात सापडली. ८ नोव्हेंबर १७२३ रोजी छत्रपती संभाजीराजे यांनी लिहीलेल्या एका पत्रानुसार २६ सप्टेंबर १७१२ या साली (आश्विन विजयादशमी / दसरा) पन्हाळा येथील सिंधोजी हिंदुराव घोरपडे यांनी ही मुर्ती पुनर्स्थापित केली. ही मुर्ती पुनर्स्थापित करताना तीला महालक्ष्मी हे नाव देण्यात आले. शक्तीच्या मुर्तीला महालक्ष्मीचे नाव देण्यामागे कदाचित सांकेतिक अर्थ असावा. पुर्वीची कित्येक दशके सतत युद्ध सुरू होते. छत्रपती शिवरायांनी अगदी शुन्यातून साम्राज्य उभे केले होते. आता या साम्राज्याच्या भरभराटीसाठी बळ आणि युद्धापेक्षा आर्थिक संपन्नतेची अधिक आवश्यकता होती. त्यामुळेच या देवीची लक्ष्मी रूपात पुजा सुरू झली असावी. महालक्ष्मी हे नाव पुढील काळात रूढ झाले, आणि आपण आजही त्याच नावने संबोधन करतो. मात्र अंबाबाई हे मूळ नाव आजदेखिल प्रचलित आहेच.

शेवटी अंबाबाई शक्तीरूप आहे की लक्ष्मीरूप, याच्याने भक्तांच्या भक्तीमध्ये काहीही फ़रक पडणार नाही आहे. सबंध महाराष्ट्राची अंबाबाईंच्या प्रति असणारी भक्ती आणि श्रद्धा अश्या विषयांवर आधारीत नाही आहे. आणि कधीच नसणार.

By Dr Dinesh Soni

Dinesh is an an indologist and is writer of 18 books. He holds a doctorate in cultural studies. He is felicitated by Acedemia Sinica, Taipei, Taiwan for his research in mythology. He has received numerous awards including the Lokmat Digital Influencer Award (Heritage). Dinesh is also a speaker who has graced many occasions. He is the main admin of Indian.Temples.

One thought on “कोल्हापूरची अंबाबाई : लक्ष्मी की शक्ती ?”
  1. […] हातामध्ये हे फळ देवीने धारण केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महालक्ष्मी देवी … आहे. तिच्या उजव्या हातात हे फळ धारण […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *