अंजनी माता मंदिर, अंजनेरी. छायाचित्र सौजन्य : IndiaHikes
रामायण आणि नाशिक
रामायण भारतिय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळे रामायणातील प्रत्येक व्यक्ती आपल्या रोजच्या आयुष्यात या ना त्या प्रकारे स्वतःला किंवा स्वत:च्या गावाला रामायणासोबत जोडण्याचा प्रयत्न करतात. कित्येक गाव आणि शहरांची नावे हे राम, सिता, हनुमान, लक्ष्मण, भरत यांच्या नावाने ठेवलेले असतात. खूप गावांमधिल पुरातन मंदिरांचा संबंध रामांसोबत जोडला जातो. वनवासामध्ये राम येथे आले होते आणि त्यांनी हे मंदिर वसविले अश्या आख्यायिका खूप मंदिरांबद्दल ऐकण्यात येतात. डोंगरांमध्ये नैसर्गिक अथवाश मानवनिर्मित छोट्या गुहा असल्यास त्याला सितेसोबत जोडले जाते. या गुहांमध्ये पाण्याचा झरा असेल तर त्याला सितेची न्हाणी म्हणून नामकरण केलेले दिसून येते. अशामध्ये जर एखाद्या स्थानाबद्दल प्रत्यक्ष रामायणातच उल्लेख असेल तर मग त्या स्थानाचे महत्व इतरांपेक्षा नक्कीच्च अधिक असणार..
महाराष्ट्रातील नाशिक शहर हे असेच एक स्थान. रामायणात पंचवटी असा नाशिकचा उल्लेख आहे. १४ वर्षांच्या वनवासामधिल पहिले १० वर्ष संपल्यानंतर राम, लक्ष्मण आणि सिता दक्षिणेकडे आले आणि गोदावरी काठावर पंचवटी येथे अडीच वर्षे वास्तव्य केले. याच ठिकाणी लक्ष्मणाने सितेचे नाक कापले, आणि त्यामुळे या गावास नाशिक (संस्कृतमध्ये नासिका म्हणजे नाक) असे नाव पडले अशीही आख्यायिका आहे. येथून सितेच्या झालेल्या अपहरणानंतर त्यांनी ही जागा सोडली व सितेच्या शोधात निघून गेले अशी कथा आहे.
अंजनेरी किल्ला आणि महत्व
नाशिक आणि रामायण यांच्यामधिल या संबंधामुळेच नाशिक शहराचे सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व खूप वाढलेले आहे. याच नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर पासून सात किलोमिटर अंतरावर अंजनेरी हा किल्ला आहे. या किल्ल्यावर अंजनीचे मंदिर आहे आणि किल्ल्याच्या पायथ्याशी हनुमानांचे मंदिर आहे. स्थानिक मान्यतेनुसार या डोंगरावर हनुमानांचा जन्म झाला. जेव्हा वनवासाच्या काळात राम दंडकारण्यात आले तेव्हा हनुमानांनी रामांना पाहिले व तेथून पुढे ते रामांच्या सोबत होते.
अंजनेरीचा इतिहास शोधायला गेल्यास १२ व्या शतकापर्यंत जाता येईल. त्त्यापुर्वीच्या काळातील काही ताम्रपत्र येथे सापडले आहेत. मात्र त्यामध्ये या गावाचा किंवा डोंगररांगांचा उल्लेख नाही आहे. अंजनेरीचा पहिला उल्लेख गावातील एका शिलालेखात सापडतो. या शिलालेखानुसार सौनदेव नावाच्या राजाने येथील एका जैन मंदिरास दान दिल्याचा उल्लेख आहे. हा सौनदेव राजा यादव वंशातील एक राजा आहे. यावरून सदरचा प्रदेश यादवांच्या अधिपत्याखाली होता हे लक्षात येते. इस १८५१ साली जॉन विल्सन यांनी येथील पुरातत्विय अवशेषांची सर्व प्रथम नोंदणी केली होती. यामध्ये त्यांनी अंजनेरी किल्याच्या पायथ्याशी सापडलेल्या लेणी आणि मंदिरांचे अवशेष; आणि यामध्ये सापडलेल्या बुद्ध, गणेश, शिवलिंग मुर्त्यांचा उल्लेख आहे. हेन्री कसिन्स यांनी या ठिकाणि १६ मंदिरे आणि इतर कित्येक मंदिरांचे अवशेष यांचा उल्लेख केलेला आहे. त्यांच्या लिखाणात अंजनेरी किल्याच्या माथ्यावर अंजनी (हनुमानांची आई) यांचे एक मंदिर असल्याचा उल्लेख सापडतो.
या किल्याच्या पायथ्याशी एक तलाव आहे. ज्याच्या आकार माणसाच्या पावलासारखा आहे. स्थानिक मान्यतेनुसार हा तलाव हनुमानांच्या पायाने तयार झालेला आहे. हनुमानांचे वडील केसरी हे वानरराज सुग्रीव यांच्या सेवेत कार्य करीत असत व त्यांच्या आदेशानुसार विविध लढायांवर जात असत. अशा वेळी त्यांची पत्नी आणि हनुमानांची आई अंजनी हनुमानांची देखरेख करीत असे. एके दिवशी हनुमान सकाळी झोपेतून उठले तेव्हा त्यांना खूप भूक लागलेली होती. अन्नाच्या शोधात ते झाडावर चढले. झाडावरची फळे खात असताना त्यांची नजर पूर्वेकडे उगवणाऱ्या सूर्याकडे गेली. हनुमानांच्या बालसुलभ नजरेला तो उगवता सूर्य एका मोठ्या गोड फळासारखा वाटला व त्यांनी त्या फळाला खाण्यासाठी हवेत उंच उडी घेतली. हवेत उंच उडी घेण्यासाठी जेव्हा त्यांनी जमिनीवर आपला पाय जोरात टेकवला होता, तेव्हा त्यांच्या पायाच्या बलाने एक मोठा खड्डा तयार झाला, आणि तोच हा तलाव आहे अशी मान्यता आहे.
हनुमानांचे जन्मस्थान मानली जाणारी इतर ठिकाणे
तुलसिदासांच्या हनुमान चालिसेत “अंतकाल रघुवरपुर जाई, जहाँ जन्म हरिभक्त कहाई॥ ” असा उल्लेख आहे. या ठिकाणी रघुवरपुर असा अयोध्येचा उल्लेख केलेला आहे. रघुकुलातील विराचे शहर असा याचा अर्थ आहे. राम हे रघुकुलात जन्मलेले राजे होते. त्यामुळे त्यांना रघुवीर, रघुपती, राघव या नावांनीदेखील ओळखले जाते. त्याचमुळे अयोध्येचा उल्लेख रघुवरपुर असा आहे. तुलसीदासांच्या म्हणण्यानुसार याच अयोध्येत हरीभक्त अर्थात हनुमानांचा जन्म झाला होता. याठिकाणी रामांना हरी या नावाने संबोधले गेले आहे. यजुर्वेदातील नारायण सुक्तामध्ये नारायणाचे अर्थात सर्वोच्च व परिपूर्ण देवाचे एक नाव हरी हे आहे. हरी या शब्दाचा अर्थ सर्व दु:खाचे आणि समस्यांचे हरण करणारा असा आहे. या नारायणाचा अथवा हरीचा संबंध पुढे पौराणिक काळामध्ये विष्णूंसोबत जोडला गेला. रामांना हरी या नावाने संबोधून तुलसीदास राम हेच सर्वोच्च आणि परीपूर्ण देवता असल्याचे सागत आहेत.
या ठिकाणी हरीभक्त अर्थात हनुमानांचे जन्मस्थान रघुवीरपूर अर्थात अयोध्या असल्याचे मानले गेले आहे. अयोध्या शहरात असलेल्या हनुमानगढी या दहाव्या शतकातील मंदिरास हनुमानांचे जन्मस्थान मानले गेले आहे. या ठिकाणी मांडीवर हनुमानांना घेऊन बसलेल्या अंजनीची मुर्ती आहे. या आधारावर हे ठिकाण हनुमानांचे जन्मस्थान आणि हनुमानांचा बालपणाचा काळ ज्याठिकाणी गेला ते ठिकाण असल्याचे म्हटले गेले आहे. रामांच्या बालपणापासूनच हनुमान हे रामांच्या जवळपास होते आणि सदैव त्यांच्या आयुष्यावर लक्ष ठेवून होते असे म्हटले जाते.
झारखंड मध्ये गुमला जिल्ह्यात अंजन या गावात एक गुहा आणि मंदीर आहे. या गुहेमध्ये ३६० शिवलिंग आहेत. असे म्हणतात की या ठिकाणी अंजनीने एक वर्ष महादेवांची आराधना केली होती. या आराधनेनंतर महादेवांनी हनुमानांच्या रूपात अवतार घेतला होता. या ठिकाणीदेखील मांडीवर हनुमानांना घेऊन बसलेल्या अंजनीची मुर्ती आहे. याच गावात शबरीचा आश्रम होता अशी मान्यता आहे. राम, लक्ष्मण व सिता वनवासासाठी जाताना शबरीच्या आश्रमात आले होते. त्यावेळी याच ठिकाणी हनुमानांनी रामांना पाहिले व तेथून ते रामांच्या मागे मागे गेले असे म्हटले जाते.
कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यात तुंगभद्रा नदिच्या काठावर आज हंपी नावाने ओळखले जाणारे पुर्वीचे विजयनगर शहर आहे. येथून जवळच अंजनयाद्री नावाच्या पहाडावर हनुमानांचे एक प्राचिन मंदिर आहे. या ठिकाणी हनुमानांचा जन्म झाला अशीही मान्यता आहे. वाल्मीकि रामायणात आणि रामचरीतमानसमध्ये उल्लेख केलेले किष्किंधा वन हे याच ठिकाणी होते असे मानले जाते. या ठिकाणी असलेले घनदाट वन, असंख्य लहान मोठी मंदिरे, भौगोलिक परीस्थिती या सर्वांचा अभ्यास केल्यास या मान्यतेला बळ मिळते. जेव्हा जटायुच्या सांगण्यावरून राम सितेला शोधण्यासाठी दक्षिणेकडे निघाले त्यावेळी ते या किष्किंधा प्रदेशात आले. या ठिकाणी त्यांची भेट हनुमानांसोबत झाली अशी मान्यता आहे.
गुजरातच्या दांग जिल्ह्यातील अंजना नावाच्या पर्वतरांगांमध्ये एक गुहा आहे. या गुहेला अंजनी गुहा या नावानेच ओळखले जाते. हे ठिकाण देखील स्थानिक मान्यतांनुसार हनुमानांचे जन्मस्थान असल्याचे म्हटले जाते.
हरीयाणाच्या कैथल शहरालादेखील स्थानिक मान्यतांमध्ये हनुमानांचे जन्मस्थान मानले गेले आहे. या गावाचे पौराणिक नाव कपिस्थल होते असे मानले जाते. कपिस्थल याचा अर्थ माकडांचे स्थान. हनुमानांचे पिता केसरी यांना कपिराज असेदेखिल म्हटले जाते. हनुमान चालिसेमध्ये देखील हनुमानांचा उल्लेख एका ठिकाणी कपीश असा आलेला आहे. याचाच आधार घेऊन कैथल शहराला हनुमानांचे जन्मस्थान म्हटले जाते.
राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील सुजानगड हे देखील हनुमानांचे जन्मस्थान मानले जाते. सुजानगड पासून डुंगरगड रस्त्यावर श्री डुंगर बालाजी नावाचे मंदिर आहे. (राजस्थानमध्ये हनुमानांना बालाजी नावाने ओळखले जाते.) या ठिकाणी हनुमानांचा जन्म झाल्याची मान्यता स्थानिकांमध्ये आहे.
ओडिशामध्ये खुर्दा शहरापासून जवळ असलेल्या जरीपूत गावात एक गुहा आणि हनुमान मंदिर आहे. हा प्रदेश पुर्वी बालीचे राज्य होते आणि या ठिकाणी बालीने एका असूराला मारले होते असे म्हटले जाते. त्यामुळे येथे असलेल्या संकट मोचन हनुमान मंदिराला स्थानिक मान्यतांमध्ये हनुमानांचे जन्मथान मानले जाते.
आंध्र प्रदेशच्या तिरूपती तिरुमला येथे असलेल्या सप्तगिरी अर्थात सात पहाडांपैकी एक असलेल्या अंजनाद्री या पहाडाला देखील स्थानिक मान्यतांनुसार हनुमानांचे जन्मस्थान मानले गेले आहे.
वास्तविक हनुमानांचा जन्म कोठे झाला याचा कोणताही ठोस पुरावा नाही. मात्र जन्म कोठेही झाला असला तरी त्यांची भक्ती आणि भक्त संपूर्ण भारतामध्ये आणि भारताबाहेर देखील मोठ्या प्रमाणात आहेत. हनुमानांच्या आयुष्यातून मिळणारी प्रेरणा आणि त्यांचे आपल्या आयुष्यातील वास्तव्य हे त्यांच्या जन्मस्थानावर नक्कीच अवलंबून नाही.
[…] जवळच अंजनेरी या ठिकाणी हनुमानांचा जन्म झाला असल्याची मान्यता आहे. अंजनेरी […]