महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मंदिरातील देवतांची शिल्पे पाहताना देवतांच्या हातातील एका फळाने माझे लक्ष वेधून घेतले. किमान शंभर तरी शिल्पे मी पाहिली, ज्यामध्ये हे फळ देवतेच्या हातात मला दिसले. आणि हे फळ मंदिरातील इतर शिल्पांमध्ये नसून प्रत्यक्ष देवतेच्या हातात अहे. याचा अर्थ हे फ़ळ नक्कीच खूप महत्वपूर्ण असणार. मात्र या फ़ळाबद्दल माहिती न मिळाल्याने मी थोडासा अस्वस्थ होत होतो. या फ़ळाची साल एखाद्या बुंदीच्या लाडूसारखी खडबड असल्याने कित्येकजण याला लाडू म्हणूनच संबोधत होते. भारतिय शिल्पकलेमध्ये प्रत्येक छोट्या छोट्या वस्तूचे आणि चिन्हाचे प्रतिकात्मक महत्व आहे. आणि त्यामुळे देवतेच्या हातात एक लाडू असणे हे मनाला पटत नव्हते. गणेशमुर्तीच्या हातात लाडू असणे एखादेवेळी समजता येईल. मात्र शिव, पार्वती, ब्रम्हा, विष्णू, लक्ष्मी, कुबेर यांच्याही हातात असा लाडू कसा असू शकेल हा विचार मनाला भेडसावतच होता.
हातात महाळूंगाचे फळ धारण केलेली दुर्गा मुर्ती. स्थळ : छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय, मुंबई
पंढरपूरपासून जवळच भिमेच्या काठावर तारापूर येथे एक सुंदर सुर्यनारायणाचे मंदिर आहे. या मंदिराला भेट देताना एक आयुर्वेदिक डॉक्टर मित्र सोबत होते. येथे एका देवतेच्या मुर्तीच्या हातात हेच फळ मला दिसले. आणि या मित्राने मला सांगितले की हे महाळूंग नावाचे एक फळ आहे. आणि येथून पुढे सुरू झाला माझा या विषयातील अभ्यास.
महाळुंग वनस्पती मूळ भारतातील असून भारताच्या पूर्व भागातील वनांत, हिमालयाच्या पायथ्याजवळील प्रदेशात तसेच महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात ही वनस्पती वाढलेली दिसून येते. लिंबू वर्गात मोडणारी ही वनस्पती एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. संस्कृतमध्ये याला मातुलुंग म्हणतात. हिंदीत बीजफल किंवा बिजौरा या नावाने हे फळ परिचित आहे. सायट्रस मेडिका या पारिभाषिक नावाने परिचित अशा या फळाचे इंग्रजीतील अॅडम्स अॅपल हे नाव अतिशय समर्पक आहे. फ्रेंच, डच, लॅटीन, अरेबिक, हर्ब्र्यु या भाषांमध्ये देखील या फ़ळासाठी शब्द आहेत. यावरून या फ़ळाचे महत्व दिसून येते. या फळाला संस्कृतमध्ये बीजपूर, मातुलुङ्ग, बीजफलक, रुचक, फलपूरक, बीजपूरक, बीजक, अम्लकेशर, बीजपूर्ण, पूर्णबीज, सुकेशर, मातुलिङ्ग, सुपूर, गन्धकुसुम, सिन्धुपादप, जन्तुघ्न, पूरक, रोचनफल, लुङ्ग, केसरी, केसराम्ल, मध्यकेसर अशी नावे आहेत. आसामीमध्ये जोरा टेन्गा, कोकणीमध्ये माउलिंग; कन्नडमध्ये मादल किंवा रुसक; गुजरातीमध्ये बिजोरू; तामिळमध्ये मादलम्; तेलुगुमध्ये लुंगमु आणि मादिफलमु; बंगालीमध्ये टावालेबु; नेपाळीमध्ये बिमिरो; पंजाबीमध्ये बजौरी; मल्याळममध्ये गिलम; अरबीमध्ये उतरज आणि पर्शियनमध्ये तुंज अशी नावे आहेत.
महाळुंगाचे झाड आणि फळ. कोडुगू, कर्नाटक
महाळुंग हा काटेरी वृक्ष २–५ मी. उंच वाढतो. त्याच्या खोडावर अधूनमधून लहान काटे असतात. याच्या पानांवर तेलग्रंथी असून पाने चुरगळल्यावर तेल बाहेर पडून त्यांचा सुगंध दरवळतो. महाळुंगाचे फळ पेरूसारखे परंतु त्यापेक्षा मोठे असून १२–१५ सेंमी. लांब असते. त्यावर बारीक खवले असतात. त्याची साल खूप जाड व तेलकट असते. फळाचा रंग प्रथम हिरवा असतो व नंतर पिवळा होतो. त्यातील गर सुगंधी असून चवीला आंबट व कडवट असतो. फळाच्या टोकाला फुगवटा असतो. काही फळांत कधीकधी दोन-तीन फुगवटे दिसून येतात.
मधरं मातुलुंग तु शीतं रूचिकर मधु ।
गुरू वृष्यं दुर्ज्जरं च स्वादिष्टं च त्रिदोषनुत ॥
पित्तं दाहं रक्तदिषान्विबंधश्वास्वकासकान ।
क्षयं हिक्कां नाशयेश्च पूर्वरेवमुदाहृतम् ॥
अर्थ: गोड म्हाळूंग हे शीतल, रुचिकारक, मधुर, भारी (जड) वीर्यवर्धक, दुर्जर, स्वादिष्ट तसेच त्रिदोष, पित्त, दाह, रक्तसंबंधित विकार, मलबंध, श्वासविकार, खोकला, क्षय आणि उचकी दूर करते.
आयुर्वेदाच्या अनेक प्राचीन तसेच अर्वाचीन ग्रंथात या वनस्पतीच्या विविध औषधी गुणधर्माचे वर्णन पाहायला मिळते. ‘बृहत्निघंटु रत्नाकर’ या ग्रंथमालिकेतील ‘शालीग्राम निघंटु’ या ग्रंथात म्हाळुंगाच्या विविध औषधी उपयोगाबाबत सविस्तर माहिती पाहायला मिळते. महाराष्ट्रातील जुन्या पिढीतील आयुर्वेद महामहोपाध्याय म्हणून गौरवल्या गेलेल्या शंकर दाजीशास्त्र पदे यांच्या ‘वनौषधी गुणादर्श’ या 1893 साली रचलेल्या ग्रंथात म्हाळूंग हे फळ बावीस प्रकारच्या आजारावर औषधी म्हणून गुणकारी असल्याचे म्हटले आहे. यातील सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे गर्भधारणेच्या प्रक्रियेमध्ये निर्माण झालेले अडथळे दूर करून सुलभ प्रसूतीसाठी केला जाणारा उपयोग होय. अरुची दूर करून तोंडाची रूची वाढवते म्हणून त्याला “मातुलुंग” किंवा “रूचक” असे म्हणतात. महाळुंग भूक वाढवणारे, हृदयास हितकर( ह्रृद्य), घशातील कफ कमी करून कंठ शुद्धी करणारे, रक्त व मांस धातूला शक्ती देणारे, तृषाशामक, खोकला, दमा, अरुची, उलटी, जुलाब, पोटदुखी, पोटात गोळा येणे, मूळव्याध, मलबद्धता, जंत (कृमी) दातांची कीड या आजारांमध्ये गुणकारी आहे.
देवतांचे पूजन, संस्कृती आणि आयुर्वेदिक वनस्पती यांचा संंबंध खूप जुना आहे. हा लोकांना औषधी वनस्पतीचे महत्व पटवून देण्यासाठी असा संबंध जानिवपूर्वक तयार केला गेलेला आहे. आपल्या रोजच्या पुजनामध्ये तुळस खूप महत्वाचे स्थान राखून आहे. जेवन करण्याआधी देवाला जेवणाचे नैवेद्य दाखवित असताना ताटामध्ये तुळशीची पाने (वाळवलेली अथवा ताजी) घेण्याची पद्धत घराघरात आहे. देवतेच्या आणि आपल्या कपाळावार चंदन लावण्याची पद्धत आहे. हळद आणि हळदीपासून तयार होणारे कुंकू पुजेमध्ये अतिशय महत्वाचे आहे. जेजुरी येथील खंडोबा मंदिरात हळदीचे महत्व किती अहे हे आपल्याला माहीतच आहे. प्रत्येक मंगल प्रसंगी घराच्या दारावर आंब्याच्या पानांनी बनलेले तोरण अडकविण्याची पद्धतदेखिल आहे. उन्हाळा सुरू होण्यापुर्वी (गुढीपाडवा आणि त्याच्या आसपासच्या काळात) बर्याच मंदिरांमध्ये कडुलिंबाच्या पाल्यापासून बनलेले तिर्थ देण्याची पद्धत आहे. देवतांच्या मुर्त्यांमध्ये महाळुंगाचे फळ दर्शविण्यामध्ये असेच कारण असू असेल.
पुरातत्विय साहित्यांमध्ये किंवा पुराणांमध्ये या फळाबद्दल फ़ारसे काही वाचायला मिळत नाही. मात्र भारतीय वैदिक संस्कृतीमध्ये आदिशक्ती किंवा जगत्जननी या स्वरूपाच्या देवीच्या हातामध्ये हे फळ देवीने धारण केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महालक्ष्मी देवी (अंबाबाई)चे मंदिर आहे. तिच्या उजव्या हातात हे फळ धारण केलेले असून धर्मशास्त्राप्रमाणे या फळाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असल्याचे दिसून येते. जैन मूर्तीशास्त्रात चोवीस तीर्थंकरांचे चोवीस यक्ष आणि चोवीस यक्षिणींपैकी तीस मूर्तींच्या हातात हे फळ असल्याचे उल्लेख पाहायला मिळतात.
मंदिरांमधिल शिल्पांचे बारकाईने अध्ययन केल्यास आपल्याला आपल्या इतिहास आणि संस्कृतीबद्दल माहिती मिळते. त्यासोबतच आरोग्यविषयक माहितीदेखील मिळू शकते. आणि महाळूंगाच्या फळाचे चित्रण हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. गरज आहे ते केवळ या शिल्पांकडे केवळ एक दगडाची आकृती म्हणून न पाहता एक अध्ययनाचा विषय म्हणून पाहण्याची.
हातात महाळूंग फळ धारण केलेली कुबेर मुर्ती. स्थळ : शासकीय संग्रहालय, कोडुगू, कर्नाटक