बारव आणि कुंड : प्राचिन जलव्यवस्थापन तंत्र

मानवी वसाहतीसाठी पाणी हे अतिशय महत्वपूर्ण घटक आहे. सिंधू संस्कृती ही नदीकाठी विकसित झाली होती. सिंधू संस्कृतीतील उत्खननांमध्ये अनेक विहीरींचे अवशेष सापडलेले अहेत. प्रत्येक गावात तीन-चार घरांमध्ये एक विहीर असल्याचे दिसून येते. नंतरच्या काळात स्थापन झालेली मोठी मानवी वसाहत ही महाजनपद काळात दिसून येते. या काळात वस्ती मोठ्या प्रमाणात नद्यांच्या काठावर दिसून येते. महाराष्ट्रात या काळातील मोठ्या वसाहतींचा विचार करता गोदावरी काठावर नाशिक, पैठण आणि बोधन; तेरणा काठी तेर; कुकडी काठी जुन्नर; केलना काठी भोकरदन; वैनगंगा काठावर पौनी; उल्हास नदीकाठी कल्याण या ठिकाणी सातवाहन कालिन वस्ती दिसून येते. पुढील काळात मानवी वस्ती इतर ठिकाणी स्थलांतरीत होण्यास सुरूवात झाली. वाढलेल्या मानवी वस्तीसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी नदीचे काठ अपुरे पडू लागल्यानंतर पर्यायी मार्गांचा शोध सुरू झाला. आणि यातूनच निर्मिती झाली भुगर्भातील पाण्याचा वापर करण्यासाठी विहीरी आणि बारव निर्मितीची. राष्ट्रकूट काळात महाराष्ट्राच्या विविध भागांत अशा बारवांची निर्मिती सुरू झाली. आणि पुढील चालुक्य, यादव आणि विजयनगर काळात मोठ्या प्रमाणात बारवांची निर्मिती करण्यात आली.

नद्यांच्या काठावरील घाट

नद्यांच्या काठावर राहणार्‍या लोकांना पाण्याची व्यवस्था या नद्यांच्या पात्रातून होत असे. मात्र नद्यांचे खोल पात्र आणि पाण्याचा वाहता प्रवाह यामुळे नद्यांचे पाणी वापरणे त्याकाळी नक्कीच धोक्याचे होत असेल. यामुळे ज्या ठिकाणी नदीचा काठ थोडासा उथळ असेल त्याठिकाणी नदीचे पाणी वापरायला घेण्यासाठी दगडी बांधकाम करून घाट निर्माण करण्याची पद्धत सुरू झाली. नदीच्या काठावर मोठमोठ्या आणि उंचीला लहान अश्या पायर्‍या बांधून नदीच्या पाण्यात उतरण्याची व्यवस्था या घाटांद्वारे करण्यात आलेली आहे. घाट शब्दाची निर्मिती ही संस्कृतमधिल घट्ट या शब्दापासून झाली आहे. उताराची जागा असा घट्ट शब्दाचा अर्थ आहे. नदीकिनार्‍यावर उताराच्या जागी असे घाट बांधले जात असत. डोंगराच्या उताराच्या जागांवर वाहतुकीसाठी निर्माण केलेल्या मार्गांना देखिल घाट हा शब्द याच अर्थाने वापरला जात असावा.

घाट बांधण्याची पद्धत नेमकी कधी सुरू झाली याचा काहीही ठोस असा पुरावा नाही. मात्र सातवाहन काळात नदीकाठी असे घाट निर्माण करण्याची पद्धत सुरू झाली असावी असे वाटते. तेलंगानामध्ये नागार्जुनकोंडा येथे कृष्णा नदीच्या काठावर काही घाटांचे अवशेष सापडले आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात नेवासे येथे प्रवरा नदीच्या काठावर आणि त्र्यंबकेश्वर, नाशिक आणि पैठण येथे गोदावरी नदीच्या काठावर घाटांचे अवशेष सापडलेले आहेत. तेर येथील उत्खननांमध्ये नदीकाठी काही बांधकामांच्या पायाचे अवशेष सापडले आहेत. मात्र हे बांधकाम घाटांचे होते अथवा वस्तीच्या संरक्षक भिंतीचे हे लक्षात येत नाही.

आजच्या काळात महाराष्ट्रात आणि इतर राज्यांत मोठ्या प्रमाणात असे घाट दिसून येतात. महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमधिल बरेच घाट हे पेशवेकाळात आणि इंदूरच्या अहिल्यादेवी होळकर यांच्या काळात बांधलेले आहेत. कदाचित याठिकाणी पुर्वी असलेल्या घाटांचा जिर्णोद्धार करून त्यांनी नवे घाट बांधले असावे. मात्र असे पुरावे शिलालेखांत अथवा लिखाणात सापडत नाहीत. त्यामुळे खात्रीने सांगता येत नाही. पाण्यासाठी बांधलेल्या या घाटांसोबतच कित्येक ठिकाणी अंतिम संस्कार करण्यासाठी वेगळे घाट देखिल बांधण्यात आलेले आहेत. काशीचे मणिकर्णिका घाट हे असेच अंतिम संस्कारासाठी बनलेले घाट आहे. ज्या गावात नदी नाही अशा ठिकाणी अंतिम संस्कारात गावातच एखाद्या ठराविक जागी होतात. मात्र या जागांना “स्मशान घाट” म्हणण्याची पद्धत आजही आहे.

बारव / कुंड

जसजसे मानवी वस्ती नदीपासून दुरच्या ठिकाणी वसविली जाऊ लागली, तशी पाण्याची गरज भागविण्यासाठी इतर पर्यायांचा विचार केला जाऊ लागला. भुगर्भातील पाण्याच्या वापरासाठी विहिरी बांधण्याची पद्धत पुर्वी सिंधू संस्कृतीमध्ये दिसून येते. याच विहिरींना नविन स्वरूपात निर्माण केले जाऊ लागले. हे नविन स्वरूप होते बारव अथवा कुंडांचे. बारवांचा आकार विहीरींपेक्षा खूप मोठा आणि पसरट असा होता. हे बारव जमिनीत अगदी १० ते १५ फुट पासून १५० – २०० फुट खोलीपर्यंत बांधले जात होते. कोकण भागात भौगोलिक रचनेमुळे पाणी साठवून ठेवणे कठीण आहे. त्यामुळे कोकण भागात असे बारव कमी प्रमाणात आढळतात. तर विदर्भात पावसाचे प्रमाण तुलनेने जास्त असल्याने त्या भागात नैसर्गिक जलाशये जास्त प्रमाणात आढळतात. मात्र कमी पर्जन्यमान असलेल्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात बारव जास्त प्रमाणात आहेत. या बारवांचा उपयोग भुगर्भातील पाण्याचा वापर करणे आणि पावसाचे पाणी जमिनीत मुरवणे आणि साठवून ठेवणे यासाठी केला जात असे.

अंबेजोगाई (जि बीड) येथील एक बारव

बारवांची निर्मिती चालुक्य काळात आणि नंतर मोठ्या प्रमाणात झाली असली तरी त्यपुर्वीदेखिल बारवांचा वापर नक्कीच होत होता. तेर (जि धाराशिव) येथे इस १ ल्या शतकातील एक बारव सापडली आहे. मांढळ (जि नागपूर) येथे ४ थ्या शतकातील म्हणजे वाकाटककालिन बारव सापडली आहे. तर मानसपुरी (जि नांदेड) येथे एक राष्ट्रकुट काळातील बारव सापडली आहे. आज दिसणार्‍या बहुतांश बारव मात्र चालुक्य, यादव आणि विजयनगर काळातील आहेत.

या बारवांना पाण्यापर्यंत जाण्यासाठी पायर्‍यांची निर्मिती केली जात असे. काही ठिकाणी एका बाजुने, काही ठिकाणी दोन बाजुने तर काही ठिकाणी चारही बाजुंनी अश्या पायर्‍यांची सोय केलेली दिसून येते. बारवांची रचना, पायर्‍यांची व्यवस्था, आकार यांच्या आधारावर कुंड, विहीर, आड, कल्लोळ आणि बारव असे विभागीकरण करता येऊ शकते. विहीर गोल आकाराची आणि खोल असते. आड देखिल विहिरीप्रमाणेच मात्र कमी खोलीचे असतात. विहीर आणि आडामध्ये आत उतरण्यासाठी पायर्‍यांची सोय नसते. पाणी बाहेर काढण्यासाठी रहाटाचा वापर करण्यात येतो. कुंड हे पसरट आकाराचे, मात्र कमी खोलीचे असते. कुंडामध्ये उतरण्यासाठी चारही बाजुंनी पायर्‍यांची सोय दिसून येते. कल्लोळ हे देखिल कुंडाप्रमाणेच, मात्र आकारात लहान आणि मंदिराच्या आतमध्ये असते. तुळजापुर किंवा त्र्यंबकेश्वर येथे असे कल्लोळ दिसून येतात. बारव हे विहीर आणि कुंड या दोघांचे मिश्रण. आकाराने पसरट, खोलीला कुंडापेक्षा थोडे जास्त, आणि पाण्यापर्यंत जायला एक किंवा अधिक बाजुने पाय‍र्‍या अशी बारवेची संरचना असते. हे बारव वर्तुळाकार, चौरस, आयात, षटकोन, आष्टकोन अशा विविध आकारांमध्ये दिसून येतात.

सिद्देश्वर मंदिर, लातूर येथील बारव

बारव आणि कुंडांच्या ठिकाणी विविध देवतांच्या मुर्त्या देखिल दिसून येतात. कित्येक बारव हे मंदिराच्या परीसरात किंवा जवळपास असतात. पुर्वी असलेल्या मंदिराच्या जवळपास बारव बांधले गेले, किंवा बारव बांधल्यावर शेजारी मंदिराची निर्मिती केली गेली हे माहित नाही. मात्र मंदिर आणि बारव यांचा परस्पर संबंध मात्र जाणिवपुर्वक केला गेला असवा. बारवाची स्वच्छता आणि रखरखाव टिकवून ठेवण्यासाठी त्याला पवित्र्याची जोड देणे नक्कीच खूप सोयीचे होते. ज्याठिकाणी बारव मंदिर परीसरात नव्हती तेथे बारवांच्या पायर्‍यांच्या बाजूने अथवा भिंतींमध्ये देवकोष्ठ बांधून त्यामध्ये देवतांच्या मुर्त्या स्थापित केल्या गेल्या. आज यामधिल खूप कमी ठिकाणी मुर्त्या अस्तित्वात आहेत. आणि जेथे आहेत तेथे खूप भग्न अवस्थेत आहेत. काही बारवांच्या बाजूने मंडपांची रचनादेखिल आढळून येते. ही रचना कदाचित धार्मिक विधींसाठी असावी. किंवा बारवेमध्ये आंघोळ केल्यानंतर कपडे बदलण्याची जागा म्हणून या मंडपांचा वापर केला जात असण्याचीदेखिल शक्यता आहे.

लेण्यांच्या आसपास आणि किल्ल्यांवर जलव्यवस्थपनासाठी दगडी टाके देखिल खूप ठिकाणी दिसून येतात. खडकाला फोडून आतमध्ये पोकळ जागा तयार केली जात असे. आणि त्याचा वापर पाण्याचा साठ्यासाठी केला जात असेल. खडकांमध्ये असणारे झरे आणि पावसाचे पाणी अशा दोन स्त्रोतांद्वारे या टाक्यांमध्ये पाणीसाठा होत असे. कन्हेरी लेण्यांमध्ये सर्वात जुने टाके दिसून येतात. पुढील काळात कित्येक किल्ल्यांवर असे टाके बांधले गेले.

महाराष्ट्रमध्ये लहान मोठे मिळून किमात १५०० बारव अस्तित्वात असावेत. यांपैकी कित्येक बारव आज अतिशय भग्न अवस्थेत आहेत. बर्‍याच ठिकाणी हे बारव बुजून गेले आहेत किंवा बांधकामाठी बुजविण्यात आले आहेत. मात्र या बारवांना भग्नावस्थेतून काढून स्वच्छ केल्यास जलव्यवस्थापनासाठी त्यांचा खूप उत्तम प्रकारे वापर केला जाऊ शकतो. काही वर्षांत त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झालेले आहेत. येणार्‍या काळात सर्वच गावांमध्ये लोकसहभागातून अशी कार्ये हाती घेतल्यास नक्कीच फायदा होणार आहे. गरज आहे ते लोकांना बारवांचे महत्व पटवून देण्याची आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याची.

By Dr Dinesh Soni

Dinesh is an an indologist and is writer of 18 books. He holds a doctorate in cultural studies. He is felicitated by Acedemia Sinica, Taipei, Taiwan for his research in mythology. He has received numerous awards including the Lokmat Digital Influencer Award (Heritage). Dinesh is also a speaker who has graced many occasions. He is the main admin of Indian.Temples.

2 thoughts on “बारव आणि कुंड : प्राचिन जलव्यवस्थापन तंत्र”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *