Ajanta Caves : Photo by Dr Dinesh Soni
भारतातील मंदिर वास्तुकलेची उत्क्रांती जर अभ्यासायची असेल तर आपल्याला जवळपास २४ शतके मागे जावे लागेल. हा तो काळ होता जेव्हा मौर्य उत्तरेत राज्य करत होते आणि चोल आणि पांड्य दक्षिण भारतावर राज्य करत होते. या कालखंडापूर्वी, देवाची उपासना मुख्यतः यज्ञ आणि बलिदान या विधींद्वारे होत असे. अशा प्रकारच्या विधींना कायमस्वरूपी बांधकामाची अथवा संरचनेची आवश्यकता नसत असे; आणि ते बऱ्याचदा तात्पुरत्या झोपड्यांमध्ये किंवा मोकळ्या जागेत बांधलेल्या आश्रयस्थानांमध्ये होत असे. यज्ञाचा हा विधी आजही आपल्या पहायला मिळतो. विशेषत: लग्न, गृहप्रवेश, नवीन व्यवसायांचे उद्घाटन इत्यादी शुभ समारंभांमध्ये यज्ञ हा एक अविभाज्य भाग आहे.
ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकानंतरचा काळ हा आहे जेव्हा उपासना विधी यज्ञ आणि निसर्ग शक्तींच्या उपासनेपासून प्रार्थनागृहातील प्रार्थनेकडे वळले. पुर्वीचे यज्ञ आणि बलिदान विधी हे मोकळ्या जागेत उभारलेल्या तात्पुरत्या निवा~यामध्ये सहजपणे होत असत. मात्र प्रार्थना करण्यासाठी एखादा प्रार्थना हॉल बांधणे आवश्यक होते. याकरीता नैसर्गिकरीत्या बनवलेल्या, किंवा काहीवेळा कृत्रिमरीत्या बनवलेल्या लेण्यांनी त्यासाठी चांगला पर्याय उपलब्ध करून दिला. हा तो काळ होता जेव्हा रॉक कट आर्किटेक्चरला भारतात लोकप्रियता मिळाली.
रॉक कट आर्किटेक्चर म्हणजे दगडाला फोडून अथवा खोदून एखादे बांधकाम निर्माण करण्याची शैली आहे. साहजिकच या शैलीचे स्मारक बनविणे अतिशय कष्टाने भरलेली आणि वेळ घेणारी प्रक्रिया आहे. साहजिकच राजकिय सहकार्य आणि संरक्षणाशिवाय हे कार्य शक्य नाही. बिहार आणि ओडिशा मध्ये सुरू झालेकी ही प्रक्रिया सातवाहन राजांच्या संरक्षणामध्ये महाराष्ट्रामध्ये भरभराटीस आली.
इस पूर्व दुस~या शतकात मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर बरेच बौद्ध दक्षिणेकडे स्थलांतरित झाले. त्यांच्यासोबत गुहांमध्ये स्मारके निर्माण करणारे कलाकारदेखिल स्थलांतरित झाले. यांना दक्षिणेकडील सातवाहन अथवा आंध्र साम्राज्याने राजकीय संरक्षण पुरविले, आणि यातूनच निर्मीती झाली अतिशय सुंदर अशा लेण्यांची. सह्याद्री पर्वतरांगामधिल कठीण दगड हे या अशा लेण्यांच्या निर्मितीसाठी अतिशय उपयुक्त ठरले. लेण्यांच्या निर्मितीचा हा इतिहास आपण ३ टप्प्यांमध्ये समजू शकतो.
Bhaje Caves : Photo by Dr Dinesh Soni
पहिला टप्पा हा इस पूर्व २रे शतक ते ४थे शतक या कालखंडातील आहे. या काळात मुंबईमधिल कान्हेरी; लोणावळा परिसरातील भाजे, बेडसे आणि कार्ला ; संभाजीनगर जवळ पितळखोरा आणि अजंटा ; नाशिक जवळील पांडवलेण्या आणि जुन्नर भागातील तुळजाई आणि शिवनेरी या लेण्यांची निर्मिती करण्यात आली. या लेण्यांमध्ये चैत्य आणि विहार हे लेण्यांचे मुख्य भाग होते. चैत्य हे प्रार्थनागृह स्वरूपात आणि विहार हे राहण्यासाठी खोल्यांच्या स्वरूपात वापरले जात असे. या चैत्यांसाठी हस्तिपृष्ठ (apsidal) शैलीचा वापर केला गेला. या सर्वच चैत्यांमध्ये छतासाठी लाकडी बांधकाम केले गेले. यातील खूप ठिकाणी आता हे लाकडी कार्य उपलब्ध नाही आहे, मात्र त्याचे पुरावे काही स्वरूपात दिसून येतात. विहार हे शक्यतो चौरस अथवा आयताकृती स्वरूपात बनविले गेले. प्रत्येक विहारामध्ये झोपण्यासाठीची जागा दगडांमध्येच तळापासून थोडेसे उंचीवर बनविली गेली.
इस २ ~या शतकानंतर काही काळासाठी लेण्यांची निर्मीती कमी झाली होती. मात्र पुढील वाकाटक आणि राष्ट्रकुट साम्राज्याच्या अधिपत्याखाली पुन्हा एकदा लेण्यांची निर्मिती केली जाऊ लागली. या कालखंडात बौद्ध धर्मासोबतच हिंदू आणि जैन धर्मांचा देखिल प्रसार मोठ्या प्रमाणात सुरू झालेला होता. याचा प्रभाव लेण्यांमधिल शिल्पांमध्ये देखिल दिसून येतो. या कालखंडात बनलेल्या लेण्यांमध्ये बौद्ध, हिंदू आणि जैन धर्मियांची शिल्पे मोठ्या प्रमाणात दिसून येतात. कित्येक ठिकाणी विविध धर्मांच्या शिल्पांमध्ये भेद अथवा फ़रक दिसून येत नाहीत. एकाच लेण्यात अथवा भिंतीवर विविध धर्मातील प्रतिके आणि शिल्पे एकत्र कोरलेली दिसून येतात. यावरून त्या काळातील सामाजिक एकात्मता दिसून येत.
Bhokardan Caves : Photo by Dr Dinesh Soni
संभाजीनगर जवळील वेरूळच्या लेण्या या कालखंडात बनलेल्या लेण्यांचा एक अतिशय उत्तम उदाहरण आहेत. यासोबतच मुंबईजवळील घारापुरी अथवा एलिफंटा च्या लेण्या देखिल याच काळातील आहेत. अजंठा येथील लेण्यांमध्ये देखिल या काळात बरीच भर घातली गेली. युनेस्को जागतिक वारसा स्थळाच्या यादित समाविष्ट असणा~या जागांव्यतिरिक्त इतर ब~याच लेण्या या काळात खोदल्या गेल्या आहेत. पुण्यातील पाताळेश्वर; मुंबईमधिल जोगेश्वरी, मंडपेश्वर आणि महाकाली या लेण्या याच काळातील. सोबतच मराठवाड्यातील अंबेजोगाईमधिल हत्तिखाना लेण्या ; लातूर जिल्ह्यातील खरोसा लेण्या ; धाराशिव (पुर्वीचे उस्मानाबाद) येथील धाराशिव लेण्या; नांदेड जिल्ह्यातील शेऊर आणि माहूर लेण्या ; संभाजीनगरमधिल औरंगाबाद आणि देवगिरी लेण्या ; जालना जिल्ह्यातील भोकरदन लेण्या या सर्व लेण्यादेखिल या काळात निर्माण झाल्या. कोकण भागातील कुडा , गांधारपाळे, पांडेरी, पन्हाळे काजी, वेंगुले, कातळगाव जावडे येथील लेण्या देखिल याच काळातील.
यापुढील काळात लेण्यांची निर्मिती महाराष्ट्राबाहेर प्रसारित झाली. कर्नाटकातील बदामी आणि ऐहोळे ; तामिळनाडूतील कांचिपुरम, पुडुकोट्टाई आणि महाबलीपुरम; आंध्र प्रदेशातील भैरवकोना आणि अक्काना मंडना ; गोव्यातील हार्वेलम; मध्य प्रदेशमध्ये ग्वाल्हेर येथील लेण्या या स्वरूपात लेण्यांची निर्मिती महाराष्ट्राबाहेर केली गेली. इस ११ व्या शतकानंतर लेण्यांची निर्मिती बंद झाली. मात्र महाराष्ट्रातील या लेण्या आजही आपल्या पुरातन इतिहासाची साक्ष देत दिमाखाने उभ्या अहेत.
[…] […]
[…] मौर्य साम्राज्यापर्यंत मागे जातो. नाशिकजवळील पांडव लेण्या पाहता हा संबंध लक्षात येतो. त्यामागे […]
[…] लातूर जिल्ह्यातील खरोसा या ठिकाणी राष्ट्रकूट काळातील लेण्या आहेत. सोबतच हत्तीबेट, हासेगाववाडी आणि […]