सह्याद्रीतील गडेकोटांना भेट देताना गडाच्या प्रवेशद्वाराच्या जवळपास हमखास या हनुमानमुर्तीचे दर्शन होतेच. आजच्या लेखात आपण या मुर्तीबद्दल काही माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करूयात.
तिकोना किल्ल्यावरील हनुमान मुर्ती. छायाचित्र : राहुल टकले (flickr)
हनुमान हे रामायणातील अतिशय महत्वपूर्ण व्यक्तिमत्व. प्रभू श्री रामांची मोठमोठी कामे अगदी सहज पार पाडणारे हनुमान. रामांचा संदेश घेऊन लंकेला जाणारे अणि संपूर्ण लंकेला आग लावून येणारे हनुमान. द्रोणागिरी पर्वत उचलून आणून लक्ष्मणाचे प्राण वाचविणारे हनुमान. सुग्रीवला त्याचे राज्य पुन्हा मिळवून देणारे हनुमान. या जगाला सूर्यनमस्कार आणि मल्लखांबची भेट देणारे हनुमान. संपूर्ण जगावर राज्य करण्याइतकी बुद्धि आणि शक्ति असूनदेखिल रामाजे विश्वासपात्र सहकारी बनून राहणारे हनुमान.
रामायण भारतात किमान २००० वर्षांपासून सांगितले जाते. मात्र हनुमानांची एक देवता म्हणून पूजा मात्र मागील काही शतकांपासून सुरू झालेली आहे. त्यापुर्वी देखिल हनुमानांच्या मुर्त्या काही ठिकाणी सापडून येतात. इस ५ व्या शतकात गुप्त काळातील काही मंदिरांमध्ये हनुमानांची शिल्पे दिसून येतात. मात्र हनुमानांची विशेष रूपाने पूजा सुरू झाली भक्ती संप्रदायाच्या काळात. याच काळात हनुमानांना समर्पित काही संप्रदायदेखिल निर्माण झाले. हा काळ भारतीय उपखंडात इस्लामिक शक्तींच्या आक्रमणाचा काळ होता. याच काळात महाराष्ट्रात समर्थ रामदास यांनी हनुमानभक्तीची सुरूवात केली. जसे हनुमान हे शक्तीशाली असूनही रामांचे सहकारी म्हणून कार्य करीत राहिले, त्याचप्रमाणे सर्व मावळ्यांनी आपली एकनिष्ठ भक्ती छ्त्रपती शिवरायांसोबत असावी हा सुप्त संदेश कदाचित गडांवर हनुमानाची मुर्ती कोरण्यामध्ये असावा.
महाराष्ट्रातील गडकोटांवर हनुमानांच्या मुर्त्या या काळात स्थापन करण्यात आल्या असाव्यात असा अंदाज आहे. त्यापुर्वी विजयनगर साम्राज्यामध्ये हनुमानांची पुजा मोठ्या प्रमाणात सुरू झालेली होती. त्या प्रभावामुळे विजयनगर शैलीतील मुर्त्या महाराष्ट्रातील गडांवर सुद्धा दिसून येतात. एक पाय वर उचललेला, एक हात कमरेवर आणि एक हात हवेत उगारलेला या स्वरूपात ही मुर्ती दिसून येते. याला तमाचा हनुमान असे म्हटले जाते. या तमाचा हनुमान रूपाच्या मागे एक गमतीशिर कथा आहे.
वासोटा किल्ल्यावरील हनुमान आणि गणपतीचे शिल्प . छायाचित्र सागर
सुग्रीव हे सूर्यदेवाचे पुत्र तर वाली हे देवराज इंद्राचे. लोककथांनुसार राजे रीक्ष हे एका मायावी तळ्यामध्ये पडले होते. तळ्यातून बाहेर आले तेव्हा मायावी पाण्याच्या जादूमुळे ते स्त्रीमध्ये रुपांतरीत झाले होते. सूर्यदेव व इंद्रदेव हे दोघेही या महिला रूपाच्या प्रेमात पडले. इंद्रदेवांकडून अति शक्तिशाली वाली हा पुत्र झाला तर सूर्यदेवाकडून दुर्बल व सौम्यस्वभावाचा सुग्रीव हा पुत्र झाला. रिक्षांनी मृत्यूच्या वेळी आपले राज्य दोन्ही पुत्रांना समप्रमाणात वाटून गेले.
सुग्रीव व वाली मध्ये सर्व काही सुरळीत असताना एका राक्षसाने किष्किंधावर हल्ला केला. त्या राक्षसाला मारण्यासाठी वाली त्याच्या गुहेमध्ये शिरला व सुग्रीवास गुहेच्या बाहेर थांबण्यास सांगण्यात आले होते. बराच काळ वाली गुहेतून बाहेर न आल्याने सुग्रीवला वाटले की वाली मारला गेला असावा. तो गुहेचे तोंड दगडांनी बंद करून निघून आला व त्याने वालीच्या हिस्स्यातील प्रदेशावर राज्य करण्यास सुरुवात केली.
बर्याच महिन्यांनी वाली पुन्हा राज्यात आला व त्याने पाहिले की सुग्रीव संपूर्ण राज्यावर राज्य करीत आहे. झालेला गैरसमज दूर करण्याऐवजी वालीने बळाचा वापर करून सुग्रीवला राज्याबाहेर हाकलून संपूर्ण राज्यावर पुन्हा सत्ता प्रस्थापित केली.
धर्म व अधर्म या दोघांच्यामध्ये असणाऱ्या या किष्किंधा प्रदेशात प्रामाणिकता व न्याय हे उत्स्फूर्त नसते तर कायद्याद्वारे व बळाद्वारे जबरदस्ती अंमलबजावणी करावी लागते. आणि या घटनेमध्ये हे स्पष्टपणे दिसून येते. वालीला सुग्रीवने घेतलेला हा निर्णय हा कपट व महत्त्वाकांक्षेने घेतलेला निर्णय वाटला. सुग्रीवचा हा निर्णय वालीसाठी अन्यायकारक होता. मात्र वालीने हा अन्याय दूर करण्यासाठी संभाषणाऐवजी बळाचा वापर केला. सुग्रीवला राज्यातून बाहेर काढताना त्याने सुग्रीवाची पत्नी रूमा हिलादेखील स्वतः ठेवून घेतले. एका प्रकारे वागणूक ही अल्फा नराप्रमाणेच होती.
वालीने सुग्रीवला राज्यातून दूर करताना जर हनुमानाने मध्यस्थी केली नसती, तर कदाचित सुग्रीव वालीच्या हाताने मारला गेला असता. सुग्रीव चे पिता असलेले सूर्य हे हनुमानाचे गुरू होते. हनुमानांनी सुर्यदेवांना सुग्रीवचा नेहमी बचाव करण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनासाठी ते सदैव सुग्रीवच्यासोबत होते. सुग्रीवला वाली पासून वाचविण्यासाठी हनुमानांनी त्यांना ऋषीमुक नावाच्या पर्वतावर आश्रय घ्यायला लावला. वालिला मिळालेला एका श्रापामुळे ते या पहाडावर पाय ठेवू शकत नव्हते. त्यामुळे तेथे सुग्रीव सुरक्षित होते.
काही लोककथांनुसार सुग्रीव राज्य सोडून ऋषीमुक पर्वतावर जाऊन राहू लागल्यानंतर देखील वालीचा राग शांत झाला नाही. तो सुग्रीवला त्रास देण्याचे नवनवीन उपाय शोधत होता. ऋषीमुक पर्वतावर जाणे वालीला शक्य नसले, तरी तो आपल्या शक्तीने उंच उडी घेई व सुग्रीवच्या डोक्यावर मारून परत येई. चार पाच वेळा असे झाल्यानंतर एकदा हनुमानाने स्वतः परिस्थितीचा ताबा घेण्याचे ठरविले. वाली ने उडी मारल्यानंतर हनुमानाने त्याचा पाय पकडला व त्याला ओढून पर्वतावर उतरवण्याची धमकी दिली. वालीला मिळालेल्या शापामुळे, जर त्याचा पाय ऋषीमुक पर्वतावर पडला असता, तर तो लगेच राख झाला असता. वालीने माफी मागितल्यावर हनुमानांनी त्याला सोडून दिले. मात्र सोडण्याआधी एक चापट मारून त्यांनी वालीला आपल्या शक्तीची जाणीव करून दिली. हनुमानांनी चापट मारण्यासाठी उगारलेल्या हाताचे प्रतिक म्हणून भारतात बऱ्याच भागात एक हात उगारलेली अशी तमाचा हनुमानाची मूर्ती आढळून येते. ही मूर्ती म्हणजे हनुमानांनी वालीला मारलेल्या चापटीपेक्षा अधिक सुग्रीवच्या मदतीसाठी आणि संरक्षणासाठी सदैव तत्पर असणार्या संकटमोचनाचे प्रतीक आहे.
या ठिकाणी हनुमान वालीला मारू शकले असते अथवा त्यांना शिक्षा देऊ शकले असते. मात्र वाली सोबत त्यांचे वैयक्तिक शत्रुत्व नसल्याने त्यांनी केवळ त्याला समज देऊन सोडून दिले. वाली-सुग्रीव मधील भांडणांमध्ये प्रत्यक्ष सहभाग न नोंदविता केवळ सुग्रीव चे रक्षण करण्याची भूमिका त्यांनी नेहमीच पार पाडली आहे.
या मुर्तींमध्ये हनुमानांच्या पायाखाली एक मानवी आकृती दिसून येते. हा मानव कलानेमी या नावाने ओळखला जातो. कलानेमीचे हनुमानांसोबत झालेले युद्ध आणि त्यानंतर हनुमानांनी कलानेमीला कसे पायाखाली पकडले होते याची एक कथा अहे.
रामायणातील सर्वात महत्त्वपूर्ण प्रसंगांपैकी एक आहे लक्ष्मणासाठी हनुमानांनी संजिवनी आनली होत तो प्रसंग. रावणासोबतच्या युद्धात जेव्हा रावणाचा मुलगा मेघनाद याने लक्ष्मणाला सापांचे विष असलेला एक बाण मारला होता, तेव्हा त्या बाणाच्या विषाने लक्ष्मण बेशुद्ध झाले होते. वैद्यांनी रामांना सांगितले की हिमालयामध्ये द्रोणागिरी नावाच्या पहाडावर संजीवनी चे झाड आहे. त्या झाडाच्या मुळांनीच हे विष उतरू शकते. सूर्योदयाच्या आधी हे औषध लक्ष्मणाला दिले गेले तरच लक्ष्मणाचे प्राण वाचू शकतात. पण सूर्योदयाच्या आधी हिमालयातून हे औषधी मूळ कोण आणू शकणार आहे? फक्त हनुमानच.
हनुमानांची रवानगी या महत्त्वपूर्ण कार्यासाठी करण्यात आली. हनुमानांनी आकाशात उडी घेतली आणि रावणाने त्यांना पाहिले. रावण स्वतः आयुर्वेद तज्ञ असल्याने त्याला माहीत होते की लक्ष्मणाला संजीवनीची गरज आहे व हनुमान नक्की संजीवनी आणण्यासाठीच जात असावा. रावणाने कलानेमी या जादूगाराला बोलाविले व त्याला आदेश दिला की हनुमानांना संजीवनी मिळू नये यासाठी अडथळे तयार करावे. कलानेमी आपल्या जादुने हनुमानांआधी द्रोणागिरी वर पोहोचतो आणि एका साधूच्या रूपात बसतो. हनुमान तेथे पोहोचल्यानंतर साधूच्या रूपातील कलानेमी त्यांना जेवणासाठी आग्रह करतो. साधूचा आग्रह टाळणे योग्य असणार नाही यासाठी हनुमान तयार होतात. मात्र आधी हात धुण्यासाठी पाणी मागतात. तेव्हा कलानेमी त्यांना जवळच्या तळ्याकडे जायला सांगतात. या तळ्यामध्ये खुप मगरी असतात. यापैकी एक मगर हनुमानां वर हल्ला करते. हनुमान त्या मगरीला मारून टाकतात तेव्हा एक अप्सरा तिथे अवतरते. ती हनुमानांना सांगते “इंद्राच्या शापामुळे मी मगर बनले होते. आज आपण माझा उद्धार केला म्हणून आपणास एक सत्य सांगते.” त्या अप्सरे कडुन कलानेमी बद्दल सत्य माहीत झाल्यावर हनुमान कलानेमीला मारून टाकतात.
मात्र या सगळ्या प्रकरणात बराच वेळ खर्च झालेला असतो. अर्धी रात्र उलटून गेलेली असते. आता संजीवनी शोधण्यात खूप वेळ खर्च होईल हा विचार करून हनुमान पूर्ण पहाड उचलून लंकेकडे रवाना होतात. ही उडी घेताना ते कलानेमीच्या मृत शरिराचा आधार अधिक उंच उडी घेण्यासाठी करतात. हनुमान पहाड घेऊन लंकेच्या अगदी जवळ पोहोचतात तेव्हा त्यांना दिसते की सूर्योदय अवघ्या काही क्षणात होणार आहे. हनुमान आपल्या गुरूंना म्हणजे सुर्यदेवांना विनंती करतात आणि सूर्योदय काही क्षण उशिरा करवितात. त्यामुळे ते सूर्योदयाच्या आधी औषध घेऊन पोहोचु शकतात आणि लक्ष्मणाचे प्राण वाचवू शकतात.
कलानेमीला पायाखाली ठेवून व हातात द्रोणागिरी पर्वत घेऊन हवेत उडणाऱ्या रूपात हनुमानांचे पूजन खूप ठिकाणी केले जाते. रामायण, महाभारत व इतर पुरातन साहित्य हे प्रतीकांनी भरलेले आहे. या ठिकाणीदेखील सर्व प्रतीकात्मक आहे. कलानेमी हे आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडथळ्यांचे प्रतीक आहे तर संजीवनी हे आपल्या आयुष्यातील अडचणींवरील उपायांचे प्रतीक आहे. हनुमान हे आपल्या आयुष्यातील अडथळ्यांना पायाखाली ठेवून अडचणींवरील उपाय आपल्या पर्यंत पोहोचवणारे देव आहेत.
विसापूर किल्ल्यावरील हनुमान मुर्ती, छायाचित्र सौजन्य : Trek in Sahyadri