युनेस्कोच्या जागतिक वारश्यांच्या यादीमध्ये स्थान असलेल्या अजिंठा लेण्यांबद्दल आपण सर्वांनाच माहित असेल. या लेण्यांपासून अगदी २० किमी च्या अंतरावर एक अतिशय सुंदर अशी चालुक्यकालिन कलाकृती आहे, ज्याबद्दल खूप कमी जणांना माहिती असेल. छत्रपती संभाजीनगर पासून अजिंठा जात असताना सिल्लोड नंतर गोळेगाव खुर्द हे गाव येते. या गावातून केवळ ९ किमी अंतरावर अन्वा गावामध्ये एक पुरातन शिव मंदिर आजही दिमाखात उभे आहे. अजिंठा परिसरातील बांधिव मंदिर स्थापत्याचा एक अप्रतिम अविष्कार म्हणून या मंदिराचा उल्लेख कराव लागेल.
पुर्वाभिमुख असलेल्या या मंदिराबद्दल ठोस असा कोणताही अभिलेखिय पुरावा नाही. त्यामुळे मंदिराचा नेमका आणि अचूक काळ सांगता येणार नाही. मात्र मंदिराचे स्थापत्य, मुर्तीकाम आणि कोरीव काम या आधारावर मंदिर निर्मितीचा काळ इस १०व्या ते १३व्या शतकातील, म्हणजेच चालुक्यकाळातील आसे खात्रीपुर्वक सांगता येईल.
प्रशस्त प्रांगणाच्या मध्यावर हे मंदिर उभे आहे. प्रांगणाच्या सिमेवर पुरातन भिंतीचे काही अवशेष शिल्लक आहेत. यावरून पुर्वी या प्रांगणावर संरक्षक भिंती होत्या हे लक्षात येते. मंदिर ४ फ़ुट उंच अधिष्ठाणावर (platform) आहे. या अधिष्ठाणावरील जगती (मंदिराला प्रदक्षिणा करण्याकरीता अथवा चालण्याकरीता तयार केलेले सपाट क्षेत्र) अतिशय प्रशस्त असे आहे. अधिष्ठाणाची रचना ही मंदिराच्या बाह्यरचनेशी सुसंगत अशी आहे. प्रतिष्ठाणास तीन बाजूने पाय~या आहेत. यापैकी पुर्वेकडील पाय~या आपल्याला मंदिराच्या मंडपामध्ये पोहोचवतात. पाय~यांच्या दोनही बाजूस देवकोष्ठ आहेत. पुर्वेकडील देवकोष्ठांमध्ये द्वारपालाची शिल्पे आहेत. तर उत्तर आणि दक्षिणेकडील देवकोष्ठांमध्ये शिल्प नाही आहेत.
मंदिराच्या बाह्य भागातील भिंतीवर मोडणी करून कोन तयार केलेले आहेत. त्यामुळे मंदिराची रचना तारकाकृती झालेली आहे. प्रवेशद्वाराजवळ आणि संपूर्ण बाह्यभिंतीवर आडव्या समांतर पट्ट्यामध्ये किर्तीमुख, हंस, सिंह यांच्या नक्षी कोरलेल्या आहेत. सोबतच निमूळते अर्धस्तंभ आणि या अर्धस्तंभांच्या मध्ये लहान मुर्त्या आहेत.
मंदिर मुख्यतः मंडप, अंतराळ आणि गर्भगृह या तीन भागांत विभागलेले आहे. मंदिराला मुखमंडप अथवा अर्धमंडप नाही आहे. त्यामुळे पाय~या चढून आपण थेट मंडपात पोहोचतो. मंडपाला तिनही बाजूने अर्ध भिंती आहेत. आणि आतील बाजूने थोडेसे उंचावलेले असे पीठ (आसनव्यवस्था) आहे. मंडपामध्ये एकूण ५४ स्तंभ आहेत. त्यांपैकी काही स्तंभ हे या पीठावर टेकलेले आहेत. अंदाजे ४०-५० फ़ुट व्यास असलेले हे मंडप अतिशय भव्य आहे.
मंडपाच्या मध्यभागी थोडेसे उंचावलेले असे रंगमंडप आहे. अगदी गुळगुळित अशा या रंगमंडपाच्या मध्यभागी नंदी विराजमान आहे. मंडपामध्ये एकूण ५० स्तंभ आहेत जे वेगवेगळ्या नक्षीकामाने आणि मुर्त्यांनी हे स्तंभ सजलेले आहेत. या अष्टकोनी खांबांवर पद्म नक्षी, घटपल्लव, सप्तमातृका, विविध देवता, वाद्य आणि वाद्य वाजविणा~या मदनिका, विविध देवदेवता, यक्ष इ कोरलेले दिसून येतात. मंडपाच्य भितींवर दोन कमानी आहेत. या कमानींमध्ये शिल्प नसले तरी या कमानी कोरीव कामाने शिल्पीत आहेत.
मंडपाचे छत हे मंदिराचे सर्वात आकर्षक वैशिष्ट्य आहे. हे घुमटाकार छत चार मध्यवर्ती स्तंभांवर पेलून धरलेले आहे. या घुमटाच्या मध्यभागी एक दगडाने बनलेले झुंबर आहे. मध्यभागी एक मोठे फूल आणि त्याच्या भोवताली ८ लहान लहान फूल यांनी हे दगडी झुंबर बनलेले आहे. वर्तुळाकार अशा रचनेमुळे हा घुमट अतिशय आकर्षक दिसतो. या झुंबराच्या बाहेरील बाजुने चक्राकार पदक, फुले आणि मानवी आकृत्या यांची नक्षी कोरलेली आहे.
मंदिराचे मंडप आणि गर्भगृह यांच्या दरम्यान एक अंतराळ आहे. अंदाजे ८-९ फुट लांबी व ४-५ फ़ुट रुंदी असलेले हे अंतराळ मंडपापासून वेगळे करण्यासाठी चार स्तंभाची रचना केलेली आहे. गर्भगृह हे अंदाजे ८-९ फ़ुट लांबी असलेल्या चौरस आकारात आहे. गर्भगृहाचे द्वार कोरीव कामाने नटलेले आहे. या द्वारावर चार द्वारशाखा आहेत. यामध्ये एकमेकांत गुंतलेल्या सिंहाची लहान शिल्पे आहेत, एकत्र गुंफ़लेली नक्षी , स्तंभशाखा अशी नक्षी आहे. या द्वारशाखेवर हातात हार घेतलेले यक्षदेखिल कोरलेले आहेत. दरवाज्याच्या वरील बाजूस ललाट पट्टीमध्ये गणेश कोरलेला आहे. सोबतच तोरणाच्या नक्षीमध्ये ५ भग्न मुर्त्या आहेत.
मंदिराच्या बाहेरील बाजूच्या भिंतीदेखिल अतिशय उत्कृष्ट कलाकुसरीने युक्त आहेत. तारकाकृती आकारामुळे कलाकृती रेखाटण्यासाठी कलाकारांना भरपूर संधी मिळाली आहे. आणि त्या संधीचे सोने करीत मंदिरनिर्मात्यांनी या बाह्यभिंतीवर खूप सुंदर कलाकृती कोरलेल्या आहेत. यामध्ये ब्रम्हा, विष्णू, सूर्य, शिव, यक्ष, लक्ष्मी, गौरी, गणेश, वराह, नृसिंह इ देवतांची शिल्पे आहेत. यापैकी काही शिल्पांमध्ये हे देव नृत्य अथवा नाट्यमुद्रेमध्ये दिसून येतात. सोबतच दर्पणसुंदरी, डालमलिका, खड्गधारिणी या सुरसुंदरी आणि काही मिथुनशिल्प आहेत. सोबतच शरभ, हत्ती, सिंह या प्राण्यांची शिल्पे देखिल आहेत. बाह्यभागातील भिंतींवर तोरण आणि अर्धस्तंभांनी युक्त असे देवकोष्ठ देखिल आहेत. या देवकोष्ठातील आणि इतरही ब~याच मुर्त्यांची मोठ्या प्रमाणात तोडफ़ोड झालेली आहे.
या मंदिरातील देविंच्या मुर्त्यांची एक विशेषता आहे. या मुर्त्यांमध्ये विष्णूच्या २४ रूपांसोबत जोडलेल्या २४ शक्ती दर्शविलेल्या आहेत. विष्णूची विविध रूपे त्यांच्या हातातील ४ वस्तूंच्या आधारावर ओळखली जातात. पद्म अर्थात कमळ, चक्र, शंख आणि गदा या ४ वस्तू कोणत्या हातांत आणि कोणत्या क्रमाने आहेत त्यानुसार हे रूप असतात. या वस्तूंच्या विविध क्रमवारीनुसार देवीची २४ रूपे याठिकाणी आहेत. यांना २४ वैष्णवी असेदेखिल काही संशोधकांनी संबोधलेले आहेत.
मंदिरावरील शिखर देखिल पुर्णपणे उद्ध्वस्त आहे. सध्या मंदिराच्या डोक्यावर केवळ गोल घुमटाकार आवरण आहे. हे शिखर परकिय आक्रमणांनी उद्धवस्त झाले की नैसर्गिक आपत्तीमुळे, हे समजण्याचा कोणताही मार्ग नाही. मात्र शिखर उद्धवस्त झाल्यानंतरदेखिल उर्वरित मंदिर अद्यापही अतिशय सन्मानाने आणि मजबूतपणे उभे आहे.
अन्वा व परीसरातील नागरिक याठिकाणी अद्यापही पूजन करतात. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात याठिकाणी भाविकांची मोठी गर्दी असते. येथून २० किमी अंतरावर भोकरदन मध्ये राष्ट्रकूट कालिन लेण्या आहेत. येथून २४ किमी अंतरावर जांभई गावात अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करीत असलेले वडेश्वराचे सुंदर मंदिर आहे.
छत्रपती संभाजीनगरहून अजिंठा लेण्यांकडे जाताना या मंदिरांना भेट देणे अतिशय आनंददायी अनुभव असणार आहे. अतिशय सुंदर कलाकुसरीने परीपूर्ण असे हे मंदिर प्रत्येकाला मंत्रमुग्ध करणार यात शंका नाही.
[…] ४ फुट उंचीच्या मुर्त्या दिसतात. जालना जिल्ह्यातील अन्वा येथील पुरातन… बाह्य भागावार वैष्णवीची विविध रूपे […]