Periplus of Erythrean Sea या पहिल्या शतकातील पुस्तकात रोमन आणि इजिप्शियन व्यापाऱ्यांना भारतातील व्यवसायिक संधींबद्दल विस्तृत माहिती दिलेली आहे. या पुस्तकात आजच्या भारत आणि पाकिस्तानमधिल ब~याच शहरांबद्दल माहिती सापडते. सोबतच सातवाहन काळातील व्यापारी जाळ्यांबद्दल देखिल विस्तृत स्वरूपात माहिती मिळते. यामध्ये आजच्या कल्याण, उज्जैन, पैठण, नालासोपारा, तिरूचिरापल्ली, पुदुच्चेरी अशा शहरांचा उल्लेख सापडतो. यामध्येच तगरनगर अथवा तगरपूर या एका महत्वाच्या व्यापारी केंद्राचा उल्लेख देखिल दिसून येतो. हे तगरपूर म्हणजे आजच्या धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील तेर हे गाव आहे.
Periplus of Erythrean Sea नुसार व्यापारी नकाशा
तेर हे सातवाहन काळात जसे व्यवसायिक दृष्टीने महत्वाचे केंद्र होते, तसेच ते सांस्कृतिक दृष्टीने देखिल अतिशय महत्वपूर्ण केंद्र राहिलेले आहे. या गावात हिंदू, बौद्ध आणि जैन या तीन धर्मांची विविध प्रार्थनास्थळे एकत्र नांदत होती हे उत्खननात सापडलेल्या पुराव्यांमध्ये दिसून येते.
तेर मध्ये झालेली पुरातत्व उत्खनने
तेर मध्ये सर्वप्रथम १९५७-५८ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या (तत्कालिन बॉम्बे रेसिडेन्सी) Archives and museum विभागातर्फे उत्खनन पार पडले. या उत्खननामध्ये सर्वप्रथम तेर शहर इस पूर्व ४ थे शतक ते इस ४ थे शतक या काळात अतिशय गजबजलेले होते ही बाब समोर आली. याच उत्खननात मातीपासून बनलेले (terracotta) बरेच खेळणी, लहान मुर्त्या, भांडी, दागिने आणि इतर वस्तू दिसून आल्या. १९६६ ते ६९ दरम्यान याच विभागातर्फे पुन्हा एकदा विस्तृत असे उत्खनन येथे पार पडले. तत्पुर्वी गावातील जुने जमिनदार श्री रामलिंगप्पा लामतुरे यांनी गावात विविध ठिकाणी सापडलेल्या आणि त्यांच्याजवळ असलेल्या वस्तूंबद्दल शासनास माहिती दिली होती. आणि याच माहितीच्या आधारावर अधिक विस्तृत उत्खनन सुरू करण्यात आले होते. या उत्खननात तेर शहरातील ऐतिहासिक वसाहतींबद्दल माहिती मिळाली. या उत्खननात सापडलेल्या माहितीनुसार परिसरातील सर्वात जुनी वसाहत मौर्य काळात (इस पूर्व ३ रे शतक ते इस पूर्व १ ले शतक) या काळातील होती. ही वसाहत एका मोठ्या पुरामध्ये नष्ट झाली होती. दुसरी वसाहत इस पूर्व १ ले शतक ते इस १ ले शतक या काळातील आहे. या वसाहतीच्या अखेरील शहरात एक मोठी लागली होती, ज्यामध्ये बरीच घरे जळून खाक झाली होती. तिसरा सर्वात महत्वपूर्ण टप्पा इस ५० ते इस २०० च्या काळातील आहे. याच काळात हे शहर खूप मोठे व्यवसायिक केंद्र म्हणुन उदयास आले होते.
आजच्या तेरणा नदीच्या काठावर बरीच रोमन कालिन वस्तू आणि घरांचे अवशेष सापडले आहे. यामध्ये रोमन कालिन अथवा रोमन शैलीतील मातीची खेळणी, मुर्त्या, दिवे, भांडे, रोमन नाणी, जवाहिर अशा वस्तूंचा समावेश आहे. या उत्खननात सापडलेल्या घरांच्या पायांमध्ये एक विशेष बाब होती. या सर्वच घरांचे पाये हे, पुराच्या पाण्यापासून वाचण्यासाठी उंच भिंती बांधलेल्या होत्या, याचा पुरावा देणारे आहेत. यामुळे परिसरात वारंवार तेरणा नदिला पूर येत असे हे लक्षात येते.
याच टप्प्यात चक्राकार आकार असलेल्या एका स्तुपाचे अवशेष सापडले. सातवाहन वंशाच्या पुलुमावी राजाच्या काळातील एक नाणेदेखिल याच ठिकाणी सापडले. यावरून हे स्तुप दुस~या शतकाच्या उत्तरार्थातील असल्याचे लक्षात येते. सोबतच त्रीविक्रम मंदिराजवळच हस्तिपृष्ठ शैलीतील (apsidal) विटांचे बांधकाम असलेले एक अवशेष देखील सापडले. या अवशेषामध्ये एक मोठे मंडपदेखील होते, जे कदाचित लाकडी खांबावर उभे होते.
तेर येथे उत्खननात सापडलेले स्तुपाचे अवशेष
या टप्प्यात ब~याच गैर भारतीय वस्तू देखिल सापडल्या. ज्यामध्ये कार्नेलियन शिक्के, मातीचे खेळणे, आणि विशेष प्रकारचे दिवे यांचा समावेश आहे. Periplus of Erythrean Sea या पुस्तकात उल्लेख आहे की दक्षिण भारतातून निर्यातयोग्य सामान तगर येथे येत असे. आणि तेथून पैठण मार्गे पश्चिम किना~यावरील बंदरावर पाठविले जात असे. सोबतच येथे उत्तम प्रतिच्या कापडाची निर्मिती होत असे. उत्खननात सापडलेले कापडाला रंग करण्यासाठी बनलेले खड्डे या गोष्टीची साक्ष देतात.
उत्खननाचा तिसरा टप्पा १९७४-७५ या काळात पार पडला. सातवाहन काळातील सांस्कृतिक आणि व्यवसायिक स्वरूप समजून घेण्यासाठी हे उत्खनन करण्यात आले होते. या उत्खननात पुन्हा एकदा येथील वसाहतीच्या तीन टप्प्यांवर शिक्कामोर्तब झाले. सातवाहन काळातील व्यवसायिक भरभराटीचे देखिल पुरावे या उत्खननात सापडले. या उत्खननात तेरच्या दक्षिण पूर्व दिशेला १६ किमी अंतरावर इर्ले या गावात एक स्तुपवजा टेकडी सापडली होती. या टेकडीवर पुढील काळात उत्खनन होऊ शकले नाही.
उत्खननाचा चौथा टप्पा १९८७-८९ या काळात पार पडला. या उत्खननात एक विटांनी बनलेले बारव सापडले. या बारवजवळच एक हस्तिपृष्ठ शैलीतील इमारतीचे अवशेष देखिल सापडले होते. सोबतच चुनखडीच्या खांबांचे अवशेष, भांडी, बांधकामाचे अवशेष आणि इतर ब~याचश्या वस्तू या उत्खननात सापडल्या. पुढे २०२० मध्ये एका इमारतीच्या बांधकामादरम्यान सातवाहन काळातील एक विहीर सापडली.
तेरच्या आजूबाजूला आजही ब~याचश्या टेकड्या आणि जागा उत्खनन आणि संशोधनासाठी अंकित करण्यात आलेल्या आहेत. येत्या काळात या जागांवर उत्खनन होऊन आणखी बरीच तथ्ये आणि अवशेष सापडतील अशी अपेक्षा आहे.
आजचे तेर
आजच्या धाराशिव जिल्ह्यात तेर हे एक छोटेसे खेडेगाव आहे, जे संत गोरोबा काका यांच्या मंदिरासाठी जास्त प्रसिद्ध आहे. वारकरी संप्रदायातील मध्ययुगिन संत असलेल्या गोरोबा काका यांचे मंदिर तेरणा नदिच्या काठावर वसलेले आहे. याच मंदिराच्या परिसरात एक प्राचिन हस्तिपृष्ठ शैलीचे मंदिर आहे. या काळेश्वर मंदिराचे शिखर हे हस्तिपृष्ठ आणि स्तंभ बांधकामाचे मिश्रण आहे. पुरातत्वात आवड असणा~या व्यक्तींमध्ये विशेष प्रसिद्ध असलेले त्रिविक्रम मंदिर हे हस्तिपृष्ठ शैलीतील मंदिर गावाच्या मध्यभागी वसलेले आहे. आज पुर्णत: हस्तिपृष्ठ शैलीतील शिल्लक असलेल्या केवळ दोन मंदिरांपैकी हे एक आहे (दुसरे मंदिर आंध्र प्रदेशमध्ये गुंटूर जिल्ह्यात छेजरला येथे आहे). मंदिर बांधणी शैलीच्या उत्क्रांतीमधिल एक महत्वाचा दुवा म्हणून या मंदिराकडे पाहता येईल
त्रीविक्रम मंदिर , तेर
सुरूवातीला हे मंदिर एक पूर्णत: हस्तिपृष्ठ शैलीचे स्मारक होते. या मंदिराची शैली लेण्यांमधिल चैत्यासोबत खूप साधर्म्य असणारी आहे. पुढील काळात (कदाचित ६ व्या शतकात) या स्मारकात सपाट छत असलेल्या एका मंडपाची भर टाकली गेली. या मंदिराची हस्तिपृष्ठ शैली ही तक्षशिला (इस पूर्व ३० ते इस ५०) येथे सापडलेल्या स्मारकांच्या संरचनेशी खूप साधर्म्य असणारी आहे. त्यामुळे त्रीविक्रम मंदिर हेदेखिल त्याच काळातील असावे असा संशोधकांचा अंदाज आहे. सातवाहन काळातील या मंदिरात आज विष्णूच्या वामन अवताराची त्रीविक्रम प्रतिमा विराजमान आहे. त्रीविक्रम मंदिर हे महाराष्ट्रातील सर्वात प्राचिन बांधकाम म्हणून ओळखले जाते. हस्तिपृष्ठ शैली आजच्या काळात दुर्मिळ असली तरी या गावात या शैलीचे बरेच अवशेष सापडले आहेत. त्यामुळे स्तुपांपासून चौरस अथवा आयताकृती मंदिरांकडे झालेल्या स्थित्यांतरातील एक महत्वाचा दुवा म्हणून आपण तेर गावाकडे पाहू शकतो.
याच स्थित्यांतरातील आणखी एक महत्वाचा दुवा आहे तेर मधिल उत्तरेश्वर मंदिर. विटांचे बांधकाम असलेल्या या मंदिरामध्ये विटांसोबतच लाकडाचा देखिल बांधकामासाठी झालेला वापर दिसून येतो. या मंदिराच्या गर्भगृहातील द्वारशाखा तत्कालिन लाकडी कलाकुसरीचा एक उत्तम नमुना आहे. आज ही द्वारशाखा गावातील पुरातत्विय वास्तुसंग्रहात ठेवलेली आहे.
उत्तरेश्वर मंदिर, तेर
गावात झालेल्या उत्खननांमध्ये स्तुपांचे बरेच अवशेष सापडलेले आहेत. काही भांड्यांवर त्रीरत्न (बुद्ध, धर्म आणि संघ यांना दर्शविनारे एक बुद्ध धर्मातील चिन्ह) हे चिन्ह अंकित केलेले सापडले आहे. यावरून या भागात बौद्ध धर्माचा देखिल असणारा प्रभाव लक्षात येतो. जवळच असलेल्या धाराशिव आणि खरोसा येथील लेण्यांमध्ये बौद्ध धर्माचे असलेले शिल्प देखील या गोष्टीची ग्वाही देतात.
तेर येथे एक पुरातन दिगंबर जैन मंदिरदेखिल आहे, जे या प्रदेशातील जैन धर्माच्या प्रभावाची जाणिव करून देते. या मंदिरास जैन धर्मामध्ये “अतिशय क्षेत्र” (खूप जास्त पवित्र असणारे ठिकाण) असे संबोधले जाते. जवळपासच्या भागात खूप ठिकाणी सापडलेले जैन अवशेष आणि धाराशिव लेण्यांमध्ये असलेले जैन शिल्प हे या भागात असलेल्या जैन धर्माच्या प्रसाराची जाणिव करून देतात. आज येथे असलेले मंदिर हे साधारणत: १२ व्या शतकातील आहे. येथील पार्श्वनाथ मंदिराच्या पुनर्निमाणाच्या वेळी जैन धर्माशी संबंधित बरीचशी शिल्पे सापडली आहेत. त्यामुळे १२ व्या शतकाच्या आधीसुद्धा तेरमध्ये जैन धर्माचा प्रभाव होता हे लक्षात येते. ही सर्व शिल्पे आज मंदिरात ठेवण्यात आलेली आहेत.
जैन मंदिराच्या बांधकामाच्या वेळी सापडलेले अवशेष
तेर गावात एक पुरातत्विय संग्रहालय देखिल आहे. गावातील जुने जमिनदार कै रामलिंगप्पा लामतुरे ( ज्यांनी त्यांच्याकडे असलेला पुरातत्विय ठेवा सरकारला भेट केला) यांच्या नावाने हे संग्रहालय उभे केले गेलेले आहे. पुरातत्विय आणि इतिहासप्रेमींसाठी हे संग्रहालय एक अमूल्य असा ज्ञानाचा ठेवा आहे.
तेरबद्दल एक मजेशिर बाब
खिचडी हे आजच्या काळात एक अतिशय महत्वपूर्ण असा खाद्यपदार्थ आहे. हा पदार्थ आपल्याकडे २००० वर्षांपूर्वी देखिल अस्तित्वात होता याचे पुरावे तेर येथील उत्खननात सापडले आहेत. तेर मध्ये उत्खननात एका भांड्यामध्ये भात आणि मुंग दाळ यांना एकत्र करून बनविलेल्या पदार्थाचे अवशेष सापडले आहेत. यावरून या भागात २ सहस्त्रकांआधी खिचडी हा पदार्थ बनविला जात होता हे लक्षात येते.
[…] […]
[…] अशा नगरांचा उल्लेख येतो. यासोबतच “तगर” या प्राचिन व्यापारी केंद्राचादेखिल उल्लेख या काळातील ब~याच […]
[…] बारवांचा वापर नक्कीच होत होता. तेर (जि धाराशिव) येथे इस १ ल्या शतकातील एक बारव सापडली […]
[…] पूजन केले जात असे. महाराष्ट्रातील तेर (जि धाराशिव) येथे उत्खननात एक लज्जागौरीची मुर्ती […]