अनेकेश्वरवादी असलेल्या हिंदू धर्मात नेहमीच विविध देवतांचे पूजन केले गेले आहे. यांपैकी प्रत्येक देवतेला समर्पित स्वतःची एक पूजापद्धती आणि संप्रदाय राहिलेला आहे. शिवाची पुजा करणारा शैव संप्रदाय, विष्णूची भक्ती करणारे वैष्णव, सुर्याची पुजा करणारा सौर संप्रदाय, ब्रम्हांची सर्वोच्चस्थानी पूजा करणारा ब्रम्ह संप्रदाय, पंचतत्वांना मानणारा स्मार्त संप्रदाय असे अनेक संप्रदाय एकत्र राहिले आहेत. अशाच प्रकारे शक्तीला सर्वोच्च मानणारा शाक्त संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे.
पूर्व भारतातील बंगाल, ओडीशा आणि आसाम भागात शक्तीची उपासना मोठ्या प्रमाणात होते. मात्र अगदी पुर्वापार भारताच्या इतर भागांत देखिल शक्तीची मोठ्या प्रमाणात उपासना होत राहिलेली आहे. यामध्ये महाराष्ट्राचा देखिल समावेश आहे. महाराष्ट्रात मागील कित्येक शतकांपासून विविध रूपांत देवीची उपासना होत राहिलेली अहे. यामध्ये लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा या प्रमुख देवतांचा समावेश तर आहेच. मात्र इतरही काही रुपांमध्ये देवीचे अथवा शक्तीचे पुजन येथे होत राहिले आहे. सदरील लेख लिहिताना मी शक्ती हा शब्द सर्व महिला देवतांना उद्देशुन वापरत आहे.
महाराष्ट्रातील देवीपुजनाचा इतिहास पहायला गेल्यास आपल्याला जवळपास २४ शतके मागे जावे लागेल. इस पूर्व ३ र्या शतकातील पितळखोरा येथील बौद्ध लेण्यांमध्ये इतर शिल्पांसोबतच एक गजलक्ष्मीचे शिल्पदेखिल दिसून येते. एका कमळावर बसलेली लक्ष्मी आणि त्यांना दोन बाजूने हत्ती आपल्या सोंडेने अभिषेक करीत आहेत अशा प्रकारचे हे शिल्प आहे. हे शिल्प सध्या मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालयात ठेवण्यात आलेले अहे. याच काळातील भरहूत (मध्य प्रदेश) येथील बौद्ध स्तुपामध्ये असेच एक शिल्प दिसून येते. याच काळातील गांधार साम्राज्याच्या नाण्यांवर देखिल गजलक्ष्मी दिसून येते. यावरून हे दिसून येते की महाराष्ट्रात देवीच्या पूजनाची सुरूवात ही इतर सर्व प्रदेशांच्या समकालिनच आहे. गजलक्ष्मी हे दोन गोष्टींचे प्रतिक आहे. सक्षम आणि सुबत्तेने परीपूर्ण राजसत्तेचे ते प्रतिक आहे. आणि त्यासोबतच प्रजनन क्षमता आणि सुपिकता (fertility) यांचेदेखिल प्रतिक गजलक्ष्मीच्या रूपात आहे. प्रजनन क्षमतेचे आणखी एक प्रतिक लज्जागौरीच्या स्वरूपात दिसून येते. लज्जागौरीचे स्वरूप हे स्त्रीच्या योनीला महत्व देणारे आहे. लज्जगौरीच्या मुर्तीमध्ये देवीचा चेहरा हा कमळाच्या फुलाने झाकलेला आहे. गुडघ्यात वाकलेले आणि थोडेसे पसरलेले पाय यामुळे योनीचा भाग अगदी स्पष्टपणे दिसून येतो. इस १ल्या ते ४थ्या शतकाच्या काळात प्रजनन क्षमतेची देवता म्हणून लज्जागौरीचे पूजन केले जात असे. महाराष्ट्रातील तेर (जि धाराशिव) येथे उत्खननात एक लज्जागौरीची मुर्ती सापडली अहे. सदरील मुर्ती इस १ल्या अथवा २र्या शतकातील आहे. यावरून महाराष्ट्रातील देवीपुजनाचा इतिहास लक्षात येतो.
लज्जागौरी शिल्प, रामलिंगप्पा लामतुरे पुरातत्व संग्रहालय, तेर, जि धाराशिव. साभार: CENTER FOR ART & ARCHAEOLOGY
वेरूळ येथील लेण्यांमध्ये विविध देवींची शिल्पे देसून येतात. यामध्ये गंगा, यमुना, दुर्गा, उषा, अन्नपुर्णा, पार्वती, महिशासूरमर्दिनी, गजलक्ष्मी, सिदरिका, अंबिका (लक्ष्मीचे एक स्वरूप), यक्षी, बौद्ध धर्मातील विविध तांत्रिक देवता यांचा समावेश आहे. सोबतच अर्धनारीश्वर ही शिव आणि शक्तीच्या संयुक्त रूपातील देवता देखिल येथे दिसून येते. यावरून तत्कालिन महाराष्ट्रात शक्ती अथवा देवींचे पुजन मोठ्या प्रमाणात होत असे हे लक्षात येते.
महाराष्ट्रात ५ व्या शतकापासून १३ व्या शतकापर्यंत बनलेल्या विविध मंदिरांमध्ये अनेक देवींची शिल्पे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. या शिल्पांमध्ये गजलक्ष्मी, महिशासुरमर्दिनी, दुर्गा, लक्ष्मी नरसिंह (नरसिंहासोबत विरजमान असणारी लक्ष्मी), उमा महेश्वर (महादेवासोबत विराजमान असलेली पार्वती), योगिनी, सरस्वती, काली, अंबाबाई, चामुंडी अथवा भैरवी अशी अनेक शिल्पे दिसून येतात. यावरून देवींचे पुजन हे केवळ दुर्गा अथवा लक्ष्मी यांच्यापुरते मर्यादित नव्हते हे देखिल स्पष्ट होते.
हिंदू धर्मामध्ये पुरूष देवतांना सुद्धा स्त्रीरूपात पुजन्याची पद्धत आहे. कित्येक पुरातन मंदिरांमध्ये सप्तमातृका अथवा अष्टमातृका दिसून येतात. ब्रह्मांची स्त्रीशक्ती ब्रह्माणी, महादेवांचे स्त्रीरूप महेश्वरी, कार्तिकेयांचे स्त्रीस्वरूप कौमारी, विष्णूंचे स्त्रीरूप वैष्णवी, वराहाचे स्त्रीस्वरूप वाराही, इंद्राचे स्त्रीरूप इंद्राणी अथवा इंद्री, भैरवाचे स्त्री रूप चामुण्डा अथवा भैरवी, नरसिंहांचे स्त्रीरूप नरसिंही अशा या अष्टमातृका आहेत.
ब्रह्माणी कमलेन्दुसौम्यवदना माहेश्वरी लीलया
कौमारी रिपुदर्पनाशनकरी चक्रायुधा वैष्णवी ।
वाराही घनघोरघर्घरमुखी चैन्द्री च वज्रायुधा
चामुण्डा गणनाथरुद्रसहिता रक्षन्तु नो मातरः ॥
अर्धनारेश्वर मंदिर, वेळापूर, जि सोलापूर येथील अष्टमातृका शिल्प
या अष्टमातृकांचे शिल्प जवळपास सर्व पुरातन मंदिरांमध्ये दिसून येतात. सोबतच बारव अथवा कुंड या ठिकाणी देखिल हे शिल्प पहायला मिळते. काही ठिकाणी या मातृकांचे स्वतंत्र शिल्प देखिल सापडते. राज्यातील विविध पुरातत्व वस्तुसंग्रहालयांमध्ये अशी शिल्पे आहेत. नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे एका झाडाखाली वैष्णवी, महेश्वरी आणि ब्रह्माणी यांच्या जवळपास ४ फुट उंचीच्या मुर्त्या दिसतात. जालना जिल्ह्यातील अन्वा येथील पुरातन शिवमंदिराच्या बाह्य भागावार वैष्णवीची विविध रूपे कोरलेली आहेत. याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील यवतजवळील भुलेश्वर येथील मंदिरातील स्त्रीरूपातील गणपतीचे (विनायकी या नावाने संबोधले जाते) शिल्प दिसून येते. पुरूष देवतांचे स्त्रीरूपात करण्यात येणारे पुजन देखिल या भागात शाक्त संप्रदायाचा असलेला खोल प्रभाव दर्शवतो.
महाराष्ट्रातील लोककथांमध्ये देखिल देवी विविध रूपांमध्ये दिसून येते. सितेच्या अपहरणानंतर राम जेव्हा सितेच्या शोधात निघाले होते, त्यावेळी तुळजाभवानीने त्यांना योग्य मार्ग दाखविला होता अशी आख्यायिका आहे. राम जेव्हा सितेच्या शोधात व्याकूळ होऊन वनांत फ़िरत होते तेव्हा सर्वप्रथम जटायूने त्यांना रावणाकडून झालेल्या अपहरणाबद्दल सांगितले. पुढे जेव्हा ते मार्गक्रमण करीत होते, त्यावेळी पार्वती सितेच्या रूपात रामांसमोर आली. मात्र रामांनी त्यांना लगेच ओळखले व प्रणाम केला. तेव्हा पार्वती आपल्या मुळरूपात आली, आणि तिने घाटामध्ये एका मोठ्या दगडावर उभे राहून आपल्या हाताने रामाला कोणत्या बाजूस जायचे आहे हे सांगितले. तुळजापूर॒च्या घाटाच्या पायथ्याशी घाटशिळा मंदिर हे या घटनेची साक्ष देते. त्यानंतर रामांच्या विनंतीवरून पार्वती तुळजाभवानी रूपात या पर्वताच्या माथ्यावर विराजमान झाली अशी आख्यायिका सांगितली जाते. मध्ययुगिन काळात छत्रपती शिवरायांना याच तुळजाभवानीने आशिर्वाद स्वरूपात एक तलवार दिली होती. या तलवारीला भवानी तलवार असे म्हटले जाते.
महाराष्ट्रातील लोकदेवतांमध्ये विविध देवींची पूजा केली जाते. जरीआई आणि मरीआई ही लोकदेवता प्रत्येक गावामध्ये सापडते. ‘जरी’ म्हणजे तापाची साथ. ‘मरी’ म्हणजे पटकी,देवी यांसारख्या रोगांची साथ. या प्राणघातक साथींच्या रोगांचे निवारण करणारी एक देवी कल्पून ती ‘जरी-मरी’ वा ‘जरीआई-मरीआई’ ह्या नावाने महाराष्ट्रात तसेच दक्षिण भारतात पूजिली जाते. जरी-मरीचे स्थान गावात एका कोपऱ्याला किंवा गावाबाहेर एखाद्या झाडाखाली असते.कोठे तिच्यावर केवळ आच्छादन असते, तर कोठे नैसर्गिक स्थितीतच स्थानापन्न झालेली दिसते. यल्लम्मा ही महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि गोवा भागातील एक मातृदेवता आहे. यल्लम्मा व रेणुका यांचे ऐक्य मानले जाते. गंधर्वांची जलक्रीडा पाहताना विचलित झालेल्या रेणुकेचा जमदग्नीच्या आज्ञेवरून परशुरामाने वध केला आणि तिला पुन्हा जिवंत करताना मातंगीचे मस्तक तिच्या धडाला व तिचे मस्तक मातंगीच्या धडाला जोडले गेले,अशी पुराणकथा आहे.जिवंत झालेल्या दोघींपैकी एक यल्लम्मा व दुसरी मरिअम्मा बनली. तिला पार्वतीचा अवतार मानण्यात आले असून लज्जागौरी, एकवीरा, जोगुळांबा, भूदेवी, मातंगी, यमाई व सांतेरी ही तिचीच रूपे आहेत, असे अभ्यासकांना वाटते. कार्ला येथील एकवीरा, मोहटा (जि अहमदनगर) येथील मोहटादेवी, माहूर (जि नांदेड) आणि रेणापूर (जि लातूर) येथील रेणुका, बदामीजवळील बनशंकरी हे देखिल यल्लम्माची रूपे मानली गेली अहेत. येडेश्वरी ही श्रीतुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून ओळखली जाणाऱ्या कळंब तालुक्यातील येरमाळा येथील देवी. प्रभू रामचंद्र ज्यावेळी वनवासाला निघाले, तेव्हा त्यांना प्रलोभन दाखविण्यासाठी देवी पार्वतीने सीतेचे रूप घेऊन त्यांना भुलवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रामाने पार्वतीला ‘वेडी आहेस’ असे म्हटले. तेव्हापासून देवी त्याच ठिकाणी राहिली व येडाई उर्फ येडेश्वरी झाली अशी आख्यायिका या देवी संदर्भात सांगितली जाते. कोकण भागात मुंग्यांच्या मोठमोठ्या वारूळांची सांतेरी या नावाने पूजा केली जाते. सांतेरी ही देवता लज्जागौरीप्रमाणेच प्रजनन क्षमतेसोबत जोडली गेलेली आहे.
शाक्त परंपरेमध्ये शक्तीची ५१ मंदिरे शक्तीपिठ या नावाने ओळखली गेली आहेत. संपूर्ण भारत तसेच नेपाळ आणि बांग्लादेशचा काही भाग यांमध्ये मिळून एकूण ५१ शक्तीपिठे सांगितली जातात. हे सर्व शक्तीपिठ हे आदि शक्तीच्या विविध रूपांना समर्पित आहेत. शक्तीपिठांच्या निर्मितीबद्दल एक कथा विविध पुराणांमध्ये समाविष्ट आहे. शक्तीने जेव्हा सती रूपामध्ये अवतार घेऊन महादेवांसोबत विवाह केला होता, त्यावेळची ही कथा आहे. सतीचे वडील दक्ष यांनी एक यज्ञ आयोजित केलेला होता, जेथे महादेवांना सोडून इतर सर्व जावयांना दक्षाने आमंत्रित केले होते. दक्षाचे सर्व जावई हे विविध देवतागण होते. सतीला वाटले की महादेवांना आमंत्रित करणे दक्ष चुकून विसरले असावे. त्यामुळे सती न बोलावणे येताही तेथे उपस्थित झाली. यावेळी दक्ष राजाने महादेवांच्या राहणीमान आणि वेशभुषेवरून सतीला हिनवले. पतीचा अपमान सहन न झाल्याने रागाच्या भरात सतीने यज्ञकुंडात उडी मारून आत्मदाह करून घेतला. सतीच्या अशा प्रकारे निघून जाण्यामुळे महादेवांना खूप रग आला. विरभद्र रूपात त्यांनी दक्ष राजाचा यज्ञ उद्ध्वस्त केला आणि दक्ष राजास मारून टाकले. मात्र त्यांचा राग येथेच शांत झाला नाही. राग आणि शोकाच्या भरात त्यांनी सतीचे अर्धवट जळालेले मृतदेह आपल्या खांद्यावर घेतले आणि संहार तांडव हे नृत्य आरंभ केले. संहार तांडवामुळे संपूर्ण ब्रम्हांड नष्ट होईल अशी भिती सर्व देवतांना वाटू लागली. महादेवांना शोकस्थितीतून बाहेर काढण्यासाठी विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या शरिराचे तुकडे केले. सतीच्या शरीराचे हे तुकडे पृथ्वीवर ज्या ज्या ठिकणी पडले, तेथे एक शक्तीपिठ निर्माण झाले. महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिर, तुळजापूर (जि धाराशिव) येथील तुळजाभवानी मंदिर, माहूर (जि नांदेड) येथील रेणुका मंदिर ही शक्तीपिठे आहेत. सोबतच वणी (जि नाशिक) येथील सप्तशृंगी देवीला अर्धे शक्तीपिठ मानण्यात येते. या शक्तीपिठांसोबत अंबेजोगाई (जि बीड) येथील जोगेश्वरी किंवा योगेश्वरी देवी, रेणापूर (जि लातूर) येथील रेणुका देवी, अलिबाग येथील पद्मक्षी रेणुका माता, कार्ला लेण्यांजवळील एकविरा देवी, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीजवळील मोहटादेवी, मुंबईमधिल मुंबादेवी, वाई (जि सातारा) जवळील काळुबाई अथवा मांढरदेवी, औंध (जि सातारा) येथील यमाई देवी, चंद्रपूर येथील महाकाली मंदिर अशी अनेक पुरातन मंदिरे आहेत.
कित्येक शतकांपासून सुरू असलेली शक्तीपुजनाची परंपरा महाराष्ट्रामध्ये आजही मोठ्या प्रमाणात दिसून येते. या परंपरेशी संबंधित जवळपास प्रत्येक मंदिरात आजही हजारो भाविक दर्शन व पूजा करतात. त्याचप्रमाणे या मंदिरांमध्ये आजही यात्रा भरविण्यात येतात. गोदावरी, कृष्णा, भिमा या नद्यांना देवीस्वरूपात पुजले जाते. वारंवार झालेल्या परकीय आक्रमणांनंतरदेखिल येथील लोकांनी या परंपरा जिवंत ठेवल्या आहेत हे विशेष…