संमिश्र देवता : मुर्तीशास्त्रातील एक अद्भुत अविष्कार

हिंदू धर्म हा अनेकेश्वरवादी आहे. इतर धर्माप्रमाणे हिंदू धर्मात एक देवता आणि एक पूजापद्धती नाही. त्यामुळे पुर्वापार येथे अनेक देवतांचे पूजन आणि भक्ती होत आलेली आहे. प्रत्येक देवतेला समर्पित स्वतःची एक पूजापद्धती आणि संप्रदाय राहिलेला आहे. शिवाची पुजा करणारा शैव संप्रदाय, विष्णूची भक्ती करणारे वैष्णव, शक्तीला सर्वोच्च मानणारा शाक्त समाज, सुर्याची पुजा करणारा सौर संप्रदाय, ब्रम्हांची सर्वोच्चस्थानी पूजा करणारा ब्रम्ह संप्रदाय, पंचतत्वांना मानणारा स्मार्त संप्रदाय असे अनेक संप्रदाय एकत्र राहिले आहेत. विविध संतांकडून समाजप्रभोधन केल्यानंतर भक्ती मोहिमेतून आपल्याकडे पंढरपूरच्या विठोबाला मानणारा वारकरी संप्रदाय निर्माण झाला. शैव संप्रदायाअंतर्गत महादेवाच्या योगी रूपाने मोहित होऊन नाथ संप्रदाय निर्माण झाला आणि महाराष्ट्रात वाढला.

हे सर्व संप्रदाय एकत्र राहत असले, तरी त्यांच्यामध्ये काही वेळा वाद नक्कीच झाले असतील. झाले असतील असे यासाठी म्हणतोय की या वाक्याला ठोस असे प्रमाण नाही आहे. १७८९ साली त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यादरम्यान शैव सन्यासी आणि वैष्णव वैरागी यांच्यामध्ये “कुंभच्या आंघोळीचा पहिला मान कोणास मिळावा” या विषयावरून वाद आणि युद्ध झाले असा उल्लेख पेशव्यांच्या एका ताम्रपत्रात सापडतो. या युद्धात १२००० पेक्षा अधिक लोक मृत्यूमुखी पडले, आणि त्यानंतर पेशव्यांच्या मध्यस्तिने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर असे दोन ठिकाणी कुंभमेळा भरण्यास सुरूवात झाली. हे एक उदाहरण वगळता असे विवाद झाले असल्याचे पुरावे सापडत नाहीत. मात्र या संप्रदायांमध्ये एकमेकांबद्दल असूया आणि भेद नेहमीच राहिलेले आहेत. यामुळेच प्रत्येक संप्रदायाच्या पुराणांमध्ये आणि लोककथांमध्ये इतर देवतांना कमी लेखण्याचा प्रयत्न दिसून येतो.

विविध संप्रदायांतील हा भेद कमी करण्यासाठी शिल्पकारांनी एक अतिशय उत्तम कार्य केलेले आहे. वेगवेगळ्या संप्रदायांतील देवतांना एकत्र करून त्यांनी नविन देवतांची निर्मिती केली. अर्थातच ही निर्मिती आधी कथांमध्ये आणि पुराणांमध्ये झाली, आणि त्याची प्रतिकृती नंतर शिल्पकलेतून जगासमोर ठेवली गेली. यामध्ये शैव, वैष्णव, शाक्त, ब्रम्ह आणि सौर या सर्वच संप्रदायांना एकत्र आणण्याचे कार्य केले गेले आहे.

हरीहर

विष्णू (हरी) आणि शिव (हर) यांच्या एकत्र येण्याने हरीहर या देवतेची निर्मिती झाली आहे. काही वेळा हरीहराचा उल्लेख शंकरनारायण (शंकर म्हणजे शिव आणि नारायण म्हणजे विष्णू) असा देखिल केला जातो. ६ व्या शतकातील बदामी लेण्यांमध्ये सर्वप्रथम हरीहराचे शिल्प दिसून येते. पुढील काळात महाराष्ट्रातील विविध भागांत हरीहराची मंदिरे अथवा शिल्पे निर्माण झाले.

हरीहराच्या निर्मितीबद्दल दोन वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात. एका कथेनुसार समुद्रमंथनानंतर जेव्हा अमृतप्राशनासाठी देव आणि असुर यांच्यामध्ये भांडण सुरू झाले आणि युद्धाची परीस्थिती निर्माण झाली, त्यावेळी विष्णूंनी मोहिनी अवतार धारण केला. मोहिनीने सर्व अमृत देवांना दिले आणि असूरांना केवळ पाणी दिले. विष्णूच्या या मोहिनी रूपावर भाळून महादेवांनी त्यांना अलिंगण देण्याचा प्रयत्न केला. याच वेळी विष्णू आपल्या मूळ रूपात परत आले. शिव आणि विष्णू यांच्या या घट्ट आलिंगनामुळे दोघे एकरूप झाले, आणि त्यातून शिव आणि विष्णूचे हे संमिश्र रूप निर्माण झाले. दुसर्‍या कथेनुसार एकदा शैव आणि वैष्णव यांच्यामध्ये आपआपल्या इष्टदेवांच्या महानतेवरून वाद निर्माण झाला. त्यावेळी शिव आणि विष्णू एकत्र आणि एकाच शरीरात तेथे प्रकट झाले, आणि आम्ही दोघे एकच आहोत हा संदेश दिला.

पुरंदर, जि पुणे येथील हरिहर मुर्ती (सध्या मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय येथे ठेवण्यात आलेली आहे)

मुर्तीकलेमध्ये हरीहरांच्या हातात महादेवाशी संबंधित चिन्हे (जसे त्रिशूळ, डमरू) आणि विष्णूशी संबंधित चिन्हे (जसे शंख, चक्र, गदा) हे अंकित असतात. दोघांचे वाहन, म्हणजेच नंदी आणि गरूड देखिल या शिल्पामध्ये समाविष्ट केले जातात. विष्णूच्या भागाकडील शरिरावर उंची दागिने आणि वस्त्र दिसून येतात, तर शिवाच्या भागाकडील शरिरावर साधारण कपडे दिसतात. डोक्यावरील मुकुटामध्ये देखिल हा बदल स्पष्टपणे जाणवतो. हरीहरचे सर्वात जुने शिल्प ६व्या शतकातील बदामी लेण्यांमध्ये सापडते. नंतरच्या काळात भारतभरात खूप ठिकाणी हरीहराचे शिल्प आणि मंदिरे निर्माण होण्यास सुरूवात झाली. महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी हरीहर नावाने मंदिरे आहेत. मात्र बहुतांश मंदिरात मुळ शिल्प पाहण्यास मिळत नाहीत.

पुरंदर येथे हरीहराचे एक खूप सुंदर शिल्प सापडले आहे. हे शिल्प सध्या मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय येथे ठेवण्यात आलेले आहे. वेरूळ येथील लेण्यांमध्ये देखिल हरीहराचे एक शिल्प आहे. परळी येथे वैद्यनाथ मंदिराच्या पाठीमागे हरीहर तिर्थ नावाने मोठे कल्लोळ (बारव) आहे. नाशिकजवळील हरीहर किल्ला गिर्यारहणप्रेमींना आकर्शित करतो. मात्र या किल्ल्यावर किंवा गावात कोठेही हरीहराचे मंदिर अथवा शिल्प दिसून येत नाही. कदाचित ही आकर्षक शिल्पे मध्ययुगिन काळात चोरी झाली असावीत किंवा परकीय आक्रमकांकडून नष्ट केली गेली असावीत. वेरूळ येथे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराजवळ एक हरीहर मंदिर आहे. मात्र येथील मुर्ती हरीहराची नसून हरिहरार्क या संमिश्र देवतेची आहे. असे असले तरी कित्येक गाव, तिर्थ आणि मंदिरांना हरीहर या नावाने ओळखले जाणे या देवतेचे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व सांगते.

अर्धनारीश्वर

अर्धनारीश्वर हे शिव आणि शक्ती यांचे एकत्र स्वरूप आहे. अर्धे पुरूष शरीर आणि अर्धे स्त्री शरीर अशा स्वरूपात अर्धनारेश्वराचे चित्रण केले जाते. बहुतांश शिल्पांमध्ये अथवा चित्रांमध्ये उजवी बाजू ही महादेवाची आणि डावी बाजू ही शक्तीची असते. अर्धनारीश्वराचे हे चित्रण अगदी कुशन काळापासून (इस १ ले शतक) पाहायला मिळते. पुढे गुप्त काळानंतर हे चित्रण आणखी विकसित होत गेले आहे.

अर्धनारीश्वराचे हे रूप केवळ शिव आणि शक्ती यांच्या मिलनापुरते मर्यादित नाही अहे. त्यामागे इतरही काही प्रतिके लपलेली आहेत. हिंदू वेदांमध्ये पुरूष आणि प्रकृती अशी एक संकल्पना अहे. प्रकृती म्हणजे या ब्रम्हांडात असलेली उर्जा. ही उर्जा विविध रूपांमध्ये असू शकते. आणि पुरूष म्हणजे जे कोणी या उर्जेचा वापर करतात. या ठिकाणी पुरूष हा शब्द स्त्री आणि पुरूष या स्वरूपातील नसून सजिव आणि निर्जिव या स्वरूपात समजायला हवा. जे सजिव आहेत ते स्वतःच्या जगण्यासाठी आणि विकासासाठी या उर्जेचा वापर करतात. म्हणजे मानव, पशू, पक्षी, वनस्पती हे सर्वच एका अर्थाने या पुरूष संकल्पनेमध्ये येतात. अर्धनारीश्वराच्या या रूपात शिव हे पुरूषांचे प्रतिनिधित्व करतात, तर शक्तीस्वरूप हे प्रकृतीचे प्रतिनिधित्व आहे. पुरूष आणि प्रकृती हे एकमेकांपासून वेगळे नसून एकच आहेत, आणि एकमेकांशिवाय टिकू शकत नाहीत हे या अर्धनारीश्वराच्या संकल्पनेतून प्रतिकात्मक रूपात सांगितलेले आहे.

बदामी येथील लेण्यात कोरलेले अर्धनारीश्वराचे रूप

अर्धनारीश्वराला चित्ररुपात किंवा मुर्तीकलेत सादर करताना शिवाच्या भागात कोणतेही दागिने अथवा उंची वस्त्र दिसत नाहीत. मात्र शक्तीच्या भागात हे सर्व दिसून येतात. याठिकाणी शिव हे आध्यात्माचे प्रतिक आहेत, आणि शक्ती भौतिक वस्तूंचे. आध्यात्म आणि भौतिक सुख हे एकमेकांचे पूरक आहेत. ते दोघे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत, हे एक प्रतिक याबद्दल सांगितले जाते.

अर्धनारीश्वराच्या उगमाबद्दल दोन कथा सांगितल्या जातात. एका कथेमध्ये शिवाबद्दल आपले प्रेम व्यक्त करताना पार्वतीने (शक्तीचे एक रूप) अशी इच्छा प्रकट केली की “मला आपल्याशी इतके घट्ट नाते निर्माण करायचे आहे की आपल्याला कोणीच वेगळे नाही करू शकणार”. अशी इच्छा प्रकट करून पार्वतीने महादेवांना घट्ट आलिंगन दिले. आणि या आलंगनामध्ये शिव आणि पार्वती एकरूप झाले. दुसर्‍या कथेनुसार सृष्टी निर्माण करताना ब्रम्हदेवाने सर्व नर जीव तयार केले. आणि सतत तयार करीत राहिले. मात्र हे सर्व करताना ते दमले, व खूप काळ हे कार्य करू शकले नाहीत. त्यामुळे पृथ्वीवर जीव अवतरीत होण्याचा दर कमी झाला. यावेळी शिव हे अर्धनारीश्वराच्या रूपात त्यांच्या समक्ष उपस्थित झाले. अर्धनारीश्वर रूपातील महादेवांना पाहून ब्रह्मांना आपली चूक लक्षात आली. त्यांनी प्रत्येक नर जिवासोबत मादी जिवदेखील निर्माण केला. आणि यानंतर पृथ्वीवर जिवांची संख्या वाढविण्यासाठी त्यांना जास्त मेहनत करावी लागली नाही.

अर्धनारीश्वराच्या शिल्पांमध्ये शिवाच्या भागात डोक्यावर जटामुकूट (केसांच्या जटा एकमेकांवर रचून बनविलेली रचना) असतो. त्यावर चंद्र अथवा नाग दिसून येतो. शक्तीच्या भागात डोक्यावर करंदमुकुट दिसून येतो. शिवाच्या कानांत सर्प कुंडल आहेत तर शक्तीच्या कानामध्ये वालिका कुंडल (गोल कुंडल) दिसून येतात. शिवाच्या भागात जनेऊसारखे एक धागे सोडता इतर कोणताही दागिना दिसून येत नाही, तर शक्तिच्या भागात बरीच दागिने दिसून येतात. शिवाचे शरीर हे मोठे खांदे असलेले आणि बलवान असते, तर शक्तिच्या शरीरात मोठे स्तन, कमनिय बांधा आणि थोडेसे झुकलेले खांदे यामुळे स्त्रित्वाची जाणिव होते. शिवाच्या हातात त्रिशुल, डमरू किंवा तत्सम वस्तू दिसतात, तर शक्तीच्या हातांमध्ये विविध आयुधे दिसतात. काही वेळा मुर्तीसोबत केवळ नंदी दिसतो, तर काहीवेळा नंदी आणि वाघ अथवा सिंह असे दोन वाहन दिसतात. शिवाच्या शेजारी शिवगण कोरलेले दिसतात, तर शक्तीच्या शेजारी शक्तीची सेवा करणारी सुरसुंदरी दिसून येते.

कुशन किंवा गुप्त काळामध्ये अर्धनारीश्वराच्या प्रतिमा सापडल्या असल्या तरी त्यांचे विस्तृत रूप सर्वप्रथम वेरूळ आणि बदामी येथील लेण्यांमध्ये (५वे आणि ६वे शतक) दिसून येते. मुंबईजवळील घारापुरी (एलिफंटा) येथील लेण्यांमध्ये देखिल हे रूप कोरलेले दिसून येते. सोबतच खरोसा (जि लातूर), माहूर (जि नांदेड), अंबेजोगाई (जि बीड) येथील लेण्यांमध्ये देखिल हे शिल्प कोरलेले दिसून येते. पुढील काळात निर्माण झालेल्या मंदिरांमध्ये कित्येक ठिकाणी अर्धनारीश्वराचे शिल्प आढळून येते. पंढरपूरजवळ वेळापूर या ठिकाणी एक अर्धनारीश्वर मंदिर आहे. मंदिरातील मुर्ती उमा महेश्वराची असली तरी येथील वास्तुसंग्रहालयात एक अर्धनारीश्वराची मुर्ती दिसून येते. कदाचित मंदिरामध्ये आधी ही अर्धनारीश्वराची मुर्ती असावी अशी शक्यता यामुळे दिसून येते.

दत्तात्रय

महाराष्ट्रात दत्तात्रय या देवतेचे महत्व खूप जास्त आहे. दत्तात्रय हे एक सन्यासी रूपातील दैवत आहे. ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन देवांच्या एकत्र येण्याने दत्तात्रय हे रूप तयार झाले आहे. तीन देवतांच्या एकत्र येण्याच्या घटनेमुळे त्यांना त्रिमुर्ती असेदेखिल म्हटले जाते. विविध पुराणांमध्ये दत्तात्रयांबद्दल विविध कथा सांगितल्या जातात. पुराणांतील कथांमध्ये दत्तात्रय यांना अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनसुया यांचे पुत्र मानले गेले आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूर या ठिकाणास त्यांचे जन्मस्थान मानले गेले आहे. दत्तात्रयांनी आपल्या आयुष्यात २४ गुरूंकडून शिक्षण घेतल्याचा उल्लेख आहे. यामध्ये पृथ्वी, हवा, आकाश, पाणी, अग्नी, चंद्र, सुर्य, कबूतर, अजगर, भुंगा, मधमाशी, गरूड, समुद्र, पतंग किडा, हत्ती, हरीण, मासा, गणिका, लहान मूल, महिला, साप, बाण, कोळी किडा आणि सुरवंट यांचा समावेश आहे. या ठिकाणी दत्तात्रयांनी आपल्या सभोवतालच्या प्रत्येक व्यक्ती आणि वस्तूकडून काहीतरी शिकायला पाहिजे असा संदेश दिला आहे.

मुर्तिकलेमध्ये दत्तात्रयांना तीन डोकी आणि सहा हातांनी दर्शविलेले आहे. त्यांची तीन डोकी ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तीन देवतांची आहेत. त्यांच्या सहा हातांमध्ये तीनही देवतांशी संबंधित वस्तू आहेत. यामध्ये ब्रह्मांची जपमाळ आणि कमंडलू, विष्णूंचे शंख आणि सुदर्शन चक्र, आणि शिवांचे त्रिशूळ आणि डमरू यांचा समावेश आहे. त्यांच्या आजूबाजूला गाय आणि कुत्रे दर्शविले जातात.

महाराष्ट्रात दत्तात्रयांची बरीच मंदिरे आहेत. यामध्ये प्रामुख्याने नांदेड जिल्ह्यातील माहूरचा उल्लेख करावा लागेल. माहूर हे दत्तात्रयांचे जन्मस्थान मानले गेले आहे. सोबतच पुणे जिल्ह्यातील नारायणपूर, कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबा वाडी, बीड जिल्ह्यातील पांचाटेश्वर यांचा समावेश आहे.

मार्तंड भैरव

मार्तंड अर्थात सूर्य आणि भैरव अर्थात महादेव यांच्या मिलनातून मार्तंड भैरव हे दैवत निर्माण झालेले आहे. मार्तंड भैरवास मल्हारी, मैलारलिंग या नावांनीदेखिल ओळखले गेलेले आहे. महाराष्ट्रातील लोकदेवतांपैकी एक असलेले खंडोबा हे दैवत देखिल मार्तंड भैरवाचेच एक रूप आहे. मल्ल आणि मनी या दोन राक्षसांना मारण्यासाठी शिव आणि सूर्य यांनी आपआपल्या शक्ती एकत्र केल्या, आणि त्यातून मार्तंड भैरवाची निर्मिती झाली असे म्हटले जाते. ९व्या आणि १०व्या शतकानंतरच्या काळात मार्तंड भैरवाची शिल्पे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. मुर्तीकलेमध्ये मार्तंड भैरव हे ४ हातांनी दखविले जातात. त्यांच्या ४ हातांमध्ये डमरू, त्रिशुळ, भंडारा पात्र (हळदीने भरलेले पात्र) आणि खड्ग (तलवार) दिसून येतात. खंडोबा रूपात दर्शविताना मार्तंड भैरवांना एका पांढर्‍या घोड्यावर म्हाळसा या आपल्या राणीसोबत बसलेले दिसून येतात. म्हाळसा हे आपल्या हातातील भाल्याने राक्षसास मारत आहे.

पणजी येथील शासकिय पुरातत्व संग्रहालयातील मार्तंड भैरवाचे शिल्प

कर्नाटक व आंध्र भागात मोठ्या प्रमाणात पुजले जाणारे विरभद्र हे रूपदेखिल काही वेळा मार्तंड भैरवाशी जोडले गेले आहेत. मात्र विरभद्र हे केवळ शिवाचे एक अवतार आहे, तर मार्तंड भैरव अथवा खंडोबा हे एक संयुक्त दैवत आहे. महाराष्ट्रात खंडोबा रूपातील मार्तंड भैरवाची कित्येक मंदिरे आहेत. यांमध्ये पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील मंदिर सर्वाधिक प्रसिद्ध आहे. याशिवाय सातारा जिल्ह्यात पाली, धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग आणि उमरगा, अहमदनगर जिल्ह्यातील शेगुड, संभाजीनगर जिल्ह्यातील सातारे, नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील मंदिरेदेखिल प्रमुख्याने नोंदवावी लागतील. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात खंडोबांची शेकडो मंदिरे आहेत.

सूर्यनारायण

सूर्य आणि शिव यांच्या संयुक्त मार्तंड भैरव रूपाप्रमाणेच सूर्य आणि विष्णु (नारायण) यांचे संयुक्त असणारे सुर्यनारायण हे रूपदेखिल खूप ठिकाणी आढळून येते. बोलीभाषेमध्ये सुर्यनारायण हे शब्द सुर्याच्या मुर्तीसाठी सुद्धा सर्रास वापरले जाते. मात्र मुर्तीशास्त्राच्या दृष्टीने विचार केल्यास सुर्यनारायण हे नाव सुर्य आणि विष्णूच्या संयुक्त देवतेसाठी वापरले जाते.

सूर्यनारायाणाच्या अवतरणामागची कथा अगदी स्पष्टपणे कोठेही दिसून येत नाही. मात्र सुर्याची उपासना करणारा सौर संप्रदाय आणि विष्णूंची पुजा करणारा वैष्णव संप्रदाय यांच्या एकत्रिकरणासाठी सूर्यनारायण या देवतेची निर्मिती करण्यात आली असल्याची शक्यता आहे. सूर्यनारायणाच्या शिल्पांमध्ये विष्णूसोबत साधर्म्य असणरी सर्व प्रतिके असतात. केवळ देवतेच्या एका हातात सूर्याप्रमाणे फूल दिसून येते. सोबतच सुर्याचा सात घोड्यांचा रथ आणि गरूड हे विष्णूचे वाहन असे दोनही प्रतिके दिसून येतात.

पंढरपूरजवळील नारायण चिंचोली येथील सुर्यनारायणाची मुर्ती

महाराष्ट्रामध्ये पंढरपूरजवळ नारायण चिंचोली आणि तारापूर येथे सूर्यनारायण मंदिरे आहेत. पैकी नारायण चिंचोली येथे सूर्यनारायणाची मूळ मुर्ती अजूनही पहायला मिळते. तारापूर येथील मुळ मुर्ती भंग झाल्यानंतर स्थानिकांनी ती मुर्ती भिमा नदीत सोडून दिली आणि विष्णूंची नविन मुर्ती तेथे स्थापित केली गेली. मुंबईमधिल भुलेश्वर भागात देखिल सुर्य नारायणाचे एक मंदिर आहे. शिवाय राज्यातील अनेक मंदिरांमध्ये सुर्य नारायणाचे शिल्प कोरलेले दिसून येतात.

हरीहरार्क

यापुर्वी चर्चा केल्याप्रमाणे हरीहर म्हणजे विष्णू आणि शिव यांचे एकत्र रूप आहे. काही ठिकाणी या हरी अर्थात विष्णू आणि हर अर्थात शिव यांच्यासोबत अर्क अर्थात सूर्य यांचीही जोड मिळते. हरीहरार्क चे शिल्प तुलनेने कमी प्रमाणात पहायला मिळते. वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिराजवळ हरीहर मंदिर या नावाने एक मंदिर आहे. मात्र येथील मुर्ती ही हरीहरार्कची आहे. याव्यतिरीक्त इतर कोठे मला हरीहरार्कची मुर्ती अथवा शिल्प पाहण्यात आले नाही.

हरीहरार्कपितामह

हरी, हर, अर्क यांच्या जोडीला जेव्हा पितामह अर्थात ब्रह्मा येतात, तेव्हा हरीहरार्कपितामह ही संयुक्त देवता बनते. या देवतेच्या शिल्पांमध्ये या चारही देवतांशी संबंधित चिन्हे दिसून येतात. या देवतेची शिल्पे खूप दुर्मिळ आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील चामरोशी येथील मकरंद महादेव मंदिरामध्ये हरीहरार्कपितामहाचे शिल्प दिसून येते. गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही मंदिरांमध्ये हरीहरार्कपितामहांची शिल्पे देसून येतात.

वैकुंठकमलजा

अर्धनारेश्वर हे शिव आणि पार्वती यांचे संयुक्त रूप आहे. अशाच प्रकारे विष्णू आणि लक्ष्मी यांचे एक संयुक्त रूप लक्ष्मीनारायण किंवा वैकुंठकमलजा या नावाने ओळखले जाते. वैकुंठकमलजेच्या शिल्पांमध्ये विष्णुंच्या हातातील चक्र आणि गदा यांच्यासोबत लक्ष्मीच्या हातातील कमळपुष्प आणि कुंभ (पाण्याने अथवा सोन्याच्या नाण्यांनी भरलेला हंडा) हे चिन्ह दिसून येतात. वैकुंठकमलजाचे हे रूप १०व्या शतकामध्ये पुर्व भारतात सर्वप्रथम निर्माण झाले असावे. त्यानंतर ते नेपाळ आणि उत्तर पुर्व भागात प्रसारीत झाले. आजच्या नेपाळ भागात वैकुंठकमलजाचे शिल्प खूप ठिकाणी दिसून येतात.

By Dr Dinesh Soni

Dinesh is an an indologist and is writer of 18 books. He holds a doctorate in cultural studies. He is felicitated by Acedemia Sinica, Taipei, Taiwan for his research in mythology. He has received numerous awards including the Lokmat Digital Influencer Award (Heritage). Dinesh is also a speaker who has graced many occasions. He is the main admin of Indian.Temples.

One thought on “संमिश्र देवता : मुर्तीशास्त्रातील एक अद्भुत अविष्कार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *