मंदिरांचा आणि शिल्पांचा अभ्यास करताना आपण मंदिरांतील देवी-देवतांच्या मुर्त्यांचा अगदी विस्तृत अभ्यास करतो. त्यासोबतच मंदिराची बांधणी, शैली, दगडांची ठेवण या गोष्टींबद्दल बरीच चर्चा करतो. मात्र मंदिराच्या बाह्यभिंतींवर असणार्या सुंदर ललनांच्या शिल्पांबद्दल फ़ारशी चर्चा होत नाही. या शिल्पांमध्ये कोरलेल्या सुंदर स्त्रिया कोण, त्यांची शिल्पे बनविण्यामागील प्रयोजन काय, त्यांना देवीदेवतांच्या इतक्या जवळचे स्थान का दिले गेले असावे असे बरेच प्रश्न मनात येतात. या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी साहित्य खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे. विदेशी आणि भारतातील संशोधकांनी मंदिरांच्या स्थापत्यशैली आणि मुर्तीकला या विषयांवर खूप पुस्तके लिहीली आहेत. मात्र त्यांमध्ये या शिल्पांबद्दलची माहिती खूप कमी प्रमाणात आढळते.
मंदिरशास्त्राच्या उत्क्रांतीमध्ये बरेच लहान मोठे टप्पे आहेत. गुप्त काळातील छोटेखानी मंदिरांपासून होयसळाकाळातील मोठमोठ्या मंदिरापर्यंत टप्प्याटप्प्याने मंदिर बांधणीची शैली विकसित होत गेली आहे. काही साम्राज्यांनी मंदिरांतील देवतांच्या मुर्त्या मोठमोठ्य़ा आणि बारीक कलाकुसर करून बनविल्या. काही साम्राज्यांनी मंदिराचे आकार वाढविले. काही साम्राज्यांनी मंदिरात नृत्य आणि गायन कलेला प्रोत्साहन देण्यासाठी मोठे नाट्यमंडप बांधले. काही साम्राज्यांनी मंदिरांची बाह्यांगे सुंदर बनविण्यासाठी सुंदर शिल्पे बनवू घेतली. या बाह्य भिंतींवरील शिल्पांमध्ये विविध प्राणी, पक्षी, देवता, पुष्प इत्यादी शिल्पे दिसून येतात. याच शिल्पांमध्ये समावेश आहे अतिशय सुंदर अशा या स्त्रियांच्या शिल्पांचा.
मुर्तीच्या बाह्यांगावर आढळणारी स्त्रीशिल्पे मुख्यत्वे दोन प्रकारची आहेत. यक्षिणी आणि सुरसुंदरी. देव, दानव, मनुष्य यांच्यासोबत यक्ष हा एक जिवप्रकार मानला जातो. यक्ष हे मुख्यत्वे देवांचे सहकारी अथवा सेवक असतात. देवांचा खजिनदार कुबेर हा या यक्षांचा स्वामी. कुबेरचे सेवक म्हणून यक्ष आणि यक्षिणी यांची शिल्पे मंदिरांमध्ये दिसून येतात. सांची, भरहूत आणि मथुरा या अगदी प्रारंभिक काळातील बौद्ध स्मारकांमध्ये आणि अवशेषांमध्ये बरीच यक्षिणी शिल्पे दिसून येतात. या यक्षिणी मुख्यत्वे देवाच्या सेवेमध्ये रममाण असलेल्या दिसून येतात. पुढील काळात मंदिरशैलीच्या विकासामध्ये या यक्षिणींचे विकसित अथवा भिन्न रूप म्हणून सुरसुंदरींची शिल्पे कोरली गेली असावीत. या सुरसुंदरी यक्षिणीप्रमाणे देवाच्या सेवेत समर्पित नसून आपले एक स्वतंत्र आयुष्य जगत असल्याचे दिसून येते.
देवाचे दर्शन करण्यासाठी आपण मंदिरात जातो. मुळात दर्शन या शब्दाचा अर्थ पाहणे हा आहे. म्हणजे आपण देवाला पाहण्यासाठी. देवाची अनुभुती करण्यासाठी देवळात जातो. मात्र हे दर्शन केवळ देवाच्या मुर्तीपुरते मर्यादित आहे का? जर तसे असते तर मंदिरे बांधताना अगदी प्राथमिक काळातील केवळ गर्भगृह आणि छोटासा वर्हांडा अशी मंदिरे बांधता आली असती. मंदिराला भेट देताना आपले निरीक्षण हे केवळ देवाच्या मुर्तीपेक्षा पुढे जाऊन सर्व शिल्पांसाठी देखिल असायला हवे. यासाठीच पुराणातील किंवा रामायण व महाभारतासारख्या महाकाव्यांमधिल काही कथा मंदिरांत कोरल्या गेल्या आहेत. ज्यामधून आपण या कथांचा अनुभव घेऊन त्यांमधून बोध घेऊ शकतो. हाच हेतु सुरसुंदरींच्या शिल्पांमागे असू शकेल.
शाक्त परंपरेत योगिनींना म्हत्वपूर्ण स्थान आहे. या योगिनी प्रत्यक्ष देवी नसून त्यांचे रूपक किंवा प्रतिक म्हणून विरजमान असतात. काही ठिकाणी अष्ट मातृकांसोबत अष्ट योगिनींचा उल्लेख आढळतो. तर काही ठिकाणी एकून ६४ योगिनींचा उल्लेख आढळतो. या अष्ट योगिनींमध्ये सुरसुंदरी या योगिनीचा देखील समावेश आहे. योगिणी आणि यक्षिणी या शब्दांमधिल साधर्म्यावरून वाटते की योगिनी हा शब्द यक्षिणीचे अपभ्रंशित रूप असेल. यावरून यक्षिणी आणि सुरसुंदरी यांच्यातील संबंध पुन्हा एकदा अधोरेखित होतो.
सुरसुंदरींचा संबंध अप्सरांशी देखिल जोडला जातो. “अवकाशातून आलेली सुंदर स्त्री” असा सुरसुंदरी या शब्दाचा अर्थ आहे. ऋग्वेदामध्ये गंधर्वाची पत्नी म्हणून अप्सरांचा उल्लेख आहे. विष्णू पुराणात समुद्र मंथनातून बाहेर आलेल्या १४ रत्नांपैकी एक म्हणून अप्सरांचा उल्लेख आहे. पुढील काळातील पुराणे, रामायण आणि महाभारतामध्ये विविध कथांमध्ये या अप्सरा स्वर्गातून खाली पृथ्वीवर अवतरित झाल्याचा उल्लेख आहे. या अप्सरांना मुख्यत्वे विविध तपस्वींचे तप भग्न करण्यासाठी इंद्राद्वारे पृथ्वीवर पाठविले जात असे. या मध्ये रंभा, मेनका, उर्वशी, तिलोत्तमा, चित्रलेखा या अप्सरांचा उल्लेख आढळतो. या अवकाशातून जमिनीवर आलेल्या अप्सरा पृथ्वीवर काही काळ वास्तव्य करून पुन्हा स्वर्गात जात असत. पृथ्वीवर वास्तव्य करणार्या या अप्सरांच्या सौंदर्याला सुरसुंदरींच्या माध्यमातून शिल्पांमध्ये स्थान मिळाले असावे.
महाराष्ट्रातील विविध मंदिरांमध्ये कमी अधिक प्रमाणात या सुरसुंदरी दिसून येतात. मात्र चालुक्य काळातील धर्मापुरी (जि बीड) येथील केदारेश्वर मंदिर, निलंगा (जि लातूर) येथील निळकंठेश्वर मंदिरे, होत्तळ (जि नांदेड) येथील मंदिरांचा समूह या ठिकाणी सुरसुंदरींची शिल्पे मोठ्या प्रमाणात आढळतात. या सुरसुंदरी आकर्षक देहयष्टीच्या, नाजून कटीभागाच्या आणि उन्नत स्तनांच्या कोरलेल्या आहेत. काही ठिकाणी नग्नरूपात तर काही ठिकाणी अर्धनग्न रूपात कोरलेल्या सुरसुंदरी दिसून येतात. देखण्या, लोभसवाण्या, चेहर्यावर स्मित असलेल्या आणि दागिण्यांनी सजलेल्या अशा या सुरसुंदरी असतात. मानवी भावभावना आणि कार्यमग्नता त्यांच्यामध्ये दिसून येतात. या सुरसुंदरी विविध कार्यांमध्ये मग्न असतात. आणि या सुरसुंदरी करीत असलेल्या कार्यानुसार त्यांची विभागणी करता येऊ शकते.
सौंदर्यप्रसाधनातील सुरसुंदरी
सुरसुंदरी मुळातच अतिशय सुंदर आणि चित्तवेधक असतात. मात्र त्यातही काही सुरसुंदरी स्वतःला अधिक सुंदर बनविण्यासाठी प्रयत्न करीत असतात. स्वर्गातील अप्सरा या आपल्या सौंदर्यासाठीच जास्त प्रमाण गौरविल्या गेलेल्या आहेत. आणि हे सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी प्रयत्न करणार्या या सुरसुंदरी स्त्रियांना सौंदर्यप्रसाधनाबद्दल मार्गदर्शन करताना दिसून येतात. यांमध्ये दर्पणसुंदरी अथवा दर्पणिका ही सुरसुंदरी एका आरश्यामध्ये स्वतःचे रूप निहारताना दिसून येते. एक हातात आरसा घेऊन, उभी राहुन, त्यात आपले रूप न्याहाळत ही सुरसुंदरी उभी असते. काही लेखकांनी दर्पणसुंदरीला परीभोगदर्शिनी असे म्हटलेले आहे. आपल्या प्रियकरासोबत शारीरिक सुख उपभोगल्यानंतर ती स्वतःला आरशामध्ये पाहून बिघडलेला शृंगार ठीक करीत आहे, असे या लेखकांनी तिचे वर्णन केलेले आहे.
आरश्यात स्वतःचे रूप निहारणारी दर्पणिका, छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय, मुंबई
कुंडलधारिणी ही स्वत:च्या कानात कुंडल (earrings) घालत आहे. तिलोत्तम ही सुरसुंदरी स्वतःच्या डोळ्यात काजळ घालताना दिसून येते. अशाच प्रकारे नुपुरपादिका ही आपल्या पायात नुपूर अर्थात पैंजणे बांधण्यात व्यस्त असते. कर्पूरमंजरी ही सुरसुंदरी आपल्या केशांचे सौंदर्य वाढविण्यासाठी प्रयत्न करीत असते. आंघोळ झाल्यानंतर केसांमधिल पाणी काढण्यासाठी ही आपल्या केसांना झटकत असते. यावेळी केसांमधून खाली झिरपणारे पाणी पिण्यासाठी चातक पक्षी देखिल कोरलेला काही ठिकाणी दिसतो. चातक हा पक्षी केवळ आकाशातून पडणारे स्वच्छ पाणी पितो अशी मान्यत अहे. त्यामुळे या सुरसुंदरीच्या केसांतून पडणारे पाण्याचे थेंब हे आकाशातून पडणार्या पावसासारखेच आल्हाददायक आहे असे सांगण्याचा प्रयत्न आहे. काही ठिकाणी येथे राजहंस पक्षी दिसतो, जो या केसांतून पडणार्या पाण्याच्या थेंबांना मोती समजून आलेला आहे. कर्पूरमंजरीला स्नान सुंदरी असाही शब्द काही लिखाणांमध्ये आढळतो. काही ठिकाणी कर्पूरमंजरी आपल्या केसांना बांधण्यामध्ये मग्न असल्याचे दिसते.
केतकीभरणा हे एक वेगळे सुरसुंदरीचे रूप आहे, जेथे सुरसुंदरी आपल्या केसांत केतकीचे पुष्प लावत आहे. पद्मगंधा रूपातील सुरसुंदरी संपूर्ण शृंगार करून हातामध्ये कमळाचे फूल घेऊन प्रियकराची वाट पाहत आहे. स्वाधीनपातिका हे एक सुरसुंदरीचे अतिशय विशेष उदाहरण आहे. इथे तिने संपूर्ण शृंगार केलेला आहे, आणि ती आपल्या सौंदर्याने आपला प्रियकर किंवा पती याला स्वतःच्या अंकित ठेवत आहे. तिच्या मुखावर अहंकार आणि सौंदर्याचा अभिमानही दाखविलेला असतो.
मुग्धा ही एक सुरसुंदरी आहे जी थोडीसी खाली नजर करून एक लाजरे स्मित हास्य करीत आहे. लाजत असलेली मुद्रा दर्शविण्यासाठी तिचा एक हात हनुवटीजवळ पकडलेला दाखविला आहे.निसाभिसारिका ही अशीच एक सुरसुंदरी आहे जी थोडेसे लाजत स्मितहास्य करीत अहे. मात्र या ठिकाणी तिचा हात हनुवटीजवळ नसून जवळच्या एका झाडाच्या फ़ांदिला पकडलेला आहे.
खेळामध्ये मग्न असणार्या सुरसुंदरी
जसे प्रियकराच्या आनंदासाठी शृंगार आवश्यक आहे, तसेच स्वत:च्या आनंदासाठी स्वतःला क्रिडा अथवा खेळामध्ये रंगवून ठेवणे देखिल आवश्यक आहे. सुरसुंदरींच्या मंदिरातील प्रतिनिधित्वामध्ये हे खूप उत्तम प्रकारे दिसून येते. शृंगारामध्ये मग्न असणार्या सुरसुंदरीदेखिल हा शृंगार आपल्या प्रियकरासाठी करीत आहेत की केवळ स्वतःच्या आनंदासाठी, हे लक्षात येत नाही. मात्र खेळामध्ये मग्न असणार्या या सुरसुंदरींना पाहिल्यास त्यांना आनंदी होण्यासाठी पुरूषाची काहीही गरज नाही हे लगेच जाणवते.
शुकसुंदरी ही एक मोठ्या प्रमाणात आढळणारी सुरसुंदरी अहे. तिच्या हातावर किंवा खांद्यावर एक पोपट बसलेला आहे, आणि ही सुरसुंदरी पोपटासोबत बोलण्यात आणि खेळण्यात मग्न आहे. काही ठिकाणी ही सुरसुंदरी एका माकडासोबत खेळत असताना दिसते. हिला मर्कटसुंदरी असे नाव आहे. मर्कटसुंदरीच्या काही शिल्पांमध्ये हे माकड तिच्या अंगावरील कपडे ओढण्याचा प्रयत्न करतो, आणि ही सुरसुंदरी थोडेसे लाजून आणि हास्य करीत माकडापासून स्वतःच्या कपड्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न करताना दिसते. वृश्चिकसुंदरी ही एक सुंदरी तिच्यासोबत असलेल्या विंचवासाठी ओळखली जाते. तिच्या मांडिवर एक विंचू चढलेला आहे आणि ती त्या विंचवाला दूर करण्यासाठी आपले वस्त्र झटकत आहे. विंचू हे कामवासनेचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे या कामवासनेपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न ही सुंदरी करीत आहे. वनिता ही एक सुरसुंदरी अशाच प्रकारे नागाला स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. विंचूप्रमाणेच नागदेखिल कामवासनेचे प्रतिक आहे. नागाला गुळगुळीत आणि थंड जागा आवडते. त्यामुळे हा नाग सुंदरीच्या मांड्यांवर विसावण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र वनिता त्या नागाला अगदी घट्ट पकडून ठेवते, ज्यामुळे तो नाग दंश करणार नाही. काही ठिकाणी वनिताची मदत करण्यासाठी मुंगूसदेखिल दाखविला जातो.
कंदुकक्रिडामग्ना ही एक सुरसुंदरी चेंडूसोबत खेळण्यात मग्न आहे. एका हातात किंवा दोनही हातात चेंडू आहेत आणि ती चेंडू फ़ेकताना दिसते. गुंठना रुपातील सुरसुंदरी आपल्या हाताने झाडाच्या पानांवर किंवा फुलांची नक्षी करताना दिसून येते. याचप्रकारे शालभंजिका अथवा डालमालिका ही झाडाच्या फांदीला पकडून उभी आहे. जणूकाही या झाडाच्या फांद्यांना ती आपल्या डोक्यावर एखाद्या छत्राप्रमाणे धारण करीत अहे. तोरणा झाडाच्या फांदीऐवजी स्वतःच्या हाताने डोक्यावर तोरणासारखा आकार तयार करीत आहे. पत्रलेखा किंवा पत्रलेखिका ही एका दगडावर दगडानेच बनलेल्या लेखणीने पत्र लिहीताना दिसत आहे. बर्याच मंदिरांमध्ये या दगडावर मंदिर निर्माण करणार्या शिल्पकाराची माहिती देणारा छोटासा शिलालेख दिसून येतो.
पत्रलेखा, केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी, जि बीड
नृत्य आणि संगितातील सुरसुंदरी
नृत्य आणि संगित यांचा भारतील संस्कृतीमध्ये अतिशय महत्वपूर्ण स्थान नेहमीच राहिलेले आहे. त्यामुळे हा घनिष्ठ संबंध जर शिल्पकलांमधून प्रदर्शित झाला नसेल तर ते नवलच राहील. हा घनिष्ठ संबंध जसा देवतांच्या शिल्पांमधून आणि मुर्त्यांमधून दिसून येतो, तसाच तो सुरसुंदरींच्या माध्यमातून देखिल दिसून येतो. नुपुरपादिका ही आपल्या पायात पैंजण घालताना दिसते. हे पैंजण म्हणजे घुंगरू हा नृत्याविष्कारातील एक महत्वपूर्ण घटक आहे. नर्तिका किंवा नर्तकी या रूपातील सुरसुंदरी खूप ठिकाणी आढळतात. या सुरसुंदरींची नृत्यमुद्रा आणि हस्तमुद्रा वेगवेगळ्या असू शकतात. काही शिल्पे ही एकट्या नर्तकीची असून काही ठिकाणी समूहाने नर्तकी नृत्य करताना दिसतात. मात्र त्यांची उपस्थिती सगळ्याच मंदिरांमध्ये दिसून येते.
विणाधारिणी, पाच्छाल सोमेश्वर मंदिर, पन्नगल्लू, जि नालगोंडा, तेलंगाणा
मर्दला किंवा मृदुंगवादिका ही मृदुंग वाजविताना दिसून येते. अशाचप्रकारे वेणुधारिणी ही बासरी वाजवित असताना दिसते. वीणावादिनी ही विणा किंवा तत्सम वाद्य वाजवित असताना दिसते. मर्दला , वीणावादिनी किंवा वेणुधारिणी यांच्या शिल्पांमध्ये वाद्य आणि वाद्य पकडण्याची व वाजविण्याची पद्धत यांमध्ये फरक दिसून येतात. मात्र संगितासोबतचा त्यांचा घनिष्ठ संबंध सहजपणे लक्षात येतो. काही ठिकाणी विणेसारखा भोपळा नसलेले इतरही तंतुवाद्य त्यांच्याकडे दिसून येतात.
विरांगणा सुरसुंदरी
खड्गधारिणी, शिव मंदिर, अन्वा
भारतीय इतिहासात स्त्रियांचे अस्तित्व केवळ नृत्य, संगित किंवा शृंगार यांच्यापर्यंत मर्यादित राहिलेला नाही. त्यापलिकडे जाऊन राजकारण आणि युद्धांमध्ये देखिल स्त्रियांनी अतिशय महत्वपूर्ण भुमिका निभावलेली आहे. सुरसुंदरींच्या शिल्पांमध्ये देखील ही भुमिका स्पष्टपणे दिसून येते.
शत्रुमर्दिनी हे एक सुरसुंदरीचे रूप आहे. याठिकाणी तिच्या एका हातात तलवार आणि दुसर्या हातात शत्रुचे धडापासून वेगळे केलेले डोके आहे. मरीचिका या रूपामध्ये सुरसुंदरीच्या हातात एक धनुष्य दिसते. काही ठिकाणी ती केवळ धनुष्य हातात घेऊन उभी दिसते, तर काही ठिकाणी ती धनुष्याच्या प्रत्यंचेवर बाण लावून युद्ध्याच्या तयारीत दिसते. खड्गधारिणी हे एक रूप काही ठिकाणी दिसते, ज्यामध्ये सुरसुंदरी हातामध्ये तलवार घेऊन लढाईसाठी सज्ज आहे. अशाच प्रकारे दंडधारीणी रूपात तिच्या हातात तलवारीऐवजी एक दंड दिसून येतो. काही तुरळक ठिकाणी हातात गदा घेतलेली सुरसुंदरीदेखिल दिसते.
सुरसुंदरीची इतर रूपे
या सर्व रूपांशिवाय पुत्रवल्लभा रूपामध्ये लहान मुलाला कडेवर घेऊन अथवा आपल्या शेजारी उभे करून उभी असलेली सुरसुंदरी दिसून येते. शुभगामिनी हे रूप देखिल बर्याच ठिकाणी दिसून येते. या रूपात सुरसुंदरी रस्त्यावरून जात असताना तिच्या पायात टोचलेला काटा काढताना ती दिसते. काही ठिकाणी ती स्वतः हा काटा काढते, तर काही ठिकाणी इतर कोणीतरी तिची मदत करताना दिसून येते. जया या रूपात ती हातामध्ये एक कलश घेऊन चालताना दिसते. कलश हे विजयाचे प्रतिक असल्याने तिला जया हे नाव दिले गेले आहे. सुरसुंदरी हा शब्द या सर्व अप्सरांच्या गटासाठी एकत्र वापरला जातो. मात्र सुरसुंदरी नावाची एक अप्सरा देखिल आढळते, जेथे तिच्या हातात दारूने भरलेला कलश आणि पेले असतात. सुर या शब्दाचा एक अर्थ दारू असा देखिल होतो, त्यामुळे हा शब्द. आलसा किंवा लीलावती या रूपात एक सुस्तावलेली सुरसुंदरी दिसून येते. मानिनी या रूपात एक रूष्ठ झालेली ललना दिसून येते. प्रियकरापासून दुरावा सहन न होत असल्याने ती रूष्ठ झालेली आहे असे कवी या रूपाबद्दल सांगतात.
पायात रूतलेला काटा काढणारी शुभागामिनी, केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी
या सर्व रूपांमध्ये सुरसुंदरी केवळ स्वतःमध्ये मग्न असताना दिसते. मात्र सुरसुंदरीची दोन रूपे अशी आहेत की जेथे ती देवतेच्या सेवेमध्ये मग्न असते. चमरा किंवा चामरधारीणी या रूपात ती देवतेसाठी चामर धरून देवतेला हवा घालत आहे. तर प्रसादा या रूपात ती हातात अन्नाने भरलेले ताट किंवा भांडे धरून उभी असलेली दिसून येते.
मध्ययुगीन काळांतील मंदिरांमध्ये सुरसुंदरींची शिल्पे अधिक प्रमाणात आढळतात. त्या पुर्वी काही बौद्ध स्मारकांमध्ये यक्षिणी अथवा सुरसुंदरी दिसून येतात. ७ व्या शतकानंतर मंदिर बांधकाम शैली आणि मंदिराचा आकार जसजसा विकसित होत गेला, तसतसे हे शिल्प निर्माण करण्याचे प्रमाण वाढले असावे.
हे शिल्प निर्माण करण्यामागचा हेतु, आणि शिल्पात दर्शविलेल्या ललनांची कथा याबद्दल फारशी माहिती मिळत नाही. आणि ज्या कथा सांगितल्या जातात त्या केवळ दंतकथा आहेत. या मागचा लिखीत पुरावा कोठेही सापडत नाही. हेतु आणि कथा काहीही असल्या, तरी आज आपण या शिल्पकारांच्या कलेचा एक श्रेष्ठ अविष्कार म्हणून या सुरसुंदरींच्या शिल्पांकडे नक्कीच बघू शकतो.
[…] शेजारी शक्तीची सेवा करणारी सुरसुंदरी दिसून […]