विरगळ (Hero Stone) हे साधारणतः एखाद्या महान योद्ध्याची आठवण म्हणून उभे केले जाते. हा योद्धा एखाद्या लढाईत मरण पावलेला असू शकतो किंवा त्याने एखाद्या युद्धात अतुलनिय पराक्रम गाजविलेला असू शकतो. अशा योद्ध्याची आठवण जपून ठेवण्यासाठी विरगळ उभारले जाते.
विरगळ हा प्रकार अगदी लोहयुगापासून वापरात आहे असे काही इतिहासकारांचे मत आहे. मात्र बहुतांश विरगळ इस ५ व्या ते इस १३ व्या शतकातील आढळून येतात. विरगळ हा प्रकार सर्वाधिक प्रमाणात चालुक्य व राष्ट्रकूट घराण्यांचे प्राबल्य असलेल्या कर्नाटक राज्यात आढळून येतो. सोबतच तामिळनाडू व महाराष्ट्राच्याही ब~याच भागात विरगळ आढळून येतात. कन्नड प्रदेशातील कल्याणी चालुक्य, राष्ट्रकूट ह्या राजघराण्यांची सत्ता ज्या प्रदेशांवर पसरली होती, तेवढ्याच भागात विरगळ आढळतात. महाराष्ट्रात आढळणारे वीरगळ मुख्यत्वे मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र आणि कोकणचा बोरिवलीपर्यंतचा भाग इतक्या प्रदेशात पसरलेले आहेत. यांना ऐतिहासिक व शिल्पशास्त्रिय महत्त्व आहे.
काही भागांमध्ये या योद्ध्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याकरीता आणि अपशकुन टाळण्याकरीता या विरगळींची देवाच्या स्वरूपात पुजा केली जाते. काही ठिकाणी या वीरांना “पंचवीर” अथवा “बावनवीर” अशा प्रकारे संख्यांच्या स्वरूपात देखिल संबोधित केले जाते. देशाच्या काही भागात या विरगळींमधिल पुरूष योद्ध्यांना नरसिंह, झोटिंग, चेडा, वेताळ, म्हसोबा, मुन्जा, भैरव अशा नावांनी ओळखले जातात तर महिला योद्ध्यांना तुकाई, मायाराणी, जाखामाता असे संबोधले जाते. कलगीतुरा या महाराष्ट्रातील पारंपरिक संगित प्रकारामध्ये काही काव्यांमध्ये या बावनवीरांना देवस्वरूपात व्यक्त केलेले आहे आणि शत्रूवर विजय मिळवण्याकरिता या विरांचा आशिर्वात मागितला जातो.
या विरगळींमधिल योद्ध्यांचा संबध पौराणिकदृष्ट्या यक्षासोबत देखिल जोडला जातो. शक्यतो शांत आणि दयाळू पण काही वेळा खोडकर असलेल्या या निसर्ग शक्तींसोबत योद्ध्यांना जोडण्यामागे एक महत्वपूर्ण कारण आहे. महाभारतामध्ये “शास्त्रेण निधनं प्राप्ता गतास्ते गुहयकान्प्रती” असे एक वचन आहे. ज्याचा अर्थ “शस्त्राने मरण पावलेल्या योद्ध्याला यक्षांच्या जगात जागा मिळते” असा आहे. काही ठिकाणी हे योद्धे इच्छा पूर्ण करतात अशीही मान्यता आहे.
उंबार्डी, जि रायगड येथील विरगळी. छायाचित्र सौजन्य : Kevin Standage
विरगळ साधारणतः ३ भागांत विभागलेले पाहिले जाते. सर्वात वरच्या भागात हा नायक एखाद्या देवाला (बहुतांश ठिकाणी शिवलिंग) पूजताना दाखवले जाते. य़ा सोबत सुर्य व चंद्राची प्रतिमादेखिल साकारलेली असते. दुस~या भागात या नायकाला पालखित बसवून नेताना अथवा आकाशातील अप्सरा आकाशात घेऊन जाताना दाखविले जाते. तर अगदी खालच्या स्तरात योद्ध्याला ज्या कारणाने मरण आले तो देखावा साकरला जातो. साधारणपणे ४ प्रकारचे देखावे पाहण्यात येतात. डाकू व चोरांपासून प्राण्यांना वाचविताना आलेले मरण, प्राण्य़ांना अथवा गावकर्यांना वाघ अथवा सिंहासारख्या हिंस्त्र प्राण्यापासून वाचविताना आलेले मरण, परकिय आक्रमणापासून गावाला वाचविताना आलेले मरण आणि युद्धात इतर योद्ध्यासोबत लढाई करताना आलेले मरण असे हे चार देखावे आहेत. या व्यतिरीक्त काही ठिकाणी आत्मत्याग (self-sacrifice), समुद्रातील चढाईदरम्यान आलेले मरण, वाळवंटातील युद्धात आलेले मरण असे देखावे देखिल पहायला मिळतात. काही तुरळक ठिकाणी मोठ्या साधूंच्या विरगळीदेखिल पहायला मिळतात. बरेचसे विरगळ हे असे तीन स्तरात विभागलेले असले तरी काही ठिकाणी चार अथवा पाच स्तरात विभागलेले विरगळदेखिल आढळलेले आहेत.
विरगळीप्रमाणेच सतिशिळा हा देखिल एक महत्वपूर्ण पुरातत्विय अवशेष आहे. पुर्वीच्या काळी पतीच्या मरणानंतर सती जाणे म्हणजे पतीच्या चितेमध्ये आत्मदाह करण्याची पद्धत होती. अशी पतिव्रता स्त्री देवत्वास पोहोचते अशी त्याकाळी मान्यता होती. आपल्या पतीच्या म्हणजेच महादेवाच्या अपमानामुळे शक्तीचे स्वरूप असलेल्या सतीने दक्षाच्या महालामध्ये आत्मदाह केला होता. यामुळेच पतीच्या मृत्यूनंतर आत्मदाह करण्याच्या पद्धतीला सती हे नाव मिळाले आहे.
विरगळीप्रमाणेच या सती गेलेल्या स्त्रियांच्या स्मरणार्थ सतीशिळा उभी करण्याची पद्धत पुर्वापार आहे. या सतीशिळा विरगळीप्रमाणेच दगडामध्ये कोरलेल्या आहेत. साधारणतः सतीशिळेवर आकाशाकडे पाचही बोटे असलेला आणि कोप~यातून काटकोनात दुमडलेला हात कोरला गेला आहे. मात्र काही ठिकाणी विरगळीप्रमाणेच तीन अथवा चार स्तराची सतीशिळादेखिल दिसून येते. या सतीशिळेमध्ये सर्वात खालच्या स्तरात सती गेलेल्या स्त्रीचा पती कशाप्रकारे मरण पावला (युद्ध, वन्य श्वापदांपासून रक्षण करताना, दरोडेखोरांपासून रक्षण करताना इ) हे कोरले जाते. त्याच्या वरील स्तरात या स्त्रीला पालखीमध्ये घेऊन आकाशात जाणा~या अप्सरा कोरलेल्या आहेत. तर सर्वात वरच्या स्तरात सती गेलेली स्त्री आपल्या पतीसह शिवपूजा करीत असलेले दिसून येते.
तळिखेड, जि लातूर येथील एक सतिशिळा
महाराष्ट्र आणि कर्नाटकाप्रमाणेच राजस्थान आणि गुजरात मध्ये देखिल सतीचे स्मारक दिसून येते. मात्र या ठिकाणी काटकोनात दुमडलेला हात कोरला जात नाही. त्याठिकाणी सतीच्या हाताचे ठसे असल्याप्रमाणे पंजा कोरला जातो. राजस्थानातील झुंझुनु येथे “राणी सती” या नावाने एक प्रसिद्ध लोकदेवतेचे मंदिर आहे. दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात.
वीरगळ हा प्रकार राष्ट्रकूट आणि चालुक्य काळात मोठ्या प्रमाणात दिसतो. मात्र सती स्मारक हा प्रकार त्याच्या नंतरच्या काळातील (यादव आणि त्यानंतर) मंदिरांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. विजयनगर काळामध्ये मोठ्या प्रमाणात सतीशिळा निर्माण झालेल्या दिसून येतात. यामागे महत्वाचे कारण होते ते म्हणजे त्याकाळी परकीय आक्रमकांकडून महिलांवर होणारे अत्याचार. अशे अत्याचार सहन करण्याऐवजी आत्मदाह करण्याचा पर्याय त्याकाळी वीर स्त्रियांनी निवडला होता. पुढील काळात या स्वयंरक्षणासाठी सुरू झालेल्या प्रकाराचे दुर्दैवाने विधीमध्ये रूपांतरण झाले. मात्र प्रत्येक स्त्रीसाठी सती होणे हे आवश्यक मानले गेले नाही. यामुळेच १७व्या शतकानंतर (छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर) फारसे सती जाण्याचे उदाहरण दिसत नाही.
युद्धामध्ये मृत्युमुखी पडलेल्या विरयोद्ध्यांचे स्मारक बांधण्याची पद्धत आजदेखिल अस्तित्वात आहे. War memorial च्या स्वरूपामध्ये आजही आपल्याला नविन स्वरूपातील विरगळी पाहण्यास मिळतात. सुदैवाने आज सतीप्रथा अस्तित्वात नाही. मात्र सतीशिळा आणि विरगळींचे गावांमध्ये असणारे अस्तित्व आजही त्या गावाच्या प्राचिनत्वाची ग्वाही देतात. पुढील पिढीने या अवशेषांचे महत्व समजून त्यांचे जतन करावे ही अपेक्षा आहे.