मराठवाडा. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादचा परीसर. मात्र या औरंगाबाद व्यतिरीक्त इतर भागातील मंदिरे आणि स्थापत्य याविषयी आपल्याला खूपच कमी माहिती आहे. आपणापैकी खूप कमी जणांना हे माहित असेल की महाराष्ट्रातील सर्वात पुरातन बांधीव मंदिर मराठवाड्यात आहे; भारतातील सर्वात जुने लाकडी कोरीवकाम मराठवाड्यातील एका मंदिरात आहे आणि जगातील सर्वात जुनी गणेशमुर्ती मराठवाड्यातील एका गावात उत्खननामध्ये सापडली आहे. या विषयावर सर्वांना माहिती व्हावी याकरीता हा छोटासा प्रपंच.
मराठवाड्यात विस्तृत डोंगररांगा पसरलेल्या आहेत. मात्र पर्जन्यमान फ़ारसे नसल्याने या डोंगररांगांचा शेती किंवा वनासाठी खूप जास्त फ़ायदा नाही. मात्र सांस्कृतिक इतिहासासाठी मात्र या डोंगररांगांनी महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. एके काळी या भागात साहित्य, स्थापत्य आणि शिल्पकला खूप भरभराटीस होती. आणि त्याच्या पाऊलखुणा आजही आपल्याला दिसून येतात.
प्रदेशाचा इतिहास
या भागातील मंदिरांचा अभ्यास करण्यापूर्वी भूभागाचा इतिहास थोडक्यात समजून घेणे आवश्यक आहे. प्राचिन संस्कृत साहित्यात दक्षिण भारताचा उल्लेख “दक्षिणदेश” असा आहे. इस पहिल्या शतकातील “पेरोप्लस ऑफ एरिथ्रियन सी” या प्रवासवर्णनात तसेच इस ५ व्या शतकात आलेल्या फ़ाहियान या चिनी बौद्ध भिक्षूच्या प्रवासवर्णनात दक्षिणादेश या प्रदेशाचा उल्लेख आढळतो. विनयपिट्टक या बौद्ध ग्रंथात दक्षिणापथ हा भाग गोदावरी नदीच्या तिरावर वसलेला असल्याची नोंद आहे. दक्षिण देशात राहणा~या अनेक टोळ्यांचा आणि जमातींचा उल्लेख करणा~या प्लिनी या लेखकाने गोदावरी खो~यातील अश्मगी या टोळीचा उल्लेख आहे. या टोळीची राजधानी पतीत्थानच्या (आजचे पैठण) दक्षिणेस गोदाकाठी होती. या शहराचा उल्लेख पोदन, पोतन, पौंडण्य असा येतो. आज गोदावरी काठी वसलेल्या बोधन गावाची ही जुनी नावे आहेत. काव्यमिमांसा या प्राचिन ग्रंथामध्ये महाराष्ट्र आणि अश्मक या दोन राज्यांचा उल्लेख आहे. अश्मक प्रदेशातील गोदावरी आणि वंजुरा (आजची मांजरा) नद्यांचा उल्लेख आहे. या सर्वांवरून या भागाच्या प्राचिनत्वाची खात्री पटते.
पितळखोरा लेणी, जि संभाजीनगर (इस पूर्व ३ रे शतक)
इ स २ ~या शतकानंतरच्या इतिहासात सातवाहन राजवंशाच्या विविध जनपदांचे अस्तित्व आणि भरभराट यांची माहिती मिळते. भोगवर्धन (आजचे भोकरदन) हे एक महत्वपूर्ण जनपद होते. त्यासोबतच मूलक या जनपदाची राजधानी असलेल्या प्रतिष्ठाण या शहराचा उल्लेख देखिल ब~याच समकालिन लिखाणांमध्ये आढळतो. पैतान, पैठान या नावांनी देखिल या शहराचा उल्लेख येतो. आजचे पैठण हे शहर किती प्राचिन आहे हे यावरून दिसून येते. बॅरिगझा (आजचे गुजरातमधिल भरूच) या बंदरापासून २० दिवसांच्या अंतरावर हे शहर असल्याची नोंद आढळते.
याच काळातील आणखी एक अत्यंत महत्वपूर्ण व्यापारी केंद्र होते प्रतिष्ठाणपासून १० दिवसांच्या अंतरावर वसलेले तगर हे शहर. पुढील काळातील विविध लिखाणांमध्ये आणि शिलालेखांमध्ये याचा उल्लेख तंगर, तगरपुर असादेखील येतो. हे व्यापारी केंद्र नेहमीच परकीय व्यापाऱ्यांनी गजबजलेले राहत असे. इस ३ ऱ्या शतकामध्ये या भागात रोमन व ग्रीक व्यापाऱ्यांसोबत व्यापार होत असल्याचे पुरावे उत्खननात सापडले आहेत. हे तगरपूर म्हणजे आजचे उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरणा नदीच्या काठावरील तेर हे शहर आहे. याप्रमाणेच देवपल्ली या शहराचा देखील उल्लेख काही लिखाणांमध्ये आढळतो. आजचे देवगिरी आणि वेरूळ चा प्रदेश हे देवपल्ली नावाने ओळखले जात असावे.
तेर शहराचा इतिहास आणि तेर मधिल सांस्कृतीक वारसा
सातवाहनांनंतर वाकाटकांनी काही काळ या भागात सत्ता स्थापन केली असावी. मात्र याबद्दल अभिलेखीव पुरावा उपलब्ध नाही. या भागात यानंतर राष्ट्रकुटांची सत्ता स्थापन झाली. या राष्ट्रकुटांची तीन प्रमुख सत्ताकेंद्र होती. लत्तलूरपूर (आजचे लातूर), कंधारपूर (आजचे कंधार) आणि येल्लापूर (आजचे वेरूळ) या तीन ठिकाणांहून राष्ट्रकूटांची सत्ता चालत असे. याच काळात कर्नाटकातील वतापी (आजचे बदामी) येथून राज्य करणा~या बदामी चालुक्य यांचा उदय देखील वेरूळ येथून झाला असावा अशी मान्यता आहे. पुढील काळात उत्तर चालुक्य राज्याचे या भागावर वर्चस्व होते. त्यांच्या शिलालेखांमध्ये होट्टलकेरे (आजचे नांदेड जिल्ह्यातील होत्तळ), तगरनगर या शहरांसोबतच इतर ब~याच शहरांचा उल्लेख येतो. पुढील काळात यादवांच्या सत्तेमध्ये बरीच शहरे भरभराटीस आली होती. कल्याणी चालुक्य आणि यादव काळामध्ये या भागात मंदिरांची बांधणीदेखील मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. यादव काळानंतर या भागावर परकीय आक्रमणे सुरू झाली व १९४८ पर्यंत हा प्रदेश विविध परकिय सत्तांच्या राज्याचा भाग होता.
मराठवाड्यातील मंदिरांचा स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिने अभ्यास करीत असताना हा इतिहास समजून घेणे खूप आवश्यक आहे. या मंदिरांचा अभ्यास करीत असताना त्यांचे बांधकांच्या कालखंडानुसार विभाजन करणे सोयीचे असेल. या मंदिरांचे विभाजन साधारणतः ४ भागांत करता येईल.
- सातवाहन व राष्ट्रकूट काळातील गुहा / लेण्या (Cave Temples)
- गुप्त व वाकाटक कालिन मंदिरे (Early Standing Temples)
- चालुक्य कालिन मंदिरे
- यादवकालिन मंदिरे
लेणी
लेण्यांबद्दल अधिक माहिती : महाराष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी पान : कातळातील लेण्या
भारतात लेण्यांची सुरूवात बिहार आणि ओडीशा भागात झाली असली तरी लेण्या कोरणा~या कलाकारांना खरा राजाश्रय मिळाला सातवाहन राजांकडून. या सातवाहन राजांच्या काळात अजंटा, नाशिक, भाजे, कन्हेरी, बेडसे आणि जुन्नर याठिकाणी लेण्यांची निर्मिती झाली. पुढील काळात वाकाटक राजांनी या लेण्यांमधिल शिल्पकलेला चित्रकलेची जोड दिली. पुढील राष्ट्रकूट राजांनीदेखिल लेण्यांची ही परंपरा पुढे सुरू ठेवली.
खरोसा लेणी, जि लातूर
मराठावाड्यामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये लेण्या खोदलेल्या दिसून येतात. दुर्दैवाने अजंटा आणि वेरूळ यांच्या बरोबरीने इतर लेण्यांना प्रसिद्धी मिळू शकली नाही आहे. अजंटापासून जवळच असणारी पितळखोरा आणि घटोत्कच लेण्या, औरंगाबाद शहरातील लेण्या, देवगिरी किल्यात अगदी अलिकडे सापडलेल्या लेण्या, जालना जिल्ह्यातील भोकरदन येथील लेण्या, नांदेड जिल्ह्यातील माहूर आणि शिऊर येथील लेण्या, उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव येथील लेण्या, लातूर जिल्ह्यातील खरोसा, हत्तीबेट, हासेगाववाडी आणि कळमगाव लेण्या, बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथील लेण्या यासह परीसरात अनेक ठिकाणी लेण्या विखुरलेल्या आहेत. अजूनही या भागातील दुर्गम पहाडीरांगांमध्ये शोध घेतल्यास आणखी ब~याच लेण्या सापडू शकतात यात शंका नाही.
सातवाहन, गुप्त व वाकाटक कालिन मंदिरे
भारतामध्ये लेण्यांनंतर बांधिव मंदिरांची निर्मिती (stand alone temples) गुप्त काळात सुरू झाली. या काळात मातीच्या भाजलेल्या विटांचा वापर करून मंदिरे बांधले जाऊ लागले. याच शैलिला terracotta असे म्हटले जाते. भाजक्या मातीचा वापर करून मंदिरांसोबतच मुर्त्या आणि शिल्पदेखिल बनविली जात असत. तेरमध्ये उत्खननात सापडलेली इस १ ल्या अथवा २ ऱ्या शतकातील एक गणेश मुर्ती याच पद्धतीने बनलेली आहे. ही गणेश मुर्ती जगातील सर्वात जुनी गणेश मुर्ती मानली जाते. अशा प्रकारे विटांनी बांधलेली मंदिरे भारतभरात काही ठिकाणी अद्याप आपले अस्तित्व टिकवून आहेत. यांमधिल तीन मंदिरे मराठवाड्यात आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर गावात विटांनी बनलेली तीन मंदिरे अद्याप आपले अस्तित्व टिकवून आहेत.
तेर मधिल त्रीविक्रम हे मंदिर महाराष्ट्रातील सर्वात पुरातन Stand Alone Structure आहे. साधारणतः इस ५ व्या शतकातील हे मंदिर स्थापत्य संशोधकांमध्ये आपल्या विशिष्ट रचनेकरीता प्रसिद्ध आहे. गजपृष्टाकार छत असलेले गर्भगृह आणि सपाट छत असलेले गूढमंडप अशी या मंदिराची रचना आहे. त्रीविक्रम मंदिरातील गर्भगृहामध्ये विष्णूंच्या वामन अवताराची त्रीविक्रम मुर्ती आहे. गजपृष्ठाकार छत असलेले केवळ दोन मंदिरे आज भारतामध्ये अस्तित्वात आहेत. आंध्र प्रदेशमध्ये छेजरला या ठिकाणी याच रचनेचे आणखी एक मंदिर आहे.
त्रीविक्रम मंदिर, तेर
तेरमध्ये असलेले उत्तरेश्वर मंदिरदेखिल अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. आज या मंदिराचे केवळ काही अवशेष शिल्लक आहेत. मूळ मंदिराचे काही अवशेष आणि शिखर बांधकामाचा काही भाग आता अस्तित्वात आहे. इस १९०२-०३ मध्ये काझिन्स या संशोधकाने या मंदिरास भेट दिली होती त्यावेळी पूर्ण मंदिर सुस्थितीमध्ये होते. मात्र पुढील काळात मंदिराचा बराचसा भाग नष्ट झाला. आज विटांनी बनलेले गर्भगृह आणि अंतराळ शिल्ल्क आहे तर दगडी बाह्यमंडपाच्या पायाचे अवशेष दिसून येतात. या मंदिराचे सर्वात विशेष वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराच्या गर्भगृहावर असलेली लाकडी चौकट. या लाकडी द्वारशाखेवर असलेले कोरीवकाम हे भारतातील सर्वात जुने लाकडी कोरीवकाम आहे. सदरील द्वारशाखा सध्या गावातील महाराष्ट्र पुरातत्व खात्याच्या वास्तूसंग्रहालयात जतन करून ठेवण्यात आलेली आहे.
तेर गावात कालेश्वर हेदेखिल एक वैष्णव मंदिर भाजलेल्या विटांनी बनलेले आहे. त्रीविक्रम, उत्तरेश्वर आणि कालेश्वर या मंदिरांच्या काळात भागात इतर देखिल बरीच मंदिरे तयार झाली असावीत. मात्र परकीय आक्रमणे आणि स्थानिकांकडून झालेले दुर्लक्ष यामुळे ही मंदिरे आता केवळ उत्खननांत सापडलेल्या पुराव्यांपुरतेच शिल्ल्क राहिले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील धारूर आणि नांदेड जिल्ह्यातील राणी सावरगाव येथे काही प्रमाणात अशाच विटा सापडून आल्या आहेत. नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे सापडलेल्या एका शिलालेखात राष्ट्रकूट काळातील दहा मंदिरांचा उल्लेख आहे. लातूरच्या इतिहासाबद्दल विमोचन करणाऱ्या रत्नापूर महात्म्य या पुस्तकात देखिल शहरातील २० पेक्षा अधिक मंदिरांचा उल्लेख आढळून येतो. अशाच प्रकारची माहिती आणखी काही ठिकाणी शिलालेखांमध्ये आणि पुराणांमध्ये दिसून येतात.
चालुक्यकालिन मंदिरे
मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये चालुक्य काळात बांधलेली मंदिरे मोठ्य़ा प्रमाणात विखुरलेली आहेत. इस १० व्या व ११ व्या शतकात बांधीव मंदिरांच्या निर्मितीची चळवळ कळसाला पोहोचली होती. राष्ट्रकूट, चालुक्य, होयसळा, कलचुरी, यादव यांनी महाराष्ट्रात आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये बांधीव मंदिरांच्या निर्मितीला भरपूर प्रोत्साहन दिले.
केदारेश्वर मंदिर, धर्मापुरी, जि बीड
नांदेड जिल्ह्यातील होट्टल हे गाव उत्तर चालुक्यांची मंदिर नगरी म्हणून ओळखली जाते. या गावात आणि परिसरात अनेक चालुक्यकालिन मंदिरे आणि त्यांचे अवशेष सापडून येतात. यासोबतच प्रमुख प्राचिन व्यापारी मार्ग आणि नदिखोऱ्यामध्ये बरीच मंदिरे बांधली गेली. अन्वा, जामखेड, बीड, तेर, निलंगा, उमरगा ही मंदिरे व्यापारी मार्गाजवळ आहेत तर राहेगाव, मंजरथ, पानगाव, रामपुरी, धर्मापुरी येथील मंदिरे हे नद्यांच्या आसपास बनलेली आहेत.
चालुक्य काळात बनलेली मंदिरे विटांऐवजी दगडांचा वापर करून बनलेली आहेत. मंदिर बांधणीला शिल्पकलेची साथ मिळाली आणि या दगडांमध्ये अतिशय उत्तम कलाकुसर करून विविध प्रकारची शिल्पे या काळात बनविली गेली. चालुक्यकालिन मंदिरांच्या भिंती आणि खांब हे अशा उत्तम शिल्पांनी सजलेले होते. य़ा काळात मंदिरांमध्ये एकापेक्षा अधिक मंडप देखील बनायला सुरूवात झाली. मंदिरांचा आकार आणि श्रेणी दोन्ही मोठ्या प्रमाणात वाढले. आज या मंदिरातील बरीच शिल्पे चोरी झालेली आहेत अथवा स्थानिकांच्या दुर्लक्षामुळे शेतांत अथवा जमिनीखाली पडून आहेत.
धर्मापुरी येथे दुर्लक्षित चालुक्यकालिन श्शिल्पसंपदा
या काळात शेकडो शिलालेख आणि ताम्रपट मराठवाड्यात विविध भागांत सापडली असल्याने चालुक्य शैलीतील मंदिरांच्या इतिहासाबद्दल ठोस असे पुरावे उपलब्ध आहेत. य़ा शिलालेखांमध्ये मंदिर बांधणा~या राजाच्या नावासोबतच तत्कालिन राजकारण, अर्थकारण आणि सामाजिक परिस्थितीबद्दल देखील विस्तृत माहिती मिळते. या काळात एक गर्भगृहासोबतच दोन अथवा तीन गर्भगृह असलेली मंदिरे देखिल निर्माण होण्यास सुरूवात झाली.
एक गर्भगृह असलेल्या चालुक्यकालिन मंदिरांमध्ये प्रामुख्याने जालना जिल्ह्यातील अन्वा येथील शिव मंदिर, औरंगाबाद जिल्ह्यातील जामखेड येथील खडकेश्वर मंदिर, बीड जिल्ह्यातील धर्मापुरी येथील केदारेश्वर मंदिर, नांदेड जिल्ह्यातील होट्टल येथील सिद्धेश्वर आणि सोमेश्वर मंदिरे, लातूर जिल्ह्यातील पानगाव येथील विठ्ठल मंदिर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा येथील नागनाथ मंदिर, उस्मानाबाद जिल्ह्यातील नारंगवाडी येथील शिव मंदिर आणि परभणी जिल्ह्यातील धारासूर येथील गुप्तेश्वर मंदिर यांचा समावेश आहे.
पुढील काळात या भागात त्रिदल पद्धतिची चालुक्य शैलीची अप्रतिम मंदिरे निर्माण झाली. या मंदिरांमध्ये समान बाह्यमंडपास जोडली गेलेली तीन गर्भगृहे असत. या तीम गर्भगृहांपैकी एकामध्ये शैव, एकामध्ये वैष्णव आणि एका गर्भगृहात शक्तीची मुर्ती प्रस्थापित केल्या गेल्या. यांपैकी ब~याच मुर्त्या कालांतराने चोरी झाल्या अथवा खंडीत झाल्या. मात्र काही ठिकाणी या मुर्त्या अद्याप पाहता येतात. या त्रिदल मंदिरांमध्ये प्रामुख्याने लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील निळकंठेश्वर मंदिर, बीड मधील कंकाळेश्वर मंदिर, धाराशिव जिल्ह्यातील उमरगा येथील शिवमंदिर, धाराशिव जिल्ह्यातील माणकेश्वर येथील महादेव मंदिर, नांदेड जिल्ह्यातील होत्तळ येथील शिवमंदिर, संभाजीनगर जिल्ह्यातील अंभई वडगाव येथील वडेश्वर मंदिर, बीड जिल्ह्यातील केशवपुरी येथील केशवमंदिर यांचा उल्लेख करावा लागेल.
यादव कालिन मंदिरे
चालुक्यांनंतर राज्य करणा~या यादव राजांनीदेखिल अनेक उत्तम मंदिरांची निर्मिती या भागात केली. मात्र यादव काळातील मंदिरे पुर्वीच्या चालुक्य काळातील मंदिरांप्रमाणे भव्य दिव्य स्वरूपाची नव्हती. यादवकालिन मंदिरे हे आकाराने लहान व एक गर्भगृह आणि एक मंडप असणारी होती. या मंदिरांमध्ये भिंती आणि खांब यांच्यावर कोरीवकाम अथवा मुर्तीकला फ़ारशी दिसून येत नाही. मात्र गर्भगृहामध्ये आणि अंतर्गत भागात काही प्रमाणात शिल्पकला दिसून येते. १३ व्या शतकाच्या अखेरपर्यंत मंदिर स्थापत्यातील सौंदर्य कमी होत गेले व त्यामध्ये एक प्रकारचा एकसुरीपणा आला. १४ व्या शतकामध्ये बांधण्यात आलेली मंदिरे मोठमोठे पाषाण वापरून बांधलेली होती. अंतर्गत व बाह्य सजावट नसलेली ही मंदिरे घाईघाईमध्ये बांधल्यासारखी वाटतात. यादव कालिन मंदिरे अथवा त्यांचे अवशेष या भागातील बहुतांश गावांमध्ये दिसून येतात. यादव कालिन मंदिरांमध्ये विशेष उल्लेख करण्याजोगी मंदिरे म्हणून बीड जिह्ल्यातील अंबेजोगाई येथील अमलेश्वर, खोलेश्वर आणि सकलेश्वर ही मंदिरे, नांदेड जिल्ह्यातील राहेर येथील नृसिंह मंदिर, बीड जिल्ह्यातील येळूंब येथील शिवमंदिर, जालना जिल्ह्यातील चारठाणा येथील नृसिंह मंदिर, बीड जिल्ह्यातील पाली येथील नागनाथ मंदिर या मंदिरांचा उल्लेख करता येईल. या सोबतच परभणी जिल्ह्यातील वाडेश्वर, भूगाव, भोसी, केसापुरी, मुदगल, अरणी, नेर, गंगाखेड; संभाजीनगर जिल्ह्यातील सावखेड, देवगिरी, सेवूर, सोनखेड, नागापूर, पिशोरे, हट्टी, केडगाव, अंभाई, भोकरदन; नांदेड जिल्ह्यातील राहेगाव, येताळा, जुन्नी, हदगाव, कंधार; बीड जिल्ह्यातील पाटोदा, मणूर, सिसर, पिंपळवाडी, धर्मापुरी, घाटनांदूर, हिवरसिंगा, युसुफ़वडगाव, कळसांबेर; उस्मानाबाद जिल्ह्यातील सोनारी, वाडगांव, कवठा, जागजी; लातूर जिल्ह्यातील लातूर, मुरूड, गणेशवाडी या ठिकाणीदेखील यादवकालिन मंदिरे काही प्रमाणात तग धरून आहेत.
मदज, जि धाराशिव येथील एक यादवकालिन मंदिर
मराठवाड्यातील मंदिरांमध्ये विविध विष्णू अवतार, गौरी-महेश, यक्ष व यक्षी, शालभंजिका, अप्सरा, पत्रलेखा, सूर्यमुर्ती, मातृका, गणेश, विरभद्र, मिथुन शिल्प, घटपल्लव, कलश, किर्तीमुख, रामायण व महाभारतातील विविध प्रसंग, ब्रम्हा इ. शिल्पे व मुर्त्या कोरलेल्या दिसून येतात.
जाता जाता एक माहिती हेमाडपंती मंदिरांविषयी. मराठवाड्यातील कित्येक पुरातन मंदिरांना हेमाडपंती मंदिर या नावाने संभोधले जाते. यादव राजा रामचंद्र यांच्या दरबारी प्रधान असलेल्या हेमाद्रिपंत याला या सर्व मंदिरांचे श्रेय दिले जाते. मात्र यातील खूप कमी मंदिरे त्यांच्या काळात बांधली गेली आहेत. योग्य माहितीच्या अभावामुळे व लोककथांच्या प्रभावामुळे आपण सरसकट सर्वच मंदिरांचे श्रेय त्यांना देतो. याचप्रकारे लोककथांच्या आधारावर उत्तर गुजरातमध्ये मंदिरांचे श्रेय सिद्धराज यांना, कानडी प्रांतातील मंदिरांचे श्रेय जक्कणाचार्य यांना आणि खानदेशातील मंदिरांचे श्रेय गवळीराजे यांना दिले जाते.
[…] […]